सामान्यकाळातील दुसरा सप्ताह
ख्रिस्ती ऐक्य सप्ताह
गुरुवार दि. २० जानेवारी २०२२
✝️
अशुद्ध आत्मे त्याला पाहात तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत, "तू देवाचा पुत्र आहेस.
✝️
संत सेबेस्टीयन
रक्तसाक्षी (२८८)
रोम शहरात रक्तसाक्षी बनलेल्या अनेक रक्तसाक्ष्यांविषयीची माहिती ह्या अलौकिक नगराला लागलेल्या एका भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट झालेली आहे. संत सेबेस्टीयन ह्यांच्याविषयीची माहिती देखील अशाच रितीने नाहीशी झाली. तो रोम शहरातच रक्तसाक्षी झाला आणि तिथेच त्याला पुरण्यात आले. ह्याचा पुरावा मात्र मागे उरलेला आहे.सेबेस्टीयन हा मिलान शहराचा रहिवासी होता. डायक्लोशिअन ह्या ख्रिस्ती लोकांचा कर्दनकाळ ठरलेल्या सम्राटाचा तो लाडका होता. त्याने त्याला अतिशय मोक्याच्या ठिकाणी पहारेकरी म्हणून नेमलेले होते. गुप्तपणे तो आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचे जतन करीत असे. ही सर्व माहिती पाचव्या शतकापासून आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. मात्र ती काही अंशी मौखिक परंपरेद्वारे चालत आलेली असण्याचा व खरी असण्याचा इतिहासकारांचा अंदाज आहे.
धर्मसुधारकांच्या काळात (पंधरावे शतक) संत सेबेस्टीयन एका वधस्तंभाला बांधलेला आणि त्याच्या शरीरावर, छातीत, गुडघ्यांवर बाण घुसलेले एका युवकाचे चित्र सापडले. त्यावरून तो धर्मासाठी रक्तसाक्षी बनल्याचे ख्रिस्ती परंपरा मानते..
इ. स. ६८० साली रोम शहरात, १५७५ साली मिलान शहरात आणि १५९९ साली पोर्तुगालमधील लिस्बन शहरात फैलावलेल्या प्लेगसारख्या जीवघेण्या रोगापासून बचाव व्हावा म्हणून त्याचा धावा करण्यात आला. म्हणून प्लेग ग्रस्त लोकांचा, गावांचा तो आश्रयदाता संत मानला जातो.
चिंतन : जे आत्मे ख्रिस्ताच्या जवळ जाण्यास धडपडत असतात त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सैतान आपली संपूर्ण शक्ती पणाला लावीत असतो. अशा आत्म्यांना पुन्हा देवाकडे आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या परिश्रमाबद्दल आपण मुळीच कुरकूर करू नये. - संत सेबेस्टीयन
पहिले वाचन १ शमुवेल १८:६-९,१९:१-७
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझा बाप शौल तुला मारून टाकावयास पाहत आहे."
गोलायथ ह्या पलिष्ट्याचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्राएलच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ आणि झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात आणि नाचत शौल राजाला सामोन्या आल्या. नृत्य रणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने म्हणत :
“शौलने हजारो वधिले, " “दावीदाने लाखो वधिले."
हे ऐकून शौल राजाला फार क्रोध आला, हे त्यांचे शब्द त्याला आवडले नाहीत. तो म्हणाला, “त्यांनी दावीदला लाखांचे यश दिले आणि मला केवळ हजारांचे यश दिले. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळावयाचे ते काय राहिले ?" त्या दिवसापासून पुढे शौलने दावीदवर डोळा ठेवला.
शौलने आपला पुत्र योनाथान आणि आपले सर्व सेवक यांना सांगून ठेवले की, दावीदला मारून टाकावे. पण शौलचा पुत्र योनाथान याचे दावीदवर फारच मन बसले होते, म्हणून योनाथानने दावीदला सांगितले, "माझा बाप शौल तुला मारून टाकावयास पाहत आहे, तर तू सकाळपर्यंत सावध ऐस आणि एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा. ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईन आणि त्याच्यापाशी तुझी गोष्ट काढीन. मला काही कमीजास्त दिसले तर मी ते तुला कळवीन." योनाथानने आपला बाप शौल याच्यापाशी दावीदची प्रशंसा करून म्हटले, "राजाने आपला दास दावीद याच्याशी गुन्हेगारी करू नये; कारण त्याने आपला काही अपराध केला नाही, उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत. त्याने आपले शीर हातावर घेऊन त्या पलिष्ट्याचा संहार केला आणि परमेश्वराने इस्रायलचा मोठा उद्धार केला हे पाहून आपणाला आनंद झाला, असे आहे तर आपण दावीदला विनाकारण मारून निर्दोष्याचा खून केल्याचे पाप का करता ?" शौलने योनाथानचे म्हणणे मान्य केले. त्याने आणभाक करून म्हटले, "परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याला जिवे मारायचे नाही." योनाथानने दावीदला बोलावून आणून या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग योनाथानने दावीदला शौलकडे नेले आणि तो पूर्वीप्रमाणे शौलच्या सेवेस राहिला.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५६:२-३,९-१०,१२-१४
प्रतिसाद : प्रतिसाद देवावर मी भरवसा ठेवला आहे,मी भिणार नाही.
१ )हे देवा माझ्यावर दया कर,
कारण माणसे मला तुडवीत आहेत;
दिवसभर माझ्याशी लढून त्यांनी माझा छळ मांडला आहे.
दिवसभर माझे शत्रू मला तुडवीत आहेत,
माझ्याशी मग्रूरीने लढणारे बहुत आहेत.
२) माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत.
माझी आसवे तू आपल्या बुधल्यात भरून ठेवली आहेत.
(तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय ?)
मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील.
३) देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो.
देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन,
परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनांची प्रशंसा करीन.
देवावर मी भरवसा ठेवला आहे.
मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?
४) हे देवा, तुझ्या नवसांचे ऋण माझ्यावर आहे.
मी तुला आभाररूपी अर्पणे वाहीन.
कारण तू माझा जीव मरणापासून रक्षिला आहे,
जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे
म्हणून पतनापासून तू माझे पाय रक्षिले आहेत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ३:७-१२
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"अशुद्ध आत्मे म्हणत, तू देवाचा पुत्र आहेस! परंतु येशू त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, मला प्रगट करू नका. "
येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय त्याच्या मागोमाग निघाला. जी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून यहुदिया, येरुशलेम, इदोम, आणि यार्देनच्या पलीकडचा प्रांत आणि सोर आणि सिदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यातून मोठा समुदाय, त्याच्याकडे आला. त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पीडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडत होते. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरुन जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले; जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहात तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत, "तू देवाचा पुत्र आहेस." तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, “मला प्रकट करू नका."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशूच्या मागे लोकांच्या झुंडीच्या झुंडी जात होत्या ह्या पार्श्वभूमीवर आज काय घडत आहे ह्यावर चिंतन करण्याची आपल्याला गरज आहे. आज ही समाजात अशी माणसं आहेत की जी। |आपल्या चांगल्या वागण्यामुळे लाखो लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतात. मात्र सामाजिक संस्थांच्या व इतर निवडणुकांच्या वेळी पैसे चारून, दारू पाजून किंवा प्रमोशन देण्याची आश्वासने देऊन आपल्या पाठीशी पुष्कळ लोक आहेत व त्यामुळे आपण निवडून येण्यास पात्र आहोत असा खोटा आभास निर्माण करणारी माणसे आजच्या समाजाला कलंकित करणारी प्रथा निर्माण करू पाहातात. हे आपण पाहातो आणि अशा माणसांनी दाखविलेल्या प्रलोभनांना भुलून त्यांना पाठिंबा देऊन काही माणसे आपण विकाऊ आहोत असे दाखवून आपल्या घरातल्या माणसांसमोर आणि समाजासमोर आपली पत कमी करून घेतात हेही आपण पाहातो. माणसाने आपली पात्रता पले आचरण चांगले ठेवून सिद्ध करावयाची असते. आजच्या शुभवर्तमानात येशूचे जीवन आपल्याला हेच शिकविते. रात्रंदिवस तो चांगलेच करीत होता म्हणून लोक त्याचे ऐकण्यासाठी व त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने त्याच्या भोवती गर्दी करीत होते.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या संपूर्ण जीवनाचा ताबा घे, तूच आमचा स्वामी व ईश्वर आहेस, आम्हाला योग्य ते कृपादान देऊन आशीर्वादित कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या