Marathi Bible Reading | Tuesday 25th January 2022 | 3rd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील तिसरा  सप्ताह

मंगळवार दि. २५ जानेवारी  २०

✝️ 
“सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा”


✝️



संत पौलाचे परिवर्तन - प्रेषित (सण)

 आद्य ख्रिस्तसभेतील सुवार्तिकांचा छळ करणारा, पुरुष व स्त्रियांना बांधून  तुरुंगात टाकणारा, अनेकांना देहांताची शिक्षा फर्माविणारा शौल यरुशलेमेस चालला असताना दिमिष्काजवळ भर दुपारी जमिनीवर कोसळला. दिव्य प्रकाशाने त्याला अंध  बनवले. शौलाने वाणी ऐकली की, 'शौला, शौला माझा छळ का करतोस ?' ती वाणी  प्रभू येशू ख्रिस्ताची होती. शौलाला साक्षात्कार झाला आणि त्याचे परिवर्तन झाले.  ख्रिस्तसभा आज त्याच घटनेचा सन्मान दिन साजरा करीत आहे.

संत पौलाचे परिवर्तन हे ख्रिस्तसभेतील महान असे पाचारण आहे. आद्य ख्रिस्तसभेचा प्रचारक आणि मंडळींचा संस्थापक व प्रवर्तक म्हणून संत पौलाने ख्रिस्तसभेतील इतिहासाचा पाया रचला. संत पौलाने आद्य ख्रिस्तसभेतील तेरा मंडळींना लिहिलेल्या पत्राद्वारे प्रभावी ख्रिस्ताची शिकवण दिली आहे. संत पौलाचे परिवर्तन सर्व ख्रिस्तीजनांसाठी आदर्शवत आहे. परमेश्वर आपल्या सुवार्तेची साक्ष देण्यासाठी  कोणालाही पाचारण करु शकतो. जगाच्या दृष्टीने पापी, भ्रष्ट किंवा देवाला न मानणाऱ्यांना सुद्धा देव त्याच्या कार्यासाठी निवड करतो. ख्रिस्तसभेच्या इतिहासात अशा अनेक माणसांचे जीवन परिवर्तन होऊन त्यांनी आपल्या शब्दाने व आचरणाने | सुवार्तेची साक्ष जगाला दिली आहे.

 प्रभू म्हणतो, 'जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला  सुवार्तेची घोषणा करा.' ख्रिस्ती जीवनाचा उद्देश म्हणजे ख्रिस्तानुकरण करुन आपल्या जीवनाद्वारे इतरांना ख्रिस्त देणे हा आहे. आपण प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवून त्याची सुवार्ता  पसरविण्यासाठी प्रयत्नशील बनू या. प्रभू म्हणतो, 'जो विश्वास धरितो त्याचे तारण होईल.'

✝️   

पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये २२:३-१६
वाचक :प्रेषितांची कृत्ये  पुस्तकातून घेतलेले वाचन

"ऊठ, येशूच्या नावाचा धावा करून स्नानसंस्कार घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर."

पौल लोकांना म्हणाला, "मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळालं आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहा तसा मीही होतो. पुरुष आणि स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्तशिक्षा देऊनसुध्दा मी ह्या पंथाचा पाठलाग केला, त्याविषयी प्रमुख याजक आणि सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्यापासून बंधुजनांना पत्रे घेऊन दिमिष्क येथे चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून येरुशलेममध्ये शासन करण्यास आणावे.

“जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि 'शौल, शौल, माझा छळ का करतोस ?" अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, 'प्रभुजी, तू कोण आहेस ?" त्याने मला म्हटले, 'ज्या नाझरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, 'प्रभुजी, मी काय करावे ?' प्रभूने मला म्हटले, 'उठून दिमिष्कात जा, मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वाविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.' त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.

"मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला आणि जवळ उभा राहून मला म्हणाला, 'शीलभाऊ, इकडे पाहा.' तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. मग तो म्हणाला, 'आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी, कारण जे तू पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करतोस ? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून स्नानसंस्कार घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर' "

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १६:१, २
प्रतिसाद :   सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.

१ आलेलुया ! अहो सर्व राष्ट्रांनो, 
परमेश्वराचे स्तवन करा, 
साऱ्या मानवांनो, 
त्याचे गुणगान गा.


२ त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे, 
प्रभूची सत्यता अनंतकाळ टिकते.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभू म्हणतो,
मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क   १६ : १५-१८

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो आणि स्नानसंस्कार घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील ते माझ्या नावाने भुते : काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही, त्यांनी दुखणाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: सामाजिक संस्थांच्या व इतर निवडणुकांच्या वेळी लोकांना पैसे चारून, दारू पाजून, सत्तेसाठी हपापलेल्या काही जणांना प्रमोशन देण्याचे आश्वासन देऊन आपल्या पाठीशी पुष्कळ लोक आहेत व त्यामुळे आपणच निवडून येण्यास पात्र आहोत असा खोटा आभास निर्माण करणे ही आजच्या समाजाला कलंकित करणारी प्रथा बनू पाहात आहे. प्रभु येशूच्या जीवनाकडे पाहिल्यावर आपल्याला दिसून येते की माणसाने आपली पात्रता, चांगले आचरण ठेवून, लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवून व आपल्या व आपल्या सहकाऱ्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची अनैतिकता आहे असे दाखविण्याचे धाडस कोणीही करणार नाही ह्याची काळजी घेऊन लोकांना आपल्याकडे ओढून घेण्याचा शहाणपणा दाखविला पाहिजे. येशू चांगली कामे करीत होता, त्याची वागणूक निष्कलंक होती म्हणून लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्यामागे जात होत्या. हेच आजच्या शुभवर्तमानात आपण पाहातो. आपल्याला पाठिंबा देणाऱ्या माणसांचीखूप मोठी संख्या आहे हे दाखविण्यासाठी आपल्या घरातील, नात्यातील, गावातील, मित्रपरिवारातील माणसांना चुकीची प्रलोभने दाखवून आपल्याभोवती खूप चाहते आहेत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ही सर्व माणसे विकाऊ आहेत असे दाखवून त्या माणसांविरुद्ध अक्षम्य घोर अपराध करण्या सारखे आहे. ख्रिस्तसभा आज संत पौलच्या परिवर्तनाचा सण साजरा करीत असताना समाजातील असंख्य शौलाचे पौल व्हावेत म्हणून प्रार्थना करू या.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझी तारणदायी कृपा अनुभवून तुझी सुवार्ता पसरविण्यासाठी  आम्हाला प्रेरणा व योग्य ती कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या