सामान्यकाळातील दुसरा सप्ताह
ख्रिस्ती ऐक्य सप्ताह
शनिवार दि. २२ जानेवारी २०२२
✝️
“(येशूला) त्याला वेड लागले आहे, असे त्यांचे म्हणणे होते. "
✝️
संत विन्सेंट पलोटीच्या उत्साहाची वेंग इतकी मोठी होती की त्यामध्ये जणू संपूर्ण जग, प्रत्येक आध्यात्मिक आणि ऐहिक गरज मावू शकली असती. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्यांनी धर्मगुरू / धर्मबंधू / प्रापंचिक इत्यादींसाठी "सोसायटी ऑफ कॅथलिक अपोस्टलेट” (फ्लोटियन्स) आणि मुलींसाठी “सिस्टर्स ऑफ कॅथलिक अपोस्टलेट" ह्या संस्था सुरू केल्या. आज प्रापंचिकांना ख्रिस्तसभेत जो सहभाग दिला जात आहे त्याचाच विचार १०७ वर्षापूर्वी फा. विन्सेंट पलोटी ह्यांनी केलेला होता.
पोप प्रायस अकरावे ह्यांनी त्याला ख्रिस्ती कार्याचा अग्रदूत आणि निष्ठावंत कार्यकर्ता अशा शब्दात गौरविले होते. फा. विन्सेंट ह्यांनी कामगारांची संघटना, कृषिविद्यालय, पतपेढी, अनाथालये, मुलींसाठी वसतिगृहे, अशा प्रकारचे सामाजिक प्रकल्पही राबविले. त्यांचा एक युवा मित्र पुढे पोप लिओ तेरावे ह्यांच्या रुपाने सामाजिक जीवनात अवतरला व त्यांनी “रेरुम नोवारुम” हे परिपत्रक लिहिले. त्यात कामगारांची आध्यात्मिकता व नैतिकता प्रकर्षाने वर्णन केलेली आहे.
वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी विन्सेंट ह्यांना २२ जाने. १८५० रोजी मृत्यू आला. शंभर वर्षानंतर पोप पायस बारावे ह्यांनी त्यांना धन्यवादित ही पदवी बहाल केली आणि मग लवकरच त्याची संतीकरणाची प्रक्रिया १९६३ साली पूर्णत्वास गेली. त्यावेळी दुसरी व्हॅटिकन विश्वपरिषद भरली होती.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू करीत असलेली अद्भूत कृत्ये आणि पसरवित असलेल्या देवराज्याविषयी त्याच्या आप्तजनांमध्ये असुरक्षितता आणि संशय निर्माण होतो. सामान्यजनांना शिकवण देत असताना आणि कार्य करीत असताना प्रभू येशू शास्त्री परुश्यांसारख्या धर्मपंडिताना जुमानीत नव्हता. तशातच येशू घरी आला असताना लोकांनी पुष्कळ गर्दी केली. येशूला जेवावयासाठी सवड मिळेना. तेव्हा आप्तजन त्याला धरावयाला निघाले, कारण त्याला वेड लागले आहे, असे त्यांचे म्हणणे होते. प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र होता आणि अखिल मानवांच्या तारणासाठी देवराज्य प्रस्थापित करण्यास आला होता. मात्र येशूला लोकांनी ओळखताना चूक केली. येशूवर अनेक प्रकारचे आरोप लावले गेले. येशूला जवळच्या लोकांनीच जणू नाकारले, मात्र येशूचे कार्य थांबले नाही तर ते अधिक जोमाने सुरु राहिले. येशूने सभोवतालच्या गावात देवाची सुवार्ता पसरविली.
प्रभू येशू जो स्वतः मार्ग, सत्य व जीवन आहे त्यावरील आपली श्रद्धा दृढबनवून त्याला शरण जाऊ या.
पहिले वाचन २ शमुवेल १:१-४,११-१२,,१७,१९,२३-२७
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"रणभूमीवर बलाढ्य कसे पतन पावले आहेत ते पाहा."
शौलच्या मृत्यूनंतर आणि दावीद अमालेक्यांचा संहार करून परत येऊन सिक्लाग येथे दोन दिवस राहिल्यावर, तिसऱ्या दिवशी शौल होता त्या छावणीतून एक माणूस आला; त्याने आपले कपडे फाडले होते आणि डोक्यात धूळ घातली होती. तो दावीदपाशी येऊन पोहचल्यावर त्याने त्यांस साष्टांग दंडवत घातले. दावीदने त्याला विचारले, "तू कोठून आलास?" तो त्यांस म्हणाला, "मी इस्राएलच्या छावणीतून निसटून आलो आहे." दावीदने त्यास विचारले, "कसे काय वर्तमान आहे ? मला सांग बरे." तो म्हणाला, “लोक रणभूमीवरून पळाले, पुष्कळ लोक पडले आणि प्राणास मुकले शौल आणि त्यांचा पुत्र योनाथान हेही प्राणांस मुकले.
हे ऐकून दावीदने आपली वस्त्रे धरून फाडली आणि जितके लोक त्याच्याबरोबर होते त्यांनीही तसेच केले. शौल, त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्राएलचे घराणे ही तरवारीने पडली म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले. मग दावीदने शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्यासंबंधाने पुढील विलापगीत गाईले:
"हे इस्राएल, तुझ्या शिरोमणीचा उच्च स्थानी वध केला आहे! बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत ! शौल आणि योनाथान प्रेमळ आणि मनमिळाऊ असत! जीवनात आणि मरणात त्यांचा वियोग झाला नाही; ते गरुडांहून वेगवान आणि सिंहांहून बलवान होते. इस्राएली कन्यांनो, शौलसाठी रुदन करा, तो तुम्हांला किरमिजी वस्त्रे लेववून शृंगारीत असे,
तो तुमच्या वस्त्रांवर सोन्याचे अंलकार घालीत असे. "पाहा, रणभूमीवर बलाढ्य कसे पतन पावले आहेत!" “योनाथान, तुझा उच्च स्थानी वध केला गेला आहे." “माझा बंधू, योनाथान, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे; तू माझ्यावर फार माया करत होतास. तुझे माझ्यावर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते." "पाहा बलाढ्य कसे पतन पावले आहेत, युद्धाची शस्त्रे कशी नाश पावली आहेत!"
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८०:२-३,५-७
प्रतिसाद : हे देवा, आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आमचे तारण होईल.
१) हे इस्राएलच्या मेंढपाळा, योसेफचा कळप चालवणाऱ्या,
माझी वाणी ऐक. जो तू करुबारूढ आहेस
तो तू आपले तेज एफ्राईम,
बन्यामीन आणि मनश्शे ह्यांच्यासमक्ष प्रकट कर.
हे प्रभो, तू आपला पराक्रम दाखव,
हे प्रभो, आमच्या सहाय्याला ये.
२) हे परमेश्वरा, सेनाधीश देवा,
तुझे लोक प्रार्थना करीत असता
तू कोठवर कोपायमान राहणार ?
तू त्यांना अश्रुरुप अन्न खावयास दिले आहे,
आणि त्यांना माप पुरे भरून आसवे
प्यावयास दिली आहेत. तू आम्हांला आमच्या शेजाऱ्यांच्या
चेष्टेला कारण करतोस,
आमचे वैरी आमचा यथेच्छ उपहास करतात.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ३:२०-२१
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“त्याला वेड लागले आहे, असे येशूच्या आप्तांचे म्हणणे होते. "
येशू घरी आला. तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, त्यांना जेवायलाही सवड होईना. हे पाहून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले, कारण "त्याला वेड लागले आहे "असे त्याचे म्हणणे होते.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: शाळेमध्ये समुपदेशनासाठी आलेल्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मी बोलत असताना तो विद्यार्थी म्हणाला, “एखादे शिक्षक किंवा धर्मगुरू आमच्या घरी येतात तेव्हा मी घरात राहात नाही कारण माझा मोठा भाऊ वेडा आहे ह्याची मला शिक्षकांसमोर व धर्मगुरूसमोर लाज वाटते, " ह्या अल्पवयीन मुलाचे शब्द ऐकल्यावर आपण कल्पना करू शकतो की स्वतःच्या कुटुंबाशी संबंधीत असलेल्या माणसांनी लोकांसमोर येशूची गणना वेड्या माणसात केली तेव्हा पवित्र मरियेला |आणि खुद्द येशूला किती तीव्र वेदना झाल्या असतील, असे प्रसंग इतरांचे भले करणाऱ्या अनेक चांगल्या माणसांवर किंबहुना आपल्यावरही येऊ शकतात. कोविड संक्रमणाच्या काळात आपण पाहिले की आपला जीव धोक्यात घालून रोग्यांची सेवा करणाऱ्या माणसांना वेड्यात काढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले. असे प्रसंग आपण डोळ्यांदेखत पाहातो तेव्हा आपली भूमिका काय असावी? काही माणसे रागाच्या भरात किंवा त्यांच्या विचित्र स्वभावामुळे चांगल्या माणसांचा छळ करतात तेव्हा आपण जर अशा विचित्र माणसांवर हात उचलला किंवा त्यांना अद्वातद्वा बोलत राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय! अशा नाजूक प्रसंगी वाईट तऱ्हेने वागणाऱ्या माणसांशी भांडण करण्याऐवजी आपण अपमानित झालेल्या माणसांना दिलासा देण्याचे काम करणे हाच शहाणपणा ठरेल.
प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनाचा स्वामी म्हणून तुला स्वीकारण्यास व तुला अनुसरण्यास कृपा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या