Marathi Bible Reading | Monday 24nd January 2022 | 3rd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील तिसरा  सप्ताह

सोमवार  दि. २४ जानेवारी  २०२

✝️ 
“आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही.”


✝️


संत फ्रान्सिस डि सेल्स
• महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५६७-१६२२)

 फ्रान्समधील सेव्हॉय या डच कॉलनीतील सेल्सच्या राजवाड्यात फ्रान्सिस ह्याचा जन्म झाला. त्याला सहा भाऊ होते. वयाच्या २५ व्या वर्षी त्याने पादुआ येथे कायद्याच्या विषयात डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. परंतु पुढच्याच वर्षी त्याला देण्यात आलेली “सिनेटरशीप" त्याने परत केली आणि कायद्याचे क्षेत्र सोडून त्याने आपल्या वडिलांच्या विरोधाची तमा न बाळगता धर्मगुरू होण्याचा निश्चय केला.जिथे जिथे फ्रान्सिस गेला तिथे तिथे लोकांची कुमसारं ऐकणे, प्रवचन देणे, धार्मिक व्रतस्थ संस्थांच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणणे, साध्यासोप्या भाषेत युवक आणि प्रौढ ह्यांना धर्मशिक्षण देणे, धर्मगुरूंसाठी वार्षिक तपसाधना आणि धर्मपरिषदा भरविणे अशा प्रकारचे कार्यक्रम ते राबवित असत. पुढे पुढे ते छोटीछोटी प्रवचने द्यायला लागले. त्यांच्या मते 'तुम्ही जितके अधिक बोलता तितके लोकांना कमी आठवते. त्यामुळे प्रवचन देताना आपण प्रत्यक्ष जीवनात देखील किती प्रेमळ व मायाळू आहोत त्यावर प्रवचनाचा परिणाम अवलंबून असतो.'
चिंतन : प्रेमाविना बोललेल्या शब्दापेक्षा सौजन्यपूर्ण धारण केलेले मौन कितीतरी पटीने श्रेष्ठ असते. संत फ्रान्सिस डि सेल्स


 प्रभू येशू दैवी सामर्थ्यांने अद्भुत चमत्कार करित होता. प्रभू येशूने त्यांना सांगितले, 'आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही.' म्हणजेच भूतांचा अधिपती माणसांतून भूते काढू  लागला तर त्याचे राज्य टिकणार नाही. प्रभू येशूला विरोध करणारे आणि त्याच्या सामर्थ्यावर संशय घेणाऱ्यांची अंतःकरणे कठीण झाली होती. आपली देवावरील श्रद्धा आणि नीष्ठा तसेच देवाबरोबरचे नाते मजबूत बनवू या. आजच्या वचनाचा विशाल अर्थ आपल्या जीवनाला लागू पडतो. आपल्या जीवनात  सर्वांबरोबरचे नाते संबंध टिकविण्यासाठी आपले जर वैचारिक पातळीवर मतभेद झाले तर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. आपले संबंध प्रेमाचे,  सलोख्याचे, समेटाचे आणि शांतिचे असणे फार गरजेचे आहे. आपल्या परस्पर संबंधामध्ये फूट पडली तर जीवन विस्कळीत होते.
आज आपण आपल्या जीवनावर चिंतन करित असतांना आपल्या  कुटूंबातील, परस्पर संबंधातील किंबहुना समाजातील ऐक्य जोपासण्यासाठी कृपा आणि प्रेरणा मागू या.

✝️   

पहिले वाचन २ शमुवेल ५:१-७,१०
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या  पुस्तकातून घेतलेले वाचन

माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ तूच होशील."

इस्राएलचे सर्व वंश हेब्रोनात दावीदकडे येऊन म्हणाले, पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहो. गतकाली शौल आम्हावर राजा असता इस्राएल लोकांची ने आण करणारे पुढारी आपणच होता आणि परमेश्वर आपणाला म्हणाला होता, "माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ आणि अधिपती तूच होशील." या प्रकारे इस्राएलचे सर्व वडीलजन हेब्रोनात राजाकडे आले आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला आणि त्यांनी दावीदला अभिषेक करून इस्राएलवर राजा नेमले. दावीद राज्य करु लागला तेव्हा तो तीस वर्षाचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले. साडेसात वर्षे त्याने हेब्रोनात यहुदावर राज्य केले आणि तेहतीस वर्षे येरुशलेममध्ये सर्व इस्राएल आणि यहुदा ह्यांच्यावर राज्य केले.

राजाने आपले लोक बरोबर घेऊन येरुशलेम येथे त्या देशाचे रहिवाशी यबूसी यांच्यावर स्वारी केली. ते दावीदला म्हणाले, "तुला येथे येणे साधावयाचे नाही. येथले आंधळेपांगळे तुला हाकलून लावतील." त्यांचा भावार्थ असा होता की, दावीदला येथे येणे साधावयाचे नाही. तरी दावीदने सियोन गड घेतला. हेच ते दावीदपूर. दावीदचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्याबरोबर असे.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ८९:२०-२२,२५-२६
प्रतिसाद :   माझी सत्यता आणि माझी दया त्याच्यापाशी राहतील.

१ पूर्वी तू आपल्या भविष्यवादी मित्रांशी 
दृष्टान्ताने बोललास : तू म्हणालास, 
"एका महारथीवर मी राजछत्र ठेवले आहे. 
लोकांतून निवडलेल्या एकाला 
मी श्रेष्ठपदास चढवले आहे."

२ “माझा सेवक दावीद मला मिळाला आहे,
 मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे. 
त्याच्याबरोबर माझा वरदहस्त सदा राहील 
आणि माझा बाहू त्याला बलवान करील.”

३ माझी सत्यता आणि माझी दया 
त्याच्यापाशी राहतील, माझ्या नावाने 
त्याचा उत्कर्ष होईल. मी त्याचा हात 
समुद्रापर्यंत आणि त्याचा उजवा
 हात नदीपर्यंत पसरवीन.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे.
तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क   ३:२२-३०

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"हा सैतानाचा शेवट होय."

येरुशलेमहून आलेले शास्त्री म्हणत होते, “येशूला बालजबूल लागला आहे आणि तो त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने भुते काढतो.” तेव्हा येशू त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील ? आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वत:वरच उठला आणि त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार, बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही, बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. त्याला मी तुम्हांला नक्की सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची आणि त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे,” असे ते म्हणत होते म्हणून तो हे बोलला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: चांगले काय आणि वाईट काय हे ओळखण्याची एक अनमोल देणगी परमेश्वराने प्रत्येक माणसाला दिली आहे. ही देणगी त्याने माणसाच्या अंतःकरणात कोरलेली आहे. ह्या देणगीला आपण सद्सद्विवेक बुद्धी (सत चांगले, असत - वाईट) म्हणतो. येशूची शिकवण ह्या सद्सद्विवेक बुद्धीला पूरक आहे. वाईट संगत, वाईट पुस्तकांचे वाचन, प्रार्थनामय जीवनाचा अभाव इत्यादि कारणामुळे माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीची धार बोथट होते व दुराचार करण्यास त्याला कसलीच लाज वाटत नाही. मात्र शेवाळाला आपण कितीही खोल पाण्यात दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो ते पाण्याच्या वर येऊन पाण्यावर तरंगत राहाते त्याचप्रमाणे सद्सद्विवेक बुद्धी माणसाला पुन्हा पुन्हा सावध करण्याचा प्रयत्न करते. माणूस मात्र ती बुद्धी आपल्यात नाही असे ढोंग करण्याचा प्रयत्न करीतच राहातो. ह्यालाच पवित्र आत्म्याविरुद्धचे पाप असे आपण म्हणतो. असे म्हणतात की, घोड्याला पाण्याजवळ नेता येते पण त्याला ते पाणी पाजता येत नाही व घोड्याने ते पाणी प्याले नाही तर तो घोडा मरून जाईल. त्याचप्रमाणे माणसाचे अंतःकरण त्याला त्याच्या पापाविषयी सावध करून ही "मी पापी नाहीच” असे तो माणूस सांगतो आणि मानतो तेव्हा त्या माणसाला पापांची क्षमा मिळणे असंभव ठरते हा संदेश येशू आजच्या शुभवर्तमानात देतो. काही माणसे अंतरीचा पवित्र आत्म्याचा आवाज दबवण्यासाठी दारूचे सेवन करतात. झोपेच्या गोळ्या खातत, गोंगाटाने भरलेले कार्यक्रम आखतात किंवा तशा कार्यक्रमात भाग घेतात पण तसे करून ते स्वतःचीच फसवणूक करून घेतात.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेवून तुझ्याशी ऐक्य साधण्यास आम्हाला कृपा दे, आमेन,

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या