Marathi Bible Reading |Wednesday of the Holy Week |13th April 2022 |

 बुधवार १३ एप्रिल २०२२ 

 (पवित्र आठवडा) 



संत मार्टिन पहिले  
पोप, वर्तनसाक्षी (६५५)

✝️ 

"परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते."

✝️   
पहिले वाचन यशया ५०:४-९
वाचक  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“उपमर्द आणि छिः थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही."

यशया म्हणतो, शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्यांची जिव्हा दिली आहे. तो रोजरोज सकाळी मला जागे करतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले. उपमर्द आणि छि: थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे. माझ्याबरोबर वाद कोण करणार? आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण आहे ? त्याने माझ्यापुढे यावे. पाहा, प्रभू परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे. मला दोषी कोण ठरवणार ?
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ६९:८- १०, २१-२२,३१.३३-३४
प्रतिसाद : हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून मला उत्तर दे.

१) तुझ्याकरिता मी निंदा सोशिली आहे,
लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे,
मी आपल्या भावांना नवखा, 
माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे.
 तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने
मला ग्रासून टाकले आहे,
निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा
माझी निंदा झाली आहे. 

२ निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे,
मी अगदी बेजार झालो आहे.
माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले,
पण कोणी आढळला नाही,
माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली
पण कोणी दिसला नाही.
त्यांनी मला अन्न म्हणून खायला विष दिले, 
तहान भागवायला मला आंब दिली.

३. देवाच्या नावाचे मी गीत गाऊन स्तवन करीन,
त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. 
दीन हे पाहून हर्षतील, देवाचा शोध करणाऱ्यांनो, 
तुमच्या हृदयात नवजीवन येवो.
कारण परमेश्वर गरिबांचे ऐकतो,


जयघोष  
आपल्या राजाचा जयजयकार असो, पित्याचा तो आज्ञाधारक आहे,
ज्याप्रमाणे दीन कोकरू कत्तल करण्यासाठी नेतात, तसेच आपणांला क्रुसावर देण्यासाठी चालवले आहे.

शुभवर्तमा मत्तय २६:१४-१५
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार!"

यहुदा इस्कर्योत नावाच्या बारातील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, "मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल ?" त्यांनी त्याला तीस शेकेल मोजून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला.नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “आपणांकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?" त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे; मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो." मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली.
संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यांसह भोजनाला बसला आणि ते भोजन करीत असताना त्याने म्हटले, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुमच्यातला एकजण मला धरून देईल." तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येकजण त्याला विचारू लागला, “प्रभो, मी तर नाही ना ?" त्याने उत्तर दिले “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते." त्याला धरून देणारा यहुदा ह्याने विचारले, “गुरुजी, मी तर नाही ना ?" तो त्याला म्हणाला, "होय तूच."
प्रभूचे हे शुभवर्तमान  
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:  आपल्या नित्य सहवासातील व्यक्ती आपले जीवन आनंदी करीत असतात. परंतु जेव्हा आपल्या कुटुंबातून एखादी व्यक्ती आपल्याशी दुष्टतेने वागते, प्रसंगी विश्वासघात करते तेव्हा आपल्या मनावर मोठा आघात होतो. जर कधी असे घडले तर आम्ही आमचा प्रभू स्वामी येशू व्याच्या जीवनाकडे पहावे. सर्वांचा पुढारी म्हणून ज्या पेत्रावर प्रभूने मोठी जबाबदारी दिलेली होती तो पेत्रही मोहाच्या जाळ्यात अडकला परंतु त्याने प्रभूकडे पाहिले आणि त्याला सुबुद्धी सुचली. युदासला मोह अनावर झाला, त्याची दृष्टी येशूवरून ढळली आणि त्याचे पतन झाले. यहुदा इस्कर्योतने केलेल्या विश्वास घातामुळे प्रभू येशू कोलमडून पडला नाही. धैर्याने त्याने हा आघात सहन केला. त्याच्या क्रुसावरील मरणाद्वारे त्याने नक्कीच ज्युदासला देखील क्षमादान मिळवून दिले असते. परमेश्वराच्या दयेला मर्यादा नाही.

प्रार्थना : हे प्रभू येशू, सर्वस्वी मी तुला शरण आलो  आहे. तुझ्या कृपने वाढण्यास मला बळ दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या