पवित्र गुरुवार १४ एप्रिल २०२२
प्रभू भोजन विधी
सायंकाळचा मिस्साबली
मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.
आजपासून आपण पवित्र त्रिदिनाला सुरूवात करीत आहोत. आजचा दिवस हा आज्ञा गुरूवार म्हणून ही प्रसिद्ध आहे. आजच्या दिवशी येशूने पवित्र मिस्साबली व धर्मगुरूपद ह्यांची प्रस्थापना केली. आपल्या प्रेषितांचे पाय धुवून त्यांच्यावरील प्रीतीचे सेवेत रूपांतर केले व त्यांना प्रीतीची नवी आज्ञा दिली. येशूचे हे प्रेम त्याच्या शिकवणुकीतून व कार्यातून दिसून येते.
आज पवित्र ख्रिस्तशरीर सक्रामेंत, धर्मगुरुप्रसाद आणि सेवाव्रत तिहेरी सोहळा. आपण साजरा करीत आहोत. आपण सर्वांना त्याच्या धर्मगुरुपदात सहभादित्व मिळाले आहे. आपल्या सर्वांना सेवा करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. आपण प्रभू येशूचे प्रमाणिक व एकनिष्ठ अनुयायी बनण्यासाठी आज प्रेरणा मागू या.
पहिले वाचन निर्गम १२:१-८,११-१४
वाचक निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभूच्या वल्हांडणाचे नियम."
परमेश्वराने इजिप्त देशात मोशे व अहरोन यांस सांगितले की, “हा महिना तुम्हांला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा, इस्राएलच्या सर्व मंडळीला सांग की ह्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपआपल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकाएका घराण्यामागे एकेक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावयाचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो एक वर्षाचा नर असावा, हा नर मेंढरातला किंवा बोकडातला तुम्हांला वाटेल तो घ्यावा, या महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्राएल मंडळीतील लोकांनी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे आणि त्यांनी त्याच रात्री
मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरीबरोबर आणि कडू भाजीबरोबर खावे. ते तुम्ही या रितीने खावे: तुमच्या कंबरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण या रात्री इजिप्त देशात फिरून त्यांतील मनुष्य व पशू या व सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि इजिप्तमधील सर्व देवांचे मी शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असणार त्यावर ते रक्त तुम्हाप्रीत्यर्थ खूण होईल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलाडून जाईन, इजिप्त देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुम्हांवर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही.
हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ मेळा भरवून सण पाळावा, पिढ्यांन्पिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११६:१२-१३,१५-१६
प्रतिसाद : आपण आशीर्वादित करतो तो प्याला ख्रिस्तरक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे.
१) परमेश्वराने माझ्यावर केलेल्या उपकारांचा
मी कसा उतराई होऊ ? परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.
मी तारणाचा प्याला हाती घेऊन
२) परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे.
हे परमेश्वरा, मी तुझा दास, मी खरोखर तुझा दास आहे,
तू माझी बंधने सोडली आहेत.
३) मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ अपन,
मी परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.
परमेश्वराला नेलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.
दुसरे वाचन १ करिंथ ११:२३-२६
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची घोषणा करता."
पौल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, "हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता."
जयघोष
प्रभू म्हणतो मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की,
तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी,
जशी मी तुम्हांवर प्रीती केली
तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.
शुभवर्तमान योहान १३: १-१५
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम केले. "
वल्हांडण सणापूर्वी येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनचा मुलगा यहुदा इस्कार्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन कमरेला बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “प्रभो, आपण माझे पाय धुता काय ?" येशूने त्याला उत्तर दिले “मी जे करतो ते तुला आता कळणार नाही, ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्याला म्हणाला, “मी तुम्हांला माझे पाय कधीही धुवू देणार नाही.' येशूने त्याला उत्तर दिले, "मी तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुझा वाटा नाही.” शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा!” येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आणि तुम्ही शुद्ध आहा, पण सगळेजण नाही.” कारण आपणांला धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता. म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळेजण शुद्ध नाही."
मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, "मी तुम्हांला काय केले आहे हे तुम्हांला समजले काय ? तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. ह्यास्तव मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: १. मिस्सेमधील येशूचे प्रेम : एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडते तेव्हा ती तीन अवस्थांमधून जाते : शब्द, भेटवस्तू आणि शारीरिक मीलन. सर्वप्रथम शब्दाच्या माध्यमातून प्रियकर व प्रेयसी आपले एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. मग ते प्रेमपत्र असो, फोनवरील संभाषण असो की, एखादा एस्.एम्.एस. असो. पुढे शब्द कमी पडतात आणि भेटवस्तूंच्या रुपाने हे प्रेम व्यक्त केले जाते. त्यात गुलाबाचे फूल, चॉकलेट, शर्टपीस, सोन्याची चेन, मोबाईल, बर्थडे गिफ्ट अशा गोष्टींचा समावेश होतो. शेवटी दोघे परस्परांना आपले शरीर अर्पण करतात व त्यांचे प्रेम कळसाला पोहोचते. पवित्र मिस्सेमध्ये प्रभुशब्दाच्या रूपाने आपले प्रेम व्यक्त केले जाते. त्यानंतर अर्पणविधीमध्ये आपल्या भेटवस्तू अर्पण केल्या जातात. शेवटी ख्रिस्तशरीरविधी ख्रिस्ताचे शरीर व आपले शरीर ह्यांच्यात ऐक्य होते. तो अत्युच्च प्रेमाचा क्षण असतो.
२. धर्मगुरूपदामधील येशूचे प्रेम : धर्मगुरूंचे आश्रयदाते संत जॉन मारी व्हियानी म्हणतात, “धर्मगुरूपद हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयातील प्रेमाचे प्रतिबिंब होय.” एक मेंढपाळ म्हणून येशू संपूर्ण कळपावर सारख्याच प्रमाणात प्रेम करतो. मात्र ह्या कळपाची काळजी घेण्यासाठी तो काहींना विशेष पाचारण करतो. त्यांची जडणघडण करतो व त्यांना मिशनकार्यावर पाठवितो. 'तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे लोकांना समजेल की, तुम्ही माझे शिष्य आहात.' 'जो तुम्हांला स्वीकारतो तो मला स्वीकारतो' अशा शब्दांत येशूने धर्मगुरू हे प्रतिख्रिस्त असल्याचे सूचित केलेले आहे.
३. सेवाकार्यातील येशूचे प्रेम : आपल्या शिष्यांचे पाय धुतल्यानंतर येशूने त्यांना प्रीतीची नवी आज्ञा दिली. त्यांनीही एकमेकांचे पाय धुवावेत अशी अपेक्षा बोलून दाखविली. शिवाय जे तुम्ही
कनिष्ठांतील कनिष्ठांपैकी एकाला करता त्याअर्थी ते तुम्ही मला करता अशा शब्दांत ज्यांची सेवा केली जाते त्यांच्यात येशूला पाहण्याची सूचना आपल्या शिष्यांना गेली. गोरगरिबांनाही आपल्यामधील ख्रिस्ताचे प्रेम अनुभवता आले पाहिजे, असा सल्ला धन्यवादित फ्रेडरीक ओझानम ह्यांनी आपल्याला दिलेला आहे.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात प्रभू येशूचे प्रेम मी कशाप्रकारे अनुभवतो? इतरांना त्याचे प्रेम अनुभवता यावे म्हणून मी काय करतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या कृपा सामर्थ्याने आमच्या जीवनात परिवर्तन घडव आम्ही तुझी सुवार्ता पसरविण्यास आत्मिक बळ दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या