Marathi Bible Reading | Monday 17th January 2022 | 2nd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील दुसरा  सप्ताह

सोमवार   दि. १७ जानेवारी  २०२२
✝️ 
 “उपासाचा खरा अर्थ”

✝️

संत अँथनी महान
- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (२५१-३५६)

मठाधिकारी अँथनी १०५ वर्षांच्या प्रदीर्घ जीवनमानानंतर ख्रिस्तवासी झाले. त्यांना हॉस्पिटलमधील कर्मचारी, खाच खणणारे, खाटिक, ब्रश आणि टोपल्या तयार करणारे, ह्यांचा आश्रयदाता संत म्हणून गौरविण्यात आले आहे. अपस्मार, फिट्स येणे, मरी, त्वचा रोग इ. आजारांतून मुक्ती मिळावी म्हणून संत अँथनी ह्यांची मध्यस्थी केली जाते.

चिंतन : हजारो फुलांमधून मकरंद गोळा करणाऱ्या मधमाशीप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या मित्रांकडून चांगले तेच घ्यावे. कोणाकडून सौजन्य, कोणाकडून साधेपणा आणि मौन, तर कोणाकडून सहनशीलता शिकून घ्यावी. - संत अँथनी महान.

योहानाचे शिष्य व परुश्यांचे शिष्य उपास करीत असत मात्र येशूचे  शिष्य उपास करीत नसत ह्याविषयी लोकांनी येशूला प्रश्न विचारला. येशूने  नवा द्राक्षरस व नवा बुधला ह्यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले की जोपर्यंत प्रभू येशू आपल्या शिष्यांच्या सोबत आहे तो पर्यंत उपासाची गरज नाही, कारण उपासाचा खरा अर्थ उपवासात असणे किंवा देवाच्या सहवासात असणे.

उपास-उपवासाचा खरा अर्थ केवळ अन्नाचा त्याग करणे नव्हे तर उपवासात आपण शरीराने आणि अंतरात्म्याने प्रभूच्या सहवासात जाण्यासाठी तयारी करीत असतो. उपवासात असताना आपल्या अंतर्यामी देवाचा ध्यास लागायला हवा. शारीरिक भूक शमविण्यापेक्षा आध्यात्मिक भूक लागण्यासाठी शरीर आणि मन एकचित्त होणे गरजेचे असते.  देहाला आणि अंतरात्म्याला उपवासात असतानाच खऱ्या अर्थाने देवाचा ध्यास लागू शकतो. आपल्या शरीराची भूक शमविण्यापेक्षा अंतरात्म्यात देवाच्या सहवासाची भूक लागावी म्हणून उपवास  करणे गरजेचे आहे.

केवळ उपासाचे कर्मकांड न करता निर्मळ शरीराने व निर्मळ मनाने जागतिक वासनांचा त्याग करुन अर्थरुपी उपवास करता यावा म्हणून आपण   प्रभूकडे कृपा मागू या.


✝️   

पहिले वाचन १ शमुवेल १५:१६-२३
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. परमेश्वराने तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे."

शमुवेल शौलला म्हणाला, "पुरे कर! परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो." तो म्हणाला, "सांगा." शमुवेल म्हणाला, "तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्राएल कुळांचा नायक केले ना? आणि तू इस्राएलचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना? मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले, 'जा, त्या पापिष्ठ अमालेक्यांचा सर्वस्वी नाश कर आणि त्यांचा संहार होईपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर.' असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस ?" शौल शमुवेलला म्हणाला, “मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे, परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे. मात्र ज्या लुटीचा नाश करावयाचा होता तीतून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे आणि गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत."
तेव्हा शमुवेल म्हणाला, "परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी आणि यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या चरबीपेक्षा देवाचे वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे आणि हट्ट हा मूर्तिपूजा आणि कुलदेवतार्चन यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्याने तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे."

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ५०:८-९,१६-१७,२१,२३
प्रतिसाद :जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन.

१) तुझ्या यज्ञासंबधांने तर मी तुला बोल लावीत नाही,
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच. 
तुझ्या घरचे गोऱ्हे किंवा तुझ्या मेंढवाड्यातले 
बोकड मी घेणार नाही.

२) माझे नियम विदित करणारा तू कोण ? 
माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण ?
 तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, 
माझी वचने मागे झुगारून देतोस.


३) असे तू केले तरी मी उगा राहू काय ? 
मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटते काय ? 
जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो 
आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला 
मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
माझा जीव परमेश्वराची अपेक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क   २:१८-२२

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"वऱ्हाड्यांबरोबर वर आहे."

एके दिवशी योहानचे शिष्य आणि परुशी उपास करीत होते, तेव्हा लोक येऊन येशूला म्हणाले, “योहानचे शिष्य आणि परुश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्यांचे कारण काय ?" येशू त्यांना म्हणाला, “वहऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय ? त्यांच्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही. तरी असे दिवस येतील की, त्यांच्यापासून वर काढून घेतला जाईल, तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील. कोणी कोऱ्या कपडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, लावले तर धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो आणि बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यात घालतात."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशू उपवासाचे महत्त्व कधीच नाकारीत नाही. उलट उपवास करणे, चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे हे येशूने आपल्या शब्दांद्वारे आणि वागण्याद्वारे स्पष्ट दाखविले आहे. मात्र आपल्या जीवनात सर्वप्रथम परमेश्वराची कृपा असणे, आपले जीवन पवित्र असणे, आपले जीवन ख्रिस्तमय असणे ह्याची जाणीव आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला करून देतो. आपण खूप धार्मिक आहोत असे दाखविण्यासाठी उपासतापास करावयाचे पण प्रत्यक्षात घाणेरडे जीवन जगायचे, सतत दुसऱ्यांवर अन्याय करीत राहायचे, दुसऱ्यांना आपल्यापेक्षा कमी लेखायचे ह्या परुशी लोकांच्या वृत्तीचा येशूला तिटकारा येत होता असे येशू आपल्या शुभवर्तमानात दाखवितो. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” ह्याची जाणीव समाजातल्या साध्यातल्या साध्या माणसालाही असते आणि ह्या जाणीवेनुसारच तो राजकीय नेत्यांची, समाजसेवकांची इतकेच नाही तर ज्यांच्याबरोबर तो रात्रंदिवस राहातो त्या घरातल्या माणसांचीही परीक्षा करीत असतो. देवाच्या बाबतीत आणि माणसांच्या बाबतीत दैनंदिन जीवनात आपण जे प्रेम दाखवायला हवे त्यात व आपले उपासतापास ह्यात तफावत दिसली की आपण माणसांच्या मनातून उतरतो ह्याची आपण नेहमीच जाणीव ठेवायला हवी.

प्रार्थना :  हे प्रभो, तुझ्या सहवासात राहून तुला अंतरात्म्याने अनुभवण्यास व तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या