तारणाच्या इतिहासात देवाने त्याच्या विशिष्ट निवडलेल्या लोकांना
तारणकार्याच्या योजनेत सक्रीय सहभाग घेण्यासाठी पाचारण केलेले आपण पाहतो. देवाने आब्राहाम, इसाहाक, याकोब, मोशे, शमुवेल, सालोमन, दावीद तसेच अनेक संदेष्ट्याना पाचारण करून आपल्या निवडलेल्या प्रजेला मार्गदर्शन केले.
पवित्र मरियेला गाब्रिएल दुताने जेव्हा देवाची योजना सांगीतली तेव्हा मरिया गोंधळली. मात्र, 'देवाची तुझ्यावर कृपा झाली आहे' असे आश्वासन मिळताच ती सावरली. तरी सुध्दा कुमारी गर्भवती होणे अशक्य प्राय असल्याचे तिने सांगीतले तेव्हा अलीशिबेला म्हातारपणात गर्भ राहिला आहे, हे समजताच परमेश्वराला काहीच अशक्य नाही, असे समर्पक चिन्ह मरियेला मिळाले. त्यावेळी मरियेने परमेश्वराठायी आपले सर्वस्व समर्पित करून म्हटले, पहा मी प्रभूची दासी आहे. दासी म्हणजे सर्वस्वी देवाच्या आज्ञेप्रमाणे वागणारी सेविका मरियेने देवाच्या पाचारणाला पूर्ण मनाने । आत्मसमर्पण करून होकार दिला, व आपले जीवन देवाच्या तारणदायी सेवाकार्याला वाहून दिले.
स्नानसंस्कार, दृढीकरण संस्कार, ख्रिस्तशरीर संस्कार, विवाहसंस्कार किंवा व्रत आणि दीक्षाविधी संस्कारच्यावेळी आपण देवाच्या हाकेला प्रतिसाद देवून हो म्हणतो, मात्र आत्मसमर्पण करून तसे आचरण करतो का ? आज पवित्र मरिया आपल्यासर्वांना सांगत आहे, देवाच्या हाकेला होकार द्या, कारण तुमच्या होकारात देवाची योजना पूर्ण होऊ शकते. देवाचे राज्य पृथ्वीतलावर येऊ शकते.
पहिले वाचन यशया ७:१०-१४
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल."
परमेश्वर आहाजला आणखी म्हणाला, “तुझा देव परमेश्वर याच्याजवळ तू आपणासाठी चिन्ह माग, ते अधोलोकात असो किंवा ऊर्ध्व लोकात असो." आहाज म्हणाला, "मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पहाणार नाही." तेव्हा तो म्हणाला, “हे दावीदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐका : तुम्ही मनुष्यांना कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळविता काय? यास्तव प्रभू स्वतः तुम्हांला चिन्ह देत आहे. पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासह देव) असे ठेवील."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २४:१-६
प्रतिसाद : प्रभूचे स्वागत असो.
१) ही धरती प्रभूची, इथले सारे काही त्याचेच,
हे जग आणि इथे राहाणारे सारेदेखील त्याचेच आहेत.
त्यानेच तर सागरांवर तिचा पाया घातला
भूमिगत जलाशयांवर तिची स्थापना केली.
२) प्रभूच्या पर्वतावर कोण चढेल,
त्याच्या पवित्र क्षेत्रात कोण उभा राहील?
ज्याचे हात निष्कलंक आणि अंतःकरण शुद्ध आहे,
ज्याचे मन असत्याच्या मागे धावत नाही तोच!
३) त्याला प्रभूकडून आशीर्वाद प्राप्त होईल,
उद्धारकर्त्या देवाकडून न्याय मिळेल
असेच लोक त्याला शरण येतात.
याकोबच्या देवाचे दर्शन घेऊ. इच्छिणारे ते हेच.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
सार्वकालिक स्वर्गराज्याचे दरवाजे उघडणाऱ्या
हे दावीदच्या किल्ले, अंधारमय बंदिवासात असलेल्या बंदिवानांची सुटका करण्यास ये.
शुभवर्तमान लूक १:२३-३८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:२३-३८
“पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल.'
अलिशबेच्या गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यात देवाने गालिलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रियल देवदूताला पाठवले. ती दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणला, "हे कृपा पावलेल्या स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो." ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही."मरियेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही." देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र, असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलिशबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि ज्याला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य नाही." तेव्हा मरिया म्हणाली, "पहा, मी प्रभूची दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो." मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:धार्मिकदृष्ट्या पवित्र मरिया ही कृपेने भरलेली आहे. पवित्र मरिया ही तिच्या जन्माच्या क्षणापासून मूळ पापापासून दूर ठेवण्यात आलेली होती. ह्या तिच्या अवस्थेमध्ये प्रभू येशूचेच मोठेपण दडलेले आहे. देवाचा पुत्र ज्या स्त्रीच्या उदरी नऊ महिने राहणार ते उदर पापाच्या कलंकापासून अलिप्त राहणे आवश्यक होते. कॅथोलिक धर्मपंडितांच्या मते पवित्र मरिया कृपापूर्ण होती म्हणजेच तिच्या जीवनातील कोपरान् कोपरा परमेश्वराच्या कृपेने भरलेला होता. देवदूत पुढे म्हणतो, ‘प्रभू तुझ्याबरोबर असो.' अशाप्रकारचे अभिवादन देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी जुन्या करारात वापरण्यात आले आहे. उदा. गिदोनला देवदूत म्हणतो, 'हे बलवान वीरा परमेश्वर तुझ्याबरोबर आहे' (शास्ते ६:१२) ह्या वाक्याचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ परमेश्वराची सामर्थ्यशाली उपस्थिती, दुसरा अर्थ परमेश्वराचे तत्काळ सहाय्य. धार्मिकदृष्ट्या पवित्र मरिया ही सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळी आहे. भौतिक आणि धार्मिकदृष्ट्या मरिया जरी आगळीवेगळी स्त्री असली तरी तिची प्रतिक्रिया मात्र चारचौघासारखी आहे. तिच्या मनात खळबळ उडते आणि ती विचारात गढून जाते. देवदूत तिच्या मनातला गोंधळ दूर सारतो आणि देवाची योजना तिला समजावून सांगतो.
प्रार्थना :- हे पवित्र मरिये, तुझ्यासारखे समर्पित जीवन जगून देवाच्या सेवाकार्यात सहभागी होण्यास आम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून आम्हासाठी विनंती कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या