Marathi Bible Reading |Wednesday 19th January 2022 | 2nd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील दुसरा  सप्ताह

ख्रिस्ती ऐक्य सप्ताह 

बुधवार     दि. १९ जानेवारी  २०२२
✝️ 
"त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला."


✝️

संत केनेथ-
राजा, रक्तसाक्षी (१०८६)

 त्याच्या कारकीर्दीच्या सहाव्या वर्षी डेन्मार्कमध्ये मोठी बंडाळी माजली. बंडखोरांनी राजा केनेथ, त्याचा भाऊ बेनेडिक्ट आणि इतर १७ जणांना संत आल्बनच्या ख्रिस्तमंदिरात पवित्र मिस्सा सुरू असताना घेराव घातला आणि त्यांच्यावर क्रूर हल्ला चढविला व त्यांची अमानुष हत्या केली. महाराजा केनेथला वेदीच्या पायथ्याशी कापून टाकण्यात येत होते. त्यावेळी त्याने आपले हात उंचावले आणि देवाने आपल्या शत्रूंना क्षमा करावी म्हणून तो प्रार्थना पुटपुटू लागला आणि त्यातच त्याचा अंत झाला. त्याच्या खाचेवर घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे त्याचे पावित्र्य सिद्ध झाले आणि एक प्रापंचिक, राजकीय व्यक्ती असूनही ख्रिस्ती श्रद्धेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या राजा केनेथ ह्याला देऊळमातेने संतपदाचा नजराणा बहाल केला.

ख्रिस्ताने वाळलेल्या हाताच्या माणसाला त्यांच्यामध्ये उभे केले, 'उठ, मध्ये उभा  राहा, हात लांब कर' त्याने हात लांब केला आणि तो माणूस बरा झाला. प्रभू  जीवनाचा स्वामी आहे आणि त्याच्या केवळ शब्दाने तो आपल्याला बरे करु  शकतो.
प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे सेवाकार्य करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपविलेली आहे. शब्बाथा ऐवजी आपण प्रभूचा दिवस रविवार पवित्र पाळत असतो. रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानात सहभागी होणे, देव शब्दाचे ज्ञान प्राप्त करुन घेणे आणि शब्दाद्वारे व आचरणाद्वारे देवाचा शब्द कृतीत उतरवणे प्रत्येक ख्रिस्ती माणसांकडून अपेक्षित आहे. 
आपण आज चिंतन करु या  की रविवार खरोखरच आपण पवित्र पाळतो का? केवळ स्वार्थ न पाहता  इतरांच्या भल्यासाठी आपण कार्यरत बनणे गरजेचे आहे. समाजातील ढोंगी व भ्रष्टाचारी माणसांकडे दुलर्क्ष करुन आपण सत्कृत्ये करण्यासाठी प्रभूकडे प्रेरणा मागू या. 


✝️   

पहिले वाचन १ शमुवेल १७:३२-३३,३७,४०-५१
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन

“दावीदने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली. " दावीद शौलला म्हणाला, "त्या पलिष्ट्यामुळे कोणीही माणसाने मन कचरू नये, आपला हा दास जाऊन त्याच्याशी लढेल." शौल दावीदला म्हणाला, "ह्या पलिष्ट्याशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे." दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या आणि अस्वलाच्या पंजांतून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातातून सोडवील." तेव्हा शौल दावीदला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो!" मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला.

तिकडे तो पलिष्टीही दावीदच्या जवळ आला. त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता. त्या पलिष्ट्याने दावीदला न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला, तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा आणि सुकुमार होता. तो पलिष्टी दावीदला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्यापुढे आला आहेस?" त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दावीदला शिव्याशाप दिले. तो दावीदला म्हणाला, “असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यांस आणि वनपशूंस देतो." तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तरवार, भाला आणि बरची घेऊन माझ्यावर चालून आला आहेस; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस, त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन आणि तुझे शीर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांस आणि वनपशूंस देईन; तेव्हा इस्राएलमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला विदित होईल आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की, परमेश्वर तरवारीने आणि भाल्याने विजयी होतो असे नाही; कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हांला आमच्या हाती देईल."

मग तो पलिष्टी उठून दावीदशी सामना करण्यासाठी जवळ आला, तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करण्यासाठी सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. दावीदने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गरगर फिरवून पलिष्ट्याच्या मस्तकावर असा मारला की, तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथा पडला. या प्रकारे दावीदने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला; दावीदच्या हाती तरवार नव्हती. दावीदने धावत जाऊन त्या पलिष्ट्याच्या छातीवर पाय दिला आणि त्याचीच तरवार म्यानांतून काढून त्याला ठार करून त्याचे शीर छेदले. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून पलिष्टी पळून गेले.


हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १४४:१-२,९-१० 
प्रतिसाद :  परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला माझा धन्यवाद असो. 

१) परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला माझा धन्यवाद असो; 
तो माझ्या बाहूंना युद्ध करावयास शिकवतो, 
माझ्या हातांना लढावयास शिकवतो.

२) तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, 
माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे; 
मी त्याचा आश्रय धरतो. 
तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करतो.

३) हे देवा, मी तुला नवे गीत गाईन, 
दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्र गाईन. 
तूच राजांना विजय देणारा आहेस, 
तूच आपला सेवक दावीद ह्याला मुक्त करणारा आहेस..


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो,
मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू बाळकांस प्रगट केल्या.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क   ३:१-६

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"शब्बाथ दिवशी जीव वाचवणे सशास्त्र आहे काय ?"

येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बाथ दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहावयास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “असा पुढे ये." मग तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यातून कोणते सशास्त्र आहे ?" पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले आणि त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर." त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परुशी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा ह्याविषयी लागलीच हेरोदियांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशू लोकांचे भले करण्यात रात्रंदिवस गुंतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने वरवरून धार्मिकपणाचा आव आणणारे परुशी लोक येशूच्या चांगल्या कार्यात अडचणी निर्माण करण्यात गुंतलेले आहेत. एवढेच नाही तर येशूचा काटा काढून त्याचे परहिताचे कार्यच संपुष्टात आणण्याचा कट रचताना आपण पाहातो. हेवा व द्वेष हे दुर्गुण माणसांना चांगुलपणाच्या सर्व सीमा कशी ओलांडायला लावतो ह्याचे ज्वलंत उदाहरण आजच्या शुभवर्तमानात आपण पाहातो. अशाच धर्तीची उदाहरणे आपल्याला आजही कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात पाहावयास मिळतात. एका भावाची प्रगती होत असताना पाहून दुसऱ्या भावाला आनंद व्हायला हवा, सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याची प्रशंसा होताना पाहून त्याच्या सहकाऱ्यांना गर्व अभिमान वाटायला हवा पण नेहमीच तसे घडत नाही व त्यामुळे कुटुंबात आणि संस्थामध्ये तणावाचे वातावरण आपल्याला पाहावयास मिळते. आपण अशा चुकीच्या वागण्याचे अनुकरण करू नये आणि जे अनुकरण करतात त्यांच्याशी आपले कितीही घनिष्ट नाते असले तरी त्यांची आपण पाठराखण करू नये.

प्रार्थना :  हे प्रभो, तुझ्या शब्दाप्रमाणे व तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्यास व  सत्कृत्ये करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या