Marathi Bible Reading | 3rd Sunday in Ordinary Time | 23th January 2022 | Sunday of the word of God

सामान्यकाळातील तिसरा  रविवार  

 दि. २३ जानेवारी  २०२२

प्रभूच्या शब्दाच्या रविवार 

✝️ 
 “दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे."

✝️

"हा शास्त्रलेख आज पूर्ण झाला आहे."
 

बंदिवासातून परतलेल्या जनतेने त्यांच्यावर झालेल्या अन्याय,  अत्याचाराबद्दल विचार करु नये, तर देवाला धन्यवाद द्यावेत असा सल्ला नेहेम्या संदेष्ट्याने इस्त्राएली जनतेला दिला. विशेषत: नेहेम्याने एज्रा व लेवी ह्यांच्या  सोबत शास्त्र पठन करुन इस्त्राएली जनतेचे सांत्वन केले. प्रभूचा दिवस पवित्र  पाळून आनंद करण्यासाठी इस्त्राएली जनतेला आजच्या पहिल्या वाचनात  आवाहन करण्यात आले आहे.

 प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गराज्य प्रस्थापित  करण्याची घोषणा केल्यापासून तर कालवरीवरील बलिदानापर्यंतच्या कालावधीत अखिल मानवांच्या मुक्ततेसाठी सेवाकार्य केले. देवाची सुवार्ता व देवाच्या कृपेच्या ज्ञानाचा उलगडा केला. त्याच्या शिकवणुकीद्वारे व सत्कृत्याद्वारे त्याची वाणी प्रत्यक्षपणे अनेकांच्या जीवनात साकारली. आपण  त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे अवयव आहोत. आपल्या सर्वांचा बाप्तिस्मा प्रभू येशूच्या नावाने झाला आहे. आपल्या सर्वांना पिता, पुत्र व पवित्र आत्म्याने अभिषिक्त करण्यात आले आहे. आपल्या कुटुंबात, शेजोळात, समाजात व परिसरात अजूनही जे  बंदिवासात आहेत, अन्याय अत्याचाराने भरडले जात आहेत व देवापासून दूर आहेत अशा सर्वांना प्रभू येशूची सुवार्ता जाहीर करण्यासाठी आपल्याला  पाचारण करण्यात आलेले आहे. 

✝️   

पहिले वाचन नेह्म्या  ८:२-६,८-१०
वाचक नहेम्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
"एजाने देवाच्या शास्त्रग्रंथातून वाचन वाचले आणि ते वाचन लोकांस चांगले समजले."

मंडळीतील स्त्रीपुरुषांपुढे आणि ज्यांस ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटेपासून दोन प्रहरपर्यंत पाणीवेशीसमोरच्या चौकात स्त्रीपुरुषांपुढे आणि ज्यांस ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एज्रा शास्त्री उभा राहिला. एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडला; तो सर्वांहून उंच ठिकाणी उभा होता त्यामुळे एज्रा सर्वांस दिसला, त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर याला धन्यवाद दिला आणि सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन, आमेन" असे म्हटले आणि आपली डोकी लववून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वराला वंदन केले. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला. वाचले तेवढे लोकांस चांगले समजले. मग प्रांताधिपती नहेम्या, याजक एज्रा, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, “हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्याप्रीत्यर्थ पवित्र आहे. तर शोक करू नका: कारण ते लोक नियमशास्त्रातली वचने ऐकून रडू लागले होते, तेव्हा त्याने त्यांस सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा, गोडगोड पेये प्या आणि ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १९:८-१०,१५
प्रतिसाद : तुझी वचने, हे प्रभो, ही आत्मा आणि जीवन अशी आहेत.

१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, 
ते मनाचे पुनरुज्जीवन करते. 
परमेश्वराचे नियमशास्त्र विश्वसनीय आहे, 
ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते.

२) परमेश्वराचे आदेश सरळ आहेत, 
ते हृदयाला आनंदित करतात. 
परमेश्वराची आज्ञा चोख आहे,
 ती नेत्रांना प्रकाश देते.

३) परमेश्वराचे भय विशुद्ध आहे, 
ते सर्वकाळ टिकणारे आहे. 
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, 
ते सर्वथैव न्याय्य आहेत.

४) हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, 
माझ्या तोंडचे शब्द आणि 
माझ्या मनातले विचार तुला मान्य असोत.

दुसरे वाचन  १करिंथकरास १२:१२-३०
वाचक : पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

“तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहा.

(बंधुनो, जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणज एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे.) जर पाय म्हणेल, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही," तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर नाकच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरुप अंगास सुरूपता मिळते, आपल्या सुरूप अंगाला अशी गरज नाही. जे उणे आहे त्याला विशेष मान मिळावा अशा रीतीने शरीर जुळवले आहे; शरीरात "फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते, एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. (तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहा) तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्नभिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय?
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
परमेश्वराने दीनांस सुवार्ता सांगण्यास, धरून नेलेल्यांची सुटका ह्यांची घोषणा करण्यात मला पाठवले आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक १:१-४, ४:१४-२१

वाचक :      लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"हा शास्त्रलेख आज पूर्ण झाला आहे."

ज्या गोष्टीसंबंधाने आपली पूर्ण खात्री झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्षात पाहणारे लोक आणि वचनाचे सेवक ह्यांनी आम्हास सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे. ह्यास्तव, थियफील महाराज, मलाही वाटले की, सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या; ह्यासाठी की, ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. 

नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला आणि त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णीत.

मग ज्या नाझरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथेतो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जो भाग काढला त्यात असे लिहिले होते:

“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी." यासाठी त्याने मला पाठवले आहे.

मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला, "हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: सामान्यकाळातील तिसरा रविवार हा देवशब्द रविवार म्हणून पाळण्यात यावा असे पोप फ्रान्सिस ह्यांनी इसवी सन २०१९साली जाहीर केले होते. आजच्या वाचनांमध्ये धर्मगुरूच्या मुखाद्वारे परमेश्वर आपल्या लोकांशी कसा बोलत असतो ते आपल्याला दिसून येते. 
१. धर्मगुरू देवाच्या नावाने दुःखितांचे सांत्वन करतोः देवाचा शब्द आरोग्यदायी, जीवनदायी, मुक्तीदायी आणि आशादायी असतो. असे शब्द उच्चारून धर्मगुरू दुःखी, पीडित, रंजल्या-गांजलेल्या लोकांचे सांत्वन करीत असतात. आजच्या पहिल्या वाचनात शोकग्रस्त इस्राएली लोकांना एज्रा, हा याजक व शास्त्री धीर व दिलासा देताना आढळतो. लोकांनी आपापल्या घरी जाऊन गोडधोड करून आनंद साजरा करावा, ज्यांच्याकडे नसेल त्यांनाही थोडेफार द्यावे, शोक करू नये तर प्रभुठायी आनंद करावा म्हणून तो त्यांना प्रोत्साहीत करतो. 
२. धर्मगुरू देवाच्या नावाने लोकांसमोर उभा राहतो : आजच्या दुसऱ्या वाचनात आध्यात्मिक दानांची यादी सादर करताना संत पौल शिक्षकांचा उल्लेख करतो. हे शिक्षक भौतिक वा जागतिक दृष्टीने नव्हे तर आध्यात्मिक दृष्टीने लोकांना देवाचे मार्ग शिकवितात. धर्मगुरूदेखील परमेश्वराच्या नावाने लोकांसमोर उभे राहून त्यांना परमेश्वराच्या योजना समजावून देतात. 
३. धर्मगुरू लोकांच्या नावाने देवासमोर उभे राहतात: शुभवर्तमानकार लूक स्वतः आपल्या पुस्तकाची पार्श्वभूमी देतो, आणि येशूचे नाझरेथ येथील सभास्थानातील पहिले प्रवचन सादर करतो. सभास्थान हे प्रार्थनेचे ठिकाण होते. इथे बळी सादर केले जात नसत. इथे फक्त शिक्षण दिले जाईल. येशू आपल्या परिपाठाप्रमाणे ह्या सभास्थानात प्रार्थनेसाठी जातो. तेव्हा तो लोकांच्या नावाने देवासमोर उभा राहतो. आंधळे, बंदिवास, पीडलेले, कर्जबाजारी अशा सर्वांच्या वतीने तो देवाची योजना लोकांना समजून देतो. ही योजना आपल्यामध्ये आता प्रकट झालेली आहे असा दावा करतो.

आत्मपरीक्षण : धर्मगुरूंच्या मुखातून बाहेर पडणारे देवशब्दाचे स्पष्टीकरण मला कितपत भावते? त्या शब्दाला मी कसा प्रतिसाद देतो ? धर्मगुरू व लोक ह्यांच्या एकमेकांपासून काय काय अपेक्षा आहेत असे मला वाटते ?

प्रार्थना : प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. तुझी सुवार्ता पसरविण्यास मला प्रेरणा  व आत्मिक बळ दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या