Marathi Bible Reading | Tuesday 21th December 2021 | 4th Week of Advent |

        आगमनकाळातील ४चौथा  सप्ताह 

मंगळवार २१ डिसेंबर २०२१

“स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य!


 
संत पीटर कनेशिअस

वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५२१-१५९७)

 ✝️

 परमेश्वराच्या कृपेने परिपूर्ण असलेली मरिया खऱ्या अर्थाने सेवाकार्य करण्यासाठी अलीशिबेकडे आली होती. मरियेच्या सहवासाने अलीशिबा पावन झाली. मरियेने आपल्या मावस बहीणीची तिच्या बाळंतपणात सेवा केली. पवित्र मरियेचे अगदी साधे पण गुण संपन्न असे जीवन ह्या घटनेद्वारे आपल्याला दिसून येते. अडचणीत, संकटात व गरज असेल अशा ठिकाणी मरियेने उपस्थित राहून साहाय्य केल्याची उदाहरणे शुभवर्तमानात आहेत. आपल्या सर्वांची माता  असलेली पवित्र मरिया ख्रिस्ती श्रद्धेचा आणि ख्रिस्ती सेवेचा महान आदर्श आहे. मरियेने आपले सर्वस्व देवाठायी समर्पित केले होते म्हणूनच, 'प्रभू तिच्याठायी  होता, तिच्या बरोबर होता, असे शुभवर्तमान सांगते.' ख्रिस्त जन्मापासून कालवरीवरच्या क्रुसावरील बलीदानापर्यंतचा मरियेचा प्रवास तिच्या समर्पित  जीवनाची साक्ष देतो.
 पवित्र मरिया मातेसारखे प्रार्थनामय, श्रद्धापूर्ण आणि आणि सेवाभावी जीवन  जगण्यासाठी आपल्या प्रत्येकाला तिच्या गुणांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. म्हणूनच मरिया भक्तीद्वारे आपण प्रभू येशूच्या रहस्यमय जीवनात सहभागी होऊ या.
 

पहिले वाचन गीतरत्न :८-१४
वाचक : गीतरत्न या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"पाहा, माझा वल्लभ; डोंगरावरून उड्या टाकीत येत आहे."
हा माझा वल्लभाचा शब्द! पाहा तो डोंगरावरून उड्या टाकीत, टेकड्यावरून दौडत येत आहे ! माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे. पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे. तो खिडकीतून डोकावत आहे. तो झरोक्यातून पाहत आहे.
माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल. पाहा, हिवाळा गेला आहे. पाऊस संपून गेला आहे. पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत. पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे.
आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे. अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत. द्राक्षवेलीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे. माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये. अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशाला राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे, कारण तुझा कंठ मधुर आहे. तुझे मुख रम्य आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३३४:२-३,११-१२,२०-२१
प्रतिसाद :  प्रभूशी एकरूप होऊन आनंदित व्हा.

१) वीणेवर प्रभूच्या उपकारांचे स्मरण करा. 
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. 
त्याच्याकरिता एखादे नवे गीत गा. 
वीणेवर आपली कला पणाला लावा. 
आनंदाने गजर करा.

२) प्रभूची योजना सदैव टिकते 
त्याच्या मनातले विचार पिढ्यान्पिढ्या अढळ असतात. 
प्रभू ज्या राष्ट्राचा देव, तेच सुखी. 
प्रभूने त्यांना लोक म्हणून निवडलेले आहे.

३)आमच्या जिवाला प्रभूचा ध्यास लागला आहे. 
तोच आमचा सहाय्यकर्ता, आमची संरक्षक ढाल. 
आमच्या मनाला होणाऱ्या आनंदाचा उगम 
त्याच्याच ठायी आहे. 
त्याच्या पवित्र नामावर आमचा भरवसा आहे.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
सकाळच्या नक्षत्रा, चीरप्रकाशाच्या तेजा, नीतिसूर्या, ये आणि अंधारात राहाणाऱ्यांना आणि मृत्यूच्या छायेत असलेल्यांना प्रकाशित कर.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक १:३९-४४

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ?"

मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावाला त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशबेला अभिवादन केले. अलिशबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने हालचाल केली व अलिशबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, “स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:मरिया आपली मावस बहीण अलिशिबा भेटी दरम्यान संत लूकने पवित्र मरियेची प्रतिमा आणखी उजळून चितारण्याचा प्रयत्न केला आहे. पवित्र मरिया ही केवळ येशूची माता नसून त्याची पहिली व आदर्श शिष्या आहे. 'जे गरजू आहेत त्यांची सेवा करूनच आपण ईश्वराचे सेवक बनू शकतो. हाच संदेश लूकने इथे आपणांस दिलेला आहे. पवित्र मरिया महान आहे, कारण ती केवळ आपल्या पुत्राची माता बनली नाही तर श्रद्धावंताचा आसरा बनली. पोप सहावे पॉल आपल्या 'मरिया लूस कल्टूस' ह्या परिपत्रकात म्हणतात, पवित्र मरियेची भक्ती आणि गरजूंची सेवा टाळून केलेली मरिया भक्ती अपूर्ण आणि सदोष आहे. श्रद्धा कृती- श्रद्धा हा जणू पवित्र मरियेचा जीवनाचा सारांश होय. देवदूताचा निरोप- अलिशिबेची सेवा आणि आता पुन्हा देवाचे स्तुतिगान ह्या चक्रात ती रमून जाते.
प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, श्रद्धेने व निष्ठेने तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या