शुक्रवार १ एप्रिल २०२२
(उपवासकाळ ४था सप्ताह )
"तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे
संत ह्यू
•महागुरू, वर्तनसाक्षी (१०५०-११३२)
“प्रार्थनेमुळे मला सतत ताजे टवटवीत व शक्तिशाली वाटते. निरर्थकता • आणि चुकीच्या मोहपाशांना बळी पडणारा आत्मा सहज सैतानाच्या जबड्यात अडकतो." - ग्रेनोबलचे संत ह्यू
✝️
दुर्जन परमेश्वराला ओळखत नाहीत व परमेश्वराच्या योजना सुद्धा त्यांना अनाभिज्ञ असतात, दुर्जन नेहमीच सर्व घटना मानवी दृष्टीकोनातून पाहत असतात.
प्रभू येशू हा मसिहा व तारणारा आहे ह्यावर विश्वास ठेवण्यास यहुद्यांनी नकार दिला होता, कारण येशूला ते मानवी दृष्टीकोनातून ओळखत होते की तो एका सुताराचा मुलगा होता. प्रभू येशूच्या दैवीपणावर विश्वास न ठेवणाऱ्या यहुद्यांना येशूने स्पष्टपणे सांगितले की, 'ज्याने मला पाठविले तो खरा आहे, मी त्याला ओळखतो, तुम्ही त्याला ओळखीत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे दैवीपण त्याच्या शिकवणुकीद्वारे आणि केलेली अनेक सत्कृत्ये व चमत्काराद्वारे स्पष्ट केले आहे. असे असताना यहुद्यांनी त्यांच्या कठोर अंत:करणामुळे येशूवर विश्वास ठेवला नाही. अनेकदा आपण प्रभू येशूला मानवी दृष्टीकोनातून ओळखण्याचा व जाणण्याचा प्रयत्न करीत असतो. खरे पाहता प्रभू येशूचे दैवीपण आपल्या बुद्धी आकलनापलिकडे आहे. विश्वासानेच ते स्वीकारायचे असते.
पहिले वाचन ज्ञानग्रंथ २:१ -१२
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आपण त्याला लाजिरवाण्या मृत्यूची शिक्षा देऊ या."
विधर्मी कारणमीमांसा करून आपापसांत असे म्हणत होते "आपण सज्जन माणसासाठी सापळा लावू या. कारण तो आपल्याला त्रासदायक आहे आणि आपल्या आचरणाचा विरोध करतो; कायदेभंग केल्यामुळे तो आपल्याला फटकारतो आणि आमच्यावर आमच्या शिक्षणाचे पाप लावून दोषी ठरवतो. तो स्वतःला परमेश्वराचे ज्ञान असल्याचे समजतो. तो आपल्या विचारांचा प्रतिस्पर्धी झाला आहे; त्याचे दर्शन हे ओझ्यासारखे आहे, कारण त्याचे आचरण दुसऱ्यांसारखे नाही, तर त्याचे मार्ग विचित्र आहेत. तो आम्हांला खोटे आणि अपवित्र समजतो व आमच्या सान्निध्यापासून दूर राहतो; तो सज्जनांचा अंतकाळ सौभाग्यशाली समजतो आणि परमेश्वर आपला पिता असल्याची शेखी मिरवतो. आपण त्याचे शब्द खरे आहेत का ते पाहू आणि त्याच्या अंतकालानंतर काय होते ते परीक्षा करून पाहू; कारण सज्जन माणूस जर परमेश्वराचा पुत्र आहे तर तो त्याला मदत करील आणि त्याच्या विरोधकांपासून त्याचे संरक्षण करील. आपण त्याचा अपमान करून त्याचे हाल करून त्याची परीक्षा घेऊ या की त्यामुळे तो किती विनम्र आहे ते पाहता येईल व त्याचे धैर्य किती आहे ते पारखून पाहता येईल. आपण त्याला लाजिरवाण्या मृत्यूची शिक्षा देऊ या, कारण त्याचा दावा असा आहे की, त्याचे संरक्षण केले जाईल."
“ते अशाप्रकारे विचार करीत होते. परंतु ती त्यांची चूक होती; कारण त्यांच्या दुष्टपणाने त्यांना अंध बनवले आहे; त्यांना परमेश्वराची रहस्ये माहीत नाहीत, तसेच ते धार्मिकतेच्या प्रतिफळावर विश्वास ठेवत नाहीत व धर्मात्म्याच्या पुरस्कारावर विश्वास ठेवत नाहीत.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३५: १६,१८-२२
प्रतिसाद : ज्यांची कंबर खचली आहे, अशांच्याजवळ प्रभू असतो.
१) वाईट करणारांची आठवणदेखील
पृथ्वीवरून बुजवून टाकावी म्हणून
प्रभू त्यांना विन्मुख होतो.
सात्त्विक धावा करतात, प्रभू ऐकतो,
तो सर्व संकटातून त्यांना सोडवतो.
२) ज्यांची कंबर खचली आहे,
अशांच्या जवळ प्रभू असतो;
ज्याचे अवसान गळाले आहे,
अशांचा तो उद्धार करतो.
सात्त्विकावर अनेक आपत्ती ओढवतात;
पण प्रभू त्या सर्वांतून त्याला सोडवतो.
३) त्याचे एकूणएक हाड तो सांभाळतो,
त्यातले एकही मोडत नाही.
प्रभू आपल्या सेवकांचे प्राण वाचवतो.
त्याला शरण जाणारे कुणीही दोषी ठरणार नाहीत.
जयघोष
जे वचन ऐकून, सालस व चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात
आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.
शुभवर्तमान योहान ७:१-१०,२५-३०
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" ते त्याला धरायला पाहत होते पण त्याची वेळ तोवर आलेली नव्हती. "
येशू गालिलात फिरू लागला; कारण यहुदी त्याला जिवे मारायला पाहत होते, म्हणूण त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. यहुद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता. त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला.
ह्यावरून येरुशलेमकरांपैकी कित्येकजण म्हणू लागले, “ज्याला जिवे मारायला पाहतात तो हाच ना? पाहा, तो उघड उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत! हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय? तरी हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही." ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, "तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे. तरी पण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही. मी तर त्याला ओळखतो; कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे." ह्यावरून ते त्याला धरायला पाहत होते; तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: निंदकाचे घर असावे शेजारी अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. एखादी व्यक्ती चांगले करायला गेली तर साहाजिकच तिला खूप त्रास आणि टोमणे सहन करावे लागतात. येशूला देखील ह्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. परंतू येशू खचला नाही किंवा त्याची पिछेहाट झाली नाही. त्याने देवराज्याचे शुभवृत्त पसरविण्याचे कार्य निर्धारपूर्वक व जोमाने सुरू ठेवले. कारण परमेश्वर पिता आपल्या पाठीशी आहे हे त्याला निश्चितपणे ठाऊक होते. प्रभू येशूने आम्हाला त्याच्या मुक्तिकार्यात सहभागी केले आहे. आपल्यापरीने हे कार्य करताना जननिंदेची पर्वा न करता मनः :पूर्वक कार्य करण्यासाठी धैर्य मागू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हाला नवीन दृष्टी प्रदान कर, आम्ही तुला विश्वासाने आमचा तारणारा म्हणून स्वीकारण्यास आम्हाला कृपा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या