Marathi Bible Reading | Good Friday Celebration of the Lord's Passion |15th April 2022 |

<

 ( शुभ शुक्रवार-प्रभु येशुचे दुःखसहन) 

शुक्रवार १५ एप्रिल २०२२ 



त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले.

✝️ 

अखिलमानव जातीच्या तारणासाठी परमेश्वराने तयार केलेल्या  योजनेत, प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःखसहन आणि क्रुसावरील मरण ही घटना अति  महत्त्वाची आहे. आज ख्रिस्तसभा शुभ शुक्रवारची स्मृति उजाळत आहे. ह्या  अतिपवित्र दिवशी आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःखसहन आणि क्रुसावरील मरण ह्या घटनेवर चिंतन करीत आहोत.


✝️   
पहिले वाचन यशया  ५२:१३-५३:१२
वाचक यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“आमच्या अपराधांमुळे तो घायाळ झाला"

पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अत्युच्च होईल. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्याच्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्यासारखे नव्हते, इतका तो विद्रूप होता. त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील, राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील, कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील, त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.
आम्ही ऐकलेल्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवला आहे ? परमेश्वराचा भुज कोणाला प्रकट झाला आहे ? कारण तो त्याच्यापुढे रोप्यासारखा रूक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरूष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानले नाही..
खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पीडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाला आपआपला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.
त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही. कापायला नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेढराप्रमाणे, तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणी तरी विचार केला का? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्याला प्राप्त झाली, तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते.
त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले. त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्यांच्या जिवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल, तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवील, त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण समर्पून तो मृत्यू पावला, त्याने आपणांला अपराध्यात गणवू दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र   ३१:२.६,१२ १३,१५ - १६,१७.२५
प्रतिसाद :हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.  

१ हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे.
मला कधी लज्जित होऊ देऊ नको..
तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर.
 तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो. 

२)हे परमेश्वरा, तूच माझा उद्धार करशील.  
माझ्या सर्व शत्रूंमुळे माझी निंदानालस्ती होत आहे, 
माझ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांत माझी फार निर्भर्त्सना होत आहे, 
माझ्या ओळखीपाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे. 

 ३)मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात. 
स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे, 
फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे. 

४) हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे, 
मी म्हणतो, “तूच माझा देव आहेस." 
माझे दिवस तुझ्या हाती आहेत, 
माझ्या शत्रूंच्या हातातून मला सोडव.

५)तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड.  
तू आपल्या वात्सल्याने मला तार. 
अहो, परमेश्वराची आशा धरणारे, 
तुम्ही सर्व खंबीर व्हा, तुमचे मन धीर धरो.

दुसरे वाचन इब्री  ४:१४-१६,५:७-९
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन ४:१४-१६,५:७-९

“आपल्या दुःखसहनाद्वारे ख्रिस्त आज्ञाधारकपणा शिकला, तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला."

आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.
आपल्याला मरणातून तारायला जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात, मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले त्यामुळे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीचा तारणाचा कर्ता झाला.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष  
ख्रिस्ताने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण सोसले, 
येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. 
यामुळे परमेश्वराने त्याला अत्युच्च केले • 
आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ असे नाव त्याला दिले..


शुभवर्तमा योहान १८: १-१९:४२
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले आमच्या प्रभू येशु ख्रिस्ताचे दुःखसहन

येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला, तेथे बाग़ होती. तो व त्याचे शिष्य तेथे गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परूशी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. आपणांवर जे काही येणार ते सर्व जाणून येशू बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, "तुम्ही कोणाला शोधता ?" त्यांनी त्याला उत्तर दिले, “नाझरेथकर येशूला." येशू त्यांना म्हणाला, "मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता. "मीच तो आहे." असे त्याने म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, "कोणाला शोधता ?" ते म्हणाले, “नाझरेथकर येशूला." येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे असे मी तुम्हांला सांगितले, तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या." जे तू मला दिले आहेत त्यातून मी एकही हरवला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. शिमोन पेत्रजवळ तरवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्रला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय ?"
मग सैनिकांची तुकडी, त्यांचा सरदार व यहुद्यांचे कामदार मग सैनिकांची तुकडी, त्यांचा सरदार व यहुद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले. त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कयफाने यहुद्यांना मसलत दिली होती.
शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला, पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता. म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्रला आत आणले. ती तरूण द्वारपालिका पेत्रला म्हणाली, “तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय ?" त्याने म्हटले, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता.
तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात व मंदिरात सर्व यहुदी जमतात तेथे नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही. मला काय विचारता? ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा मी काय बोललो ते. पाहा, मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे" त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा असलेला एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, "तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस का?" येशूने त्याला उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर, योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?" तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले.शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला ते म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?" तो नाकारून बोलला, "मी नाही." ज्याचा कान पेत्रने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता, तो त्याला म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले ?" पेत्रने पुन्हा नाकारले आणि लगेच कोंबडा आरवला.
नंतर त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती. आपणाला विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे, म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत तेव्हा पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही ह्या माणसावर काय आरोप ठेवता? त्यांनी त्याला उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते." पिलातने त्यांना म्हटले, "त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा." यहुदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” आपण कोणत्या रीतीने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहुद्यांचा राजा आहेस का? येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता की दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी सांगितले ?" पिलातने उत्तर दिले, “मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले, तू काय केलेस?" येशूने उत्तर दिले, "माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु माझे राज्य येथले नाही.' पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस का?" येशूने उत्तर दिले, "मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो." पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे ?"
असे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर जाऊन त्यांना म्हणाला, "ह्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही. पण वल्हांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे, म्हणून मी तुमच्यासाठी यहुद्यांच्या • राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय ?" ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा!" बरब्बा हा एक लुटारू होता.
नंतर पिलातने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकूट गुंफून त्याच्या डोक्यावर घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, "हे यहुद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!" मग त्यांनी त्याला चपराका मारल्या. पिलातने पुन्हा बाहेर जाऊन त्यांना म्हटले, "पाहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो." ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!" मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, “ह्याला क्रुसी खिळा, क्रुसी खिळा !” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्याला नेऊन क्रुसावर खिळा, कारण मला त्याच्या ठायी अपराध दिसत नाही." यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्हांला नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण ह्याने स्वत:ला देवाचा पुत्र केले." तेव्हा पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस ?" परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. ह्यास्तव पिलाताने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस का? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला क्रुसी खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही का?" येशूने उत्तर दिले, "आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता, ह्यास्तव ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे."
तरीही पिलात त्याला सोडवण्याची खटपट करीतच राहिला, परंतु यहुदी आरडाओरड करून म्हणाले, "आपण ह्याला सोडले तर आपण कैसरचे मित्र नाही, जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसरला विरोध करतो." हे शब्द ऐकून पिलातने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्याथा म्हणतात, तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे सहावा तास होता. त्याने यहुद्यांना म्हटले, "पाहा, तुमचा राजा!" ते ओरडले, "त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला क्रुसी खिळा!" पिलात त्यांना म्हणाला, "मी तुमच्या राजाला क्रुसी खिळावे काय ?" मुख्य याजकांनी उत्तर दिले, "कैसरवाचून आम्हांला कोणी राजा नाही." मग त्याने त्याला क्रुसावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले.
मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला क्रूस स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूला व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूला आणि येशूला मध्ये, असे क्रुसी खिळले. पिलातने पाटी लिहून क्रुसावर लावली, तिच्यावर “यहुद्यांचा राजा नाझरेथकर येशू" असे लिहिले होते. येशूला क्रुसी खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी आणि हेल्लेणी ह्या भाषांत लिहिली होती. ह्यास्तव यहुद्यांचे मुख्य याजक पिलातला म्हणाले, “यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे, असे त्याने म्हटले, असे लिहा.' पिलातने उत्तर दिले, “मी जे लिहिले ते लिहिले, "
शिपायांनी येशूला क्रुसी खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेक शिपायाला एकएक वाटा असे चार हिस्से केले, त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता, ह्यास्तव ते एकमेकांस म्हणाले, "हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे. हे ह्यासाठी झाले की,
"त्यांनी माझे कपडे आपसांत वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या, " असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले.
येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, "बाई पाहा, हा तुझा मुलगा!" मग त्याने त्या शिष्याला म्हटले, "पाहा, ही तुझी आई!" आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने (शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून) म्हटले, "मला तहान लागली आहे." तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर, "पूर्ण झाले आहे,' असे म्हटले आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. (थोडा वेळ शांतता पाळावी.)

तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरीरे क्रुसावर राहू नयेत (कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता), म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलातला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले, परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे. त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे. ह्यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. “त्याचे हाड मोडणार नाही" हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, "ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील."
त्यानंतर अरिमथाईकर योसेफ ह्याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलातला विनंती केली, तो येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता. पिलातने परवानगी दिल्यावरून त्याचे शरीर नेले. येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे शंभर रत्तल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले. त्याला क्रुसी खिळले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती, तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो यहुद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे आणि ती कबर जवळ असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले.
प्रभूचे हे शुभवर्तमान  
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:  “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” ह्या पुत्रानेही जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला प्राण क्रुसावर अर्पण केला. तो अर्पण करीत असताना त्याने जे सात उद्गार काढले त्यांच्यातून येशूच्या प्रेमाची रूंदी, खोली आणि उंची ह्याचे दर्शन घडते. 
१. शत्रूवरील प्रेम : आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा.जे तुमचा छळ करतात त्यांना क्षमा करा. अशी शिकवण येशूने दिलेली होती. आता क्रुसावर मरणप्राय यातना सहन करीत असताना आपल्या शत्रूंवरील प्रेम प्रकट करीत त्याने म्हटले, “बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही.” 
२. पाप्यांवरील प्रेम : येशूने आयुष्यभर पाप्यांना क्षमा केली, “मुला/ मुली, तुझ्या पापांची क्षमा झाला आहे.” अशा शब्दात त्यांने पाप्यावरील प्रेम व्यक्त केले. अशाच पाप्यांचा प्रतिनिधी असलेल्या उजव्या हातावरील चोराला तो आता म्हणतो, “आज तू माझ्याबरोबर सुखलोकांत असशील.” 
३. नातेवाईकांवरील प्रेम : “कोण माझी आई, कोण माझा भाऊ ? " असे म्हणणारा येशू आता आपल्या आईवरील व प्रिय शिष्यांवरील प्रेम प्रकट करताना म्हणतो, “पहा, तुझी आई”, “पहा तुझा मुलगा”. 
४. देवावरील प्रेम : प्रभू येशू देवपित्याशी एवढा एकरूप झालेला होता की, त्याच्यापासून आपली क्षणभरही ताटातूट होऊ नये असे त्याला वाटे. म्हणूनच हा दुःखाचा प्याला दूर करण्याची विनंती तो करीत होता. आता क्रुसावर असताना त्याला ही ताटातूट जाणवू लागली म्हणून तो म्हणतो, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” 
५. स्वतःवरील सुदृढ प्रेम: एक मानव या नात्याने येशूने स्वतःवरही प्रेम केले. त्याला भूक लागली तेव्हा तो अंजिराच्या झाडापाशी गेला, तहान लागली तेव्हा तो शोमरोनी स्त्रीकडे गेला, झोप आली तेव्हा मचव्यात उशाशी घेऊन तो झोपी गेला, थकला तेव्हा विसाव्यासाठी अरण्यात एकांती गेला. आता त्याची जीभ टाळूला चिकटू लागली तेव्हा तो म्हणतो, "मला तहान लागली आहे.” 
६. जगावरील प्रेम : येशूने जगावर शेवटपर्यंत प्रेम केले. जगासाठी असलेली देवाची योजना पूर्ण करण्यासाठी त्याने मानवदेह धारण केला. एका गरीब कुटुंबात बालपण घालविले. अनेक कुटुंबे उभी केली. अनेकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. हे आपले कार्य आता संपलेले आहे हे सूचित करताना तो म्हणतो, “पूर्ण झाले आहे.'

७. स्वर्गावरील प्रेम: गरुडाची नजर सतत सूर्याकडे लागलेली असते. त्याप्रमाणे येशूची नजर स्वर्गाकडे लागलेली होती. अश्वत्था वृक्षाप्रमाणे त्याची मूळे स्वर्गात होती व फळे पृथ्वीवर होती. आता अखेरचा श्वास घेताना तो म्हणतो, "बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो.”

आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात विविध गोष्टीवरील, व्यक्तींवरील व साक्षात् देवावरील प्रेम मी कशारीतीने व्यक्त करतो ?

प्रार्थना :  हे कालवारी टेकडीवरील प्रभू येशू, आमच्या पापांची क्षमा कर आणि नरकाच्या शिक्षे पासून वाचावं आमेन 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या