सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९६:१-३,७-१०
प्रतिसाद : सर्व लोकांमध्ये परमेश्वराची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
परमेश्वराचे गुणगान करा,
त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
२) त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा,
राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव,
सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
३) अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा,
परमेश्वराचा गौरव करा आणि त्यांचे सामर्थ्य वाखाणा;
परमेश्वराच्या नावाची थोरवी गा.
४) प्रभूच्या मंदिरात त्याची उपासना करा.
हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
राष्ट्रांमधील लोकांना विदित करा:
"परमेश्वर राज्य करतो."
तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
दुसरे वाचन १करिंथकरास १२:४-११
वाचक : पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देतो."
कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी प्रभू एकच आहे आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वकालिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती आणि एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो !
स्वर्गात शांती आणि उर्ध्वलोकी गौरव.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान २:१-१२
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा आरंभ केला."
गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, "त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही." येशू तिला म्हणाला, "बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही." त्याची आई चाकरांना म्हणाली, "हा तुम्हांला जे काही सांगेल ते करा." तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, "रांजण पाण्याने भरा" आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यातले काढून भोजनकारभाऱ्याकडे न्या." तेव्हा त्यानी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजनकारभाऱ्याने चाखले. (मात्र तो द्राक्षरस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते पण पाणी काढणाऱ्यांना ठाऊक होते.) तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला, “प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले की मग नीरस वाढतो, तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे." येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा प्रारंभ करून आपले वैभव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ आणि त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले, परंतु तेथे फार दिवस राहिले नाहीत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: परमेश्वर आणि इस्राएली लोक ह्यांच्यामधील नातेसंबंधांशाठी बायबलमध्ये विविध प्रतिमा व प्रतिके वापरण्यात आलेली आहे : मेंढपाळ व मेंढरे, राजा व प्रजा, पिता व लेकरे, निर्माता व निर्मिती, पती व पत्नी. त्यापैकी पती व पत्नी हे प्रतिक वापरून होशेयासारख्या संदेष्ट्याने परमेश्वर व इस्राएल ह्यांच्यातील करारसंबंध हा विवाह साक्रामेंतासारखा आहे असे दर्शविण्याचा प्रयत्न केला. मूर्तिपूजा हे व्यभिचारासारखेच पाप आहे. कारण मूर्तिपूजेमध्ये आपला पती असलेल्या परमेश्वराला सोडून इस्राएल ही वधू इतर दैवतांची पूजा करीत होती. परमेश्वराला ही पूजा खपणारी नव्हती. त्याने नैसर्गिक साधनसंपत्ती आखडून धरण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याने लोकांना बाबिलोनच्या हद्दपारीत पाठवले. तिथे शुद्ध झालेली जनता येरुशलेमला परतल्यानंतर येरूशलेमचे मंदिर पुन्हा उभारण्यात आले. परमेश्वराशी असलेला प्रेमाचा नातेसंबंध पुन्हा नव्याने कार्यरत झाला. ह्या पार्श्वभूमीवर आजच्या उपासनेतील तीन वाचने वाचली तर आपल्याला पुढील तीन मुद्द्यांवर चिंतन करता येते.
१. परमेश्वर आपला प्रेमकरार सदा स्मरतोः नवरा जसा नवरीला पाहून हर्ष करतो तसा परमेश्वर आपली वधू इस्त्राएल हिला पाहून आनंदित होतो, असे संदेष्टा यशया आजच्या पहिल्या वाचनात जाहीर करतो.
२. हा प्रेमकरार सार्वजनिक हितासाठी असतो : परमेश्वर मानवाशी जेव्हा प्रेमकरार करतो तेव्हा तो केवळ एका व्यक्तीच्या वैयक्तिक लाभासाठी नसतो, तर तो संपूर्ण समाजाच्या, ख्रिस्तसभेच्या हितासाठी असतो. आजच्या दुसऱ्या वाचनात नमूद केलेली पवित्र आत्म्याची दाने ही त्या व्यापक स्वरूपाच्या कराराचीच प्रतिके आहेत.
३. हा प्रेमकरार ख्रिस्तामध्ये कळसाला पोहाचतो : ख्रिस्तसभा ही वधू आणि ख्रिस्त हा साक्षात वर आहे. तो आपल्या वधूसाठी आपले सर्वस्व अर्पण करतो. काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षारस करून तो ह्या प्रेमकराराला एक नवा अर्थ देतो. एकीकडे मानवाच्या अडचणी दुसरीकडे परमेश्वराचे सामर्थ्य. ह्या दोहोंना जोडणारा दुवा म्हणजे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या केवळ उपस्थितीने मानवाच्या समस्यांचे ओझे हलके बनते.
आत्मपरीक्षण : परमेश्वराचे माझ्याशी असलेले नाते सूचित करण्यासाठी मी कोणते प्रतिक वापरू शकेन? हे नाते भक्कम करण्यात कोणकोणत्या गोष्टी अडथळारूप ठरतात? त्यावर मात करण्यासाठी मी काय काय करू शकेन ?
प्रार्थना : हे पवित्र मरिये, तुझ्या आज्ञेचे पालन करण्यास व प्रभू येशूची वाणी ऐकण्यास कृपा मिळावी म्हणून आम्हासाठी विनंती कर, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या