सोमवार ११ एप्रिल २०२२
(पवित्र आठवडा)
"कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही."
संत स्टॅनिस्लॉस
महागुरु, रक्तसाक्षी (१०३०-१००५)
एक आदर्श महागुरू या नात्याने त्यांनी सत्य आणि न्याय्य हक्काविषयी जाहिरपणे ख्रिस्तसभेची भूमिका मांडली. त्यावेळी पोलंडचा राजा बोलेस्लॉस दुसरा आपल्या स्वैराचारी जीवनाद्वारे आणि आपल्या नोकरचाकरांना तुच्छतेने वागवून एक वाईट उदाहरण घालून देत होता. त्याचे परिवर्तन व्हावे म्हणून बिशप स्टॅनिस्लॉस ह्यांनी उपवास, प्रार्थना आणि अश्रुपूर्ण नयनांनी व गुडघे टेकून देवाकडे. आणि राजाकडे विनंती केली. परंतु राजाच्या दगडी हृदयाला अजिबात पाझर फुटला नाही. त्यामुळे बिशपांनी त्याला धर्मबहिष्कृत केले व कॅथिड्रलमधील सार्वजनिक उपासनाविधी राजालाही निर्भिडपणे बंद करून टाकल्या व शेवटी आपण स्वतः क्रॅकोव्हच्या एका छोट्याशा उपनगरातील लहानशा प्रार्थनागृहात जाऊन राहिले.
बिशपांचे हे धैर्य पाहून राजा खवळला. त्याने आपले हस्तक पाठवून बिशपांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष हे दूत बिशपांच्या समोर येऊन ठेपले तेव्हा या साधुपुरूषाला हात घालण्याचा त्यांना धीर होईना. शेवटी एके दिवशी बिशप महोदय मिस्साबली अर्पण करत असताना चवताळलेला राजा त्या प्रार्थना मंदिरात घुसला आणि आपल्या हाती असलेल्या धारदार तरवारीने त्याने त्यांच्यावर सपासप वार केले व शेवटी त्यांचा शिरच्छेद केला. परिणामत: पोप ग्रेगरी सातवें ह्यांनी संपूर्ण पोलंड देशाला धारेवर धरले व त्यांना कुठलीही आध्यात्मिक सेवा मिळण्यापासून परावृत्त केले.
ह्याचा परिणाम जनमाणसावर व्हायचा तोच झाला. लोकांनी बंड केले व राजा बोलेस्लॉस दुसरा ह्याला सन १०८१ साली गादीवरून पदच्यूत करून हद्दपार केले. दोनच वर्षांनी तो हंगेरी येथे मरण पावला.
पुढे पोप इनोसेंट चौथे ह्यांनी १२५३ साली बिशप स्टॅनिस्लॉस ह्यांना संतपद देऊन त्यांचा गौरव केला.
पहिले वाचन यशया ४२:१-७
वाचक यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तो गवगवा करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. "
परमेश्वर म्हणतो, पाहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; याच्याठायी मी आपला आत्मा घातला आहे, तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही; चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही; द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा आणि तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा आणि तिच्यावर संचार करणाऱ्यांना जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो, “मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे; तुला राखले आहे तू लोकांना करार आणि राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन; आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना आणि अंधारात बसलेल्यांना कारागृहांतून बाहेर काढावे म्हणून मी असे "करीन.”
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २७:१-३,१३-१४
प्रतिसाद : परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे.
१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे;
मी कोणाची भीती बाळगू?
परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे;
मी कोणाचे भय धरू ?
२) माझे शत्रू माझे द्वेष्टे माझे मांस खाऊन टाकण्यास
माझ्यावर चढाई करून आले,
ते दुष्टकर्मी ठेच खाऊन पडले.
३) सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले
तरी माझे हृदय कचरणार नाही.
माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही
मी हिम्मत धरुन राहीन.
४) ह्या इहलोकीच परमेश्वराची दया
माझ्यावर होईल अशी माझी श्रद्धा आहे.
परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर.
परमेश्वराची प्रतीक्षा कर!
जयघोष
आपल्या राजाचा जयजयकार असो !
फक्त तूच आम्हावर दयादृष्टी दाखवतोस.
शुभवर्तमान योहान १२:१-११
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी हे सुंगधी तेल तिला ठेवू द्या."
येशू वल्हांडणाच्या पूर्वी सहा दिवस बेथानी येथे आला; ज्या लाजरसला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली; तेव्हा मार्था सेवा करीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मौलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यांतील एकजण यहुदा इस्कार्योत ( जो त्याला धरून देणार होता तो) म्हणाला, “हे सुगंधी तेल तीनशे शेकेलला विकून ते गरिबांना का दिले नाहीत ?” त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो लोभी असून त्याच्याजवळ पैशांची थैली होती आणि तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला. येशूने म्हटले, “तिला अडवू नका, माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही."तो तेथे आहे असे यहुद्यातील लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशूकरिता नाही तर ज्या लाजरसला त्याने मेलेल्यातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले. मुख्य याजकांनी लाजरसलाही जिवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: यशया नामक संदेष्टा देवाचा पुत्र ख्रिस्त याविषयी हजारो वर्षापूर्वी भाकीत करीत आहे. 'तो माझा निवडलेला असेल. त्याच्याठायी मी आपला आत्मा देईन. सत्य आणि न्याय याची तो पुनर्स्थापना करील. तो राष्ट्रांना प्रकाश देणारा असेल. आंधळ्याचे डोळे उघडावे. बंदिशाळेतून बंदिवानांस व अंधारात बसलेल्यास तो कारागृहातून बाहेर काढील. शुभवर्तमानातील प्रसंगात, हाच देवाचा सेवक प्रभू येशू, मार्था, मेरी व लाझरस या मित्रांच्या घरी पंक्तीस बसला आहे. तो मरीयेच्या सेवेचे समर्थन करीत आहे. मनात प्रीती भरून केलेली सेवा प्रभूला मान्य ठरते हे सत्य याप्रसंगी व्यक्त होत आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, निष्ठेने तुला अनुसरण्यास व समर्पित जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या