Marathi Bible Reading |Tuesday of the Holy Week |12th April 2022 |

 मंगळवार १२ एप्रिल २०२२ 

 (पवित्र आठवडा)



संत  जेमा गालगानी 
१८७८-१९०३

"I wish, oh Jesus, that my voice could reach to the ends of the world, to call all sinners and tell them to enter into Thy Heart....Oh, if only all sinners would come to Thy Heart!... Come! Come sinners, do not be afraid! The sword of Justice cannot reach you here!"
~St Gemma Galgani
✝️ 

"तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणारनाही. "

✝️   

पहिले वाचन यशया ४९:१-६
वाचक  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमले."

यशया म्हणतो, द्विपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले, मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तरवारीसारखे केले, त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले; त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. तो मला म्हणाला, “तू माझा सेवक आहेस; मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस." मी तर म्हणालो होतो, “मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले; तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे. माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे.”
मी याकोबला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला तो परमेश्वर म्हणतो, "याकोबच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलच्या रक्षिलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असा नेमतो."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ७१:१-६,१५-१७
प्रतिसाद : माझे मुख तुझ्या तारणाचे वर्णन करील.

१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. 
मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. 
माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर..
तू आपल्या न्यायानुसार माझा उद्धार कर आणि मला मुक्त कर.

२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून 
माझ्यासाठी संरक्षण निवासाचा खडक हो, 
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहे, 
कारण तू माझा गड आणि दुर्ग आहेस. 
हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.

३) हे प्रभू परमेश्वरा, तू माझे आशास्थान आहेस,
 माझ्या तरुणपणापासून तू माझे श्रद्धास्थान आहेस. 
जन्मापासून तू माझा आधार आहेस, 
मातेच्या उदरातून निघाल्यापासून तू माझा कल्याणकर्ता आहेस.

४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि 
तू सिद्ध केलेल्या तारणाचे दिवसभर वर्णन करील,
 हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला 
शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत
 तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.


जयघोष  
आपल्या राजाचा जयजयकार असो, पित्याचा तो आज्ञाधारक आहे,
ज्याप्रमाणे दीन कोकरू कत्तल करण्यासाठी नेतात, तसेच आपणांला क्रुसावर देण्यासाठी चालवले आहे.

शुभवर्तमा योहान १३:२१-३३,३६-३८
वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन   

“तुम्हांपैकी एकजण मला धरून देईल... तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणारनाही. "

आपल्या शिष्यांबरोबर भोजन घेत असता येशू आत्म्यात व्याकूळ झाला आणि निश्चितार्थाने म्हणाला, “मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्हांपैकी एक जण मला धरून देईल." तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता, ह्यास्तव “ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हाला सांग" असे पेत्रने त्याला खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लवून त्याला म्हणाला, “प्रभो, तो कोण आहे ?" येशूने उत्तर दिले, “मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो आहे." मग त्याने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कर्योत ह्याला दिला आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले "तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक." पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनाला बसलेल्यांतील कोणाला समजले नाही. कारण, यहुदाजवळ पैशांची थैली होती म्हणून "सणासाठी आपल्याला ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांना काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे," असे कित्येकांना वाटले. मग घास घेतल्यावर तो लागलीच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती.
तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे. देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील, तो त्याचा लवकर गौरव करील. मी अजून थोडा वेळ तुम्हांबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहुद्यांना सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुम्हांला येता येणार नाही, तसे तुम्हांलाही आता सांगतो." शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, आपण कोठे जाता ?” येशूने उत्तर दिले, "मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील." पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही ?" आपल्यासाठी मी माझा प्राण देईन. येशूने त्याला उत्तर दिले, “माझ्यासाठी तू आपला प्राण देशील का ? मी तुला नक्की सांगतो, तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही."

प्रभूचे हे शुभवर्तमान  

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:  शुभवर्तमानात शेवटच्या भोजनाचा प्रसंग वर्णन केला आहे. अतिशय भावपूर्ण अशा या प्रसंगी येशू मनातील एक शल्य प्रकट करतो. 'तुम्हापैकी एकजण मला धरून देणार आहे.' आपल्या गुरूवर्याकडून व्यक्त झालेल्या या बातमीने संपूर्ण शिष्यवर्ग व्यथित झाला. ज्युदास मात्र बाहेर काळोखात निघून गेला. काळोख हे निबिड अंधकाराचे प्रतिक आहे. जो येशूला सोडून जातो तो अंधाराचा मार्ग धरतो. आपण नेहमी प्रकाशरूपी येशूची आस धरावी. आपण दुर्बल असूनही ही येशूचे शिष्यत्व स्वीकारले आहे. पेत्राप्रमाणे प्रभूयेशूच्या सहाय्याची मागणी करू या. त्याला विनम्र वृत्तीने शरण जाऊ या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तू आमच्यासाठी व्याकूळ झालास, आम्ही आमच्या पापांबद्दल पश्चात्ताप करावा म्हणून आम्हाला विश्वासाचे दान दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या