सामान्यकाळातील दुसरा सप्ताह
ख्रिस्ती ऐक्य सप्ताह
शुक्रवार दि. २१ जानेवारी २०२२
✝️
“प्रभू येशूने बारा जणांची नेमणूक केली. ".
✝️
रोमची संत आग्नेस
- कुमारिका, रक्तसाक्षी (२४६-२५८)
संत आग्नेस ही शुद्धतेची आणि सर्वसाधारणपणे युवतींची आश्रयदाती संत आहे. कितीतरी मोहांवर मात करून, धमक्या-आणि हाल ह्यांना न जुमानता अगदी संयमाने व सौजन्याने ही बारा वर्षांची बालिका अत्याचाराला सामोरी गेली. मात्र तिने आपल्या कौमार्याला कुठलाही तडा जाऊ दिला नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तिची श्रद्धा ह्याही प्रतिकूल अवस्थेत अभंग आणि अखंड राहिली. बागेची निगा राखणारे माळीसुद्धा ह्या देवाघरच्या निष्पाप फुलाला संत आग्नेस हिला आपली आश्रयदाती संत मानतात.
संत आग्नेस हिच्या जीवनाविषयी अशी एक घटना प्रचलित आहे. रोमच्या सम्राटाचा मुलगा आग्नेसच्या प्रेमात पडला. सम्राटाने या मुलीला आपल्या भेटीसाठी बोलावले. परंतु सम्राट मूर्तिपूजक असल्याने आग्रेसने त्याची सून होण्यास नकार दिला. राजाला तो अपमान सहन झाला नाही. तिला धगधगत्या अग्नीकुंडात फेकून देण्यात यावे असा आदेश देण्यात आला. त्यामुळे तिचे कोवळे शरीर बेचिराख होईल अशी राजाला खात्री वाटत होती. परंतु ज्या क्षणी आग्नेसला अग्निकुंडात फेकून देण्यात आले त्याचवेळी अग्निकुंड विझले. मोठ्या विजयी चेहऱ्याने आग्रेस पुन्हा उठून उभी राहिली. यापुढे मी केवळ ख्रिस्ताचीच वधू असणार आहे, असे तिने जाहीर करताच राजाने दुसरा आदेश दिला. तीन-चार तरुण आपल्या हातात तळपत्या तरवारी घेऊन पुढे सरसावले परंतु त्यांना न डगमगता आग्नेस बोलली, "तुम्ही आपली तरवार कदाचित माझ्या रक्ताने कलंकित करून घ्याल, परंतु ख्रिस्ताला अर्पण केलेल्या माझ्या पवित्र देहाला तुमच्या वासनामय स्पर्शाने कधीही कलंकित करू शकणार नाहीत."
दरवर्षी २१ जानेवारी ह्या दिवशी तिच्या निरागस वृत्तीचे जिते जागते प्रतीक म्हणून दोन लहान कोकरे तिच्या नावाने उभारण्यात आलेल्या महामंदिरातील वेदीवर आशीर्वादित केली जातात आणि पोपमहाशयांना अर्पण केली जातात. ह्याच कोकरांच्या लोकरीपासून पुढे आर्चबिशप म्हणून नव्याने नेमणूक होणाऱ्या बिशपांसाठी पाल्लीया (PALLIAM) हे अंगवस्त्र तयार केले जाते व पोपमहाशय एका मोठ्या सोहळ्याच्या प्रसंगी ते आर्चबिशपांना प्रदान करतात. त्याद्वारे पोपमहाशय आर्चबिशपांना आपल्या गौरवशाली कार्यात सहभागी करीत असल्याचे दर्शवितात.
चिंतन : “तुम्ही आपली तरवार कदाचित माझ्या रक्ताने कलंकित करून घ्याल. परंतु ख्रिस्ताला अर्पण करण्यात आलेल्या माझ्या पवित्र देहाला तुमच्या वासनामय स्पर्शाने तुम्ही कंलकित करू शकणार नाहीत.” - संत आग्नेस.
मानवाच्या तारणाची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी परमेश्वराने सामान्य माणसांमधूनच अनेकांना पाचारण केले. आब्राहाम, मोशे, शमुवेल, दावीद, यशया, यिर्मया असे अनेक मार्गदर्शक नेते, योहान बाप्तिस्ता वाटाड्या तसेच ध.कु. मरीया, ही सर्व साधी, सामान्य माणसे होती. देवाने त्याची विशेष कृपा व दाने देऊन त्यांच्या द्वारे आपले तारणकार्य सिद्धिस नेले.
देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी सामान्य लोकांचीच निवड केली. येशूने त्यांना भूते काढण्याचा अधिकार दिला. प्रेषितीय कार्यात प्रभूचे विशेष सामर्थ्य व अधिकार प्राप्त होत असतात. प्रभूने त्यांना उपदेश करण्यास पाठविले.
पाचारण ही दैवी हाक असते. येशूच्या सहवासात राहून त्याची कृपा व अनुकंपा अनुभवल्यावरच आरोग्यदानाचा व इतर देणग्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. सखोल ज्ञान व अनुभव प्राप्त झाल्यावरच देवाचा शब्द घोषित करता येतो.
पहिले वाचन १ शमुवेल २४:३-२१
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी त्याच्यावर अपला हात उगारणार नाही कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे."
शौल सर्व इस्राएलातून तीन हजार लोक निवडून घेऊन रानबकऱ्यांच्या खडकांवर दावीदच्या आणि त्याच्या लोकांच्या शोधास गेला. वाटेने जाताना तो एका मेंढवाड्यापाशी आला, तेथे एक गुहा होती; तिच्या आत शौल बहिर्दिशेस गेला. गुहेच्या अगदी आतल्या बाजूस दावीद आणि त्याचे लोक बसले होते. तेव्हा दावीदला त्याचे लोक म्हणाले, “परमेश्वराने आपणाला सांगितले होते, 'पाहा, मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर,' हे घडून येण्याचा दिवस आज प्राप्त झाला आहे." तेव्हा दावीदने उठून शौलच्या झग्याचा काठ हळूच कापून घेतला. नंतर शौलच्या झग्याचा काठ कापून घेतल्याबद्दल दावीदचे मन त्याला खाऊ लागले. तो आपल्या लोकांस म्हणाला, "मी आपल्या स्वामीवर, परमेश्वराच्या अभिषिक्तावर, आपला हात उगारावा अशी गोष्ट परमेश्वर माझ्याकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे." असे बोलून त्याने आपल्या लोकांस आवरले, त्यांस शौलवर हात टाकू दिला नाही. मग शौल गुहेतून निघून मार्गस्थ झाला.
नंतर दावीदही उठून गुहेतून बाहेर पडला आणि त्याने मागून शौलला हाक मारली, "माझे स्वामी महाराज।" शौलने मागे वळून पाहिले तेव्हा दावीदने खाली लवून त्यास मुजरा केला. दावीद शौौलला म्हणाला, "लोक म्हणतात की पाहा, 'दावीद आपला घात करू पाहत आहे, त्यांच्या बोलण्याकडे आपण का कान देता ? पाहा, आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की, परमेश्वराने आज गुहेत आपणाला माझ्या हाती दिले होते; आपणाला मारून टाकावे असे कोणी म्हटले, पण मी आपली गय केली. मी म्हटले, 'मी आपल्या स्वामीवर हात टाकू नये, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे.' शिवाय माझ्या पित्या, पाहा, माझ्या हातात आपल्या झग्याचा काठ आहे; आपल्या झग्याचा काठ मी कापून घेतला, पण आपणाला जिवे मारले नाही, यावरून खात्रीपूर्वक समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही. आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझा जीव घ्यावयास एकसारखे टपला आहा. परमेश्वर माझ्या तुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच माझ्याबद्दल आपले शासन करो; पण माझा हात आपणावर पडणार नाही. प्राचीन काळच्या लोकांची म्हण आहे, 'दुष्टांपासून दुष्टता उद्भवते' तर माझा हात आपणावर पडणार नाही. इस्राएलचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहा? एका मेलेल्या कुत्र्याच्या! एका पिसवेच्या! परमेश्वर न्यायाधीश आहे, तो माझ्या तुमच्यामध्ये निवाडा करो, माझे प्रकरण लक्षात आणून तो माझा कैवार घेवो आणि माझा न्याय करुन मला आपल्या हातून सोडवो."
दावीदने शौलशी जे बोलावयाचे होते ते संपविल्यावर शौल म्हणाला, "माझ्या पुत्रा दावीद, ही तुमची वाणी काय ?" आणि शौल हेल काढून रडू लागला. तो दावीदला म्हणाला, “तू माझ्याहून नीतिमान आहेस; तू तर माझ्याशी भलाईने वागलास, पण मी तुझ्याशी दृष्टाईने वागलो. तू माझ्याशी भलाईने वागलास याचे प्रमाण तू आज दाखवले आहे, कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले असून तू मला मारून टाकले नाही. कोणाच्या तावडीत त्याचा शत्रू सापडला तर तो त्याला सहीसलामत जाऊ देईल काय? म्हणून आज तू जे वर्तन माझ्याशी केले आहे त्याबद्दल परमेश्वर तुझे बरे करो. पाहा, मला हे ठाऊक आहे की, तू खात्रीने राजा होणार आणि इस्राएलचे राज्य तुझ्या हाती कायम राहणार.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५७:२-४,६,११
प्रतिसाद : हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर.
१) हे देवा, माझ्यावर दया कर,माझ्यावर दया कर.
कारण मी तुझा आश्रय घेत आहे.
अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय घेईन.
२) परात्पर देवाचा, माझे सर्व काही
सिद्धीस नेणाऱ्या देवाचा मी धावा करतो.
त्याने स्वर्गातून सहाय्य पाठवावे आणि मला तारावे,
माझा पिच्छा पुरविणाऱ्यांना लज्जित करावे.
देवाने आपली दया आणि सत्य पाठवावे.
३) हे देवा,आकाशाहून तू उन्नत हो;
तुझ्या गौरवाचे तेज पृथ्वीवर उजळो !
तुझी दया स्वर्गाला आणि
तुझे सत्य गगनाला भिडले आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ३:१३-१९
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्यांनी आपले साथीदार व्हावे अशी येशूची इच्छा होती त्यांना येशूने आपल्याकडे बोलावले."
येशू डोंगर चढून गेला आणि त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. त्यांनी आपणाबरोबर असावे आणि भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करावयास त्यांस पाठवावे, यासाठी त्याने ह्या बारा जणांची नेमणूक केली; शिमोन याला त्याने पेत्र हे उपनाव दिले; जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबचा भाऊ योहान ह्यांस बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले; आंद्रेया, फिलीप, बार्थोलोम्यू, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहुदा इस्कार्योत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: ज्या बारा प्रेषितांवर अवलंबून राहून येशूने कॅथोलिक चर्च विश्वाच्या अफाट समुद्रात लोटले त्या चर्चचा पाचही खंडात झालेला विस्तार पाहून व त्या बारा प्रेषितांची सामान्य पार्श्वभूमी पाहून परुशी लोकांतील शास्त्राध्यापक गमालिएल ह्याचे शब्द आठवतात. परुशांनी जेव्हा गमालिएलकडे प्रेषितांविरुद्ध तक्रार केली व त्यांना ठार मारण्याचा आपला इरादा जाहीर केला. तेव्हा गमालिएल त्यांना म्हणाला, “ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या. कारण त्यांचे कार्य मनुष्यांचे असेल तर ते नष्ट होईल परंतु ते कार्य देवाचे असेल तर तुम्हाला ते नष्ट करता येणार नाही. (प्रे. कृ. ५:३३-३९). कट्टर नावाजलेला प्रॉटेस्टंट इतिहासकार लॉर्ड मेकॉले जणू काय ख्रिस्तीतर गमालिएलच्या शब्दांना पुष्टी देऊन म्हणतो की, कॅथोलिक चर्चवर झालेल्या अनेक हल्ल्यातून ते चर्च सहीसलामत बाहेर पडले ते पाहातां ते चर्च नष्ट होईल असे कदापिही कोणाला वाटणार नाही (Catholic Church Denis Meadows vii) लॉर्ड मकॉले आणि गमालिएल ह्या दोघांचेही शब्द दर्शवितात की येशूने केलेली बारा प्रेषितांची निवड ह्यावर देवाचे हस्ताक्षर होते.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी दैवी हाक ऐकून तुला अनुसरण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या