Marathi Bible Reading |Palm Sunday of the Lord Passion |10th April 2022 |

 रविवार १० एप्रिल  २०२२ 

( झावळ्यांचा रविवार)

 "हा यहुदयांचा राजा आहे."

✝️ 
“माझ्या परीक्षांमध्ये टिकून राहिलेले तुम्हीच आहा; जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हांला नेमून देतो; तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्याय करावा.
 
✝️ 

ख्रिस्तसभा आज झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे.  'हा यहुदयांचा राजा आहे.आपण सुद्धा प्रभू येशूला  आपला तारणारा, मुक्तीदाता आणि राजा म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. 
 
✝️   
पहिले वाचन  यशया ५०:४-७
वाचक  : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“उपमर्द व छिः थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही, कारण माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते."

यशया म्हणतो शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्याची जिव्हा दिली आहे. तो रोज सकाळी मला जागे करतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छि: थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून तोंड चुकवले नाही.
प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही; मी आपले तोंड गारगोटीसारखे केले; माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र २२:८-९,१७-२०,२३-२४
प्रतिसाद :   माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?

१) मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात.
 ते वाकुल्या दाखवतात, ते थट्टेने डोके हलवतात.
 त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला,
 तो त्याला मुक्त करो;तो जर त्याचा आवडता असेल
तर तो त्याला सोडवो. 

२) कुत्र्यांनी मला वेढले आहे,
दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे.
 त्यांनी माझे हातपाय विंधिले आहेत.
 मला आपली सर्व हाडे मोजता येतात.. 

३) ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात. 
ते माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात. 
हे परमेश्वरा, तू दूर राहू नको; 
हे माझ्या सामर्थ्या, माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर ! 

४) मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नामाची कीर्ती वर्णीन,
 “अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, त्याचे स्तवन करा;
याकोबचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे गौरव करा. 
इस्राएलचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा.'


दुसरे वाचन  फिलिपे  २:६-११
वाचक: पौलचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
  “त्याने स्वत:ला लीन केले; ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. " 

ख्रिस्त येशू, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही; तर त्याने स्वत:ला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाने होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण स्वीकारले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वत:ला लीन केले. त्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष           

ख्रिस्ताने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण स्वीकारले,
येथपर्यंत तो आज्ञाधारक झाला. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले

शुभवर्तमान लूक २२:१४-२३:५६

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले 

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःखसहन" 

वेळ झाली तेव्हा येशू जेवायला बसला आणि त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हांबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती; मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही." मग प्याला हातात घेऊन आणि उपकारस्तुती करून तो म्हणाला, "हा घ्या आणि आपणांमध्ये ह्याची वाटणी करा; मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणारच नाही." मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, "हे माझे शरीर आहे; ते तुम्हांसाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा." त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, "हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे; ते रक्त तुम्हांसाठी ओतले जात आहे. पण पाहा, मला धरून देणाऱ्याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे. मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार!" तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे तो कोण असावा, ह्याचा आपसांत विचार करू लागले.
आणखी, आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात. परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुम्हांमध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा आणि जो पुढारी तो सेवा करणाऱ्यासारखा असावा, मोठा कोण ? भोजनाला बसणारा किंवा सेवा करणारा ? भोजनाला बसणारा की नाही ? मी तर तुम्हांमध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे.
“माझ्या परीक्षांमध्ये टिकून राहिलेले तुम्हीच आहा; जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हांला नेमून देतो; तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्याय करावा.“शिमोन, शिमोन, पाहा, तुम्हांस गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली; परंतू तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर." तो त्याला म्हणाला, “प्रभूजी, मी आपणांबरोबर तुरूंगात जायला आणि मरायलाही तयार आहे." तो म्हणाला, “पेत्र, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस पण तू मला तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
• आणखी त्याने त्यांना म्हटले, "मी तुम्हांला पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठवले तेव्हा तुम्हांस काही उणे पडले नाही ना?” ते म्हणाले, “नाही.” त्याने त्यांना म्हटले,“पण आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी; तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तरवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती घ्यावी. मी तुम्हांला सांगतो, तो अपराध्यात गणलेला होता असा जो शास्त्रलेख आहे, तो माझ्या ठायी पूर्ण झाला पाहिजे, कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत." ते म्हणाले, “प्रभो, पाहा, येथे दोन तरवारी आहेत. तो त्यांना म्हणाला, “पुरे."
मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनांच्या डोंगराकडे गेला आणि त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा." मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतक्या अंतरावर तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली, “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर; तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणांला शक्ती देताना त्याने पाहिला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली; तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला तो ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यांला आढळले; तो त्यांना म्हणाला, झोप का घेता? तुम्ही परिक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा."
तो बोलत आहे इतक्यात पाहा, लोकसमुदाय आला, त्यात यहुदा नावाचा बारातला एकजण त्यांच्यापुढे चालत होता. तो येशूचे चुंबन घ्यायला त्याच्याजवळ आला. येशू त्याला म्हणाला, “यहुदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय ?" त्याच्या सभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभो, आम्ही तरवार चालवावी काय ?" त्यांच्यातील एकाने प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला. तेव्हा येशूने म्हटले,“एवढे होऊ द्या!” आणि येशूने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार आणि वडील त्याच्यावर चालून आले होते, त्यांना येशू म्हणाला, “जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तरवारी आणि सोटे घेऊन आला काय? मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे तरी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे."
मग त्यांनी त्याला पकडून चालवले आणि प्रमुख याजकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागे चालू लागला; ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, "हाही त्याच्याबरोबर होता." पण ते नाकारून तो बोलला, "बाई, मी त्याला ओळखत नाही." काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूही त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही.” सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खात्रीपूर्वक म्हणू लागला, “खरोखर हाही त्याच्याबरोबर होता; हा गालिलीच आहे." पेत्र म्हणाला, "गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही." आणि असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे जे प्रभूने पेत्रला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करीत त्याला मारीत होते; त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले, “अंतर्ज्ञानाने बोल! तुला कोणी मारले?" आणि नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची निंदा केली.
मग उजाडल्यावर लोकांचे पुढारी, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, “तू ख्रिस्त आहेस तर आम्हांला सांग." त्याने त्यांना म्हटले, "मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही आणि मी विचारले तरी तुम्ही उत्तरच देणार नाही. तथापि ह्यापुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल.” तेव्हा ते सर्व म्हणाले, “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही म्हणता तर मी आहे.” तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः ह्याच्या तोंडचे ऐकले आहे. "
(नंतर ती सर्व मंडळी उठली आणि त्यांनी त्याला पिलातकडे नेले आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसरला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वत: ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला." तेव्हा पिलातने त्याला विचारले, “तू यहुद्यांचा राजा आहेस काय?" त्याने त्याला उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच." तेव्हा पिलातने मुख्य याजकाला आणि लोकसमुदायाला म्हटले, “मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही.” तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, "ह्याने गालिलापासून आरंभ करून येथपर्यंत साऱ्या यहुदियात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे."
• तेव्हा पिलातने हे ऐकून हा मनुष्य गालिली आहे काय, असे विचारले आणि तो हेरोदच्या अंमलातला आहे असे समज त्याने त्याला हेरोदकडे पाठवले, कारण तोही त्या दिवसात येरूशलेममध्ये होता. येशूला पाहून हेरोदला फार संतोष झाला; कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहायला मिळेल अशी त्याला आशा होती. त्याने त्याला बरेच प्रश्न केले; परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. तेव्हा मुख्य याजक आणि शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करीत होते आणि हेरोदने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलातकडे परत पाठवले. त्यापूर्वी त्यांचे आपसांत वैर होते पण त्याच दिवशी पिलात आणि हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले.
मग पिलातने मुख्य याजक, अधिकारी आणि लोक ह्यांना एकत्र बोलावून म्हटले, “हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले आणि पाहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्यामध्ये काहीही दोष सापडला नाही; हेरोदलाही सापडला नाही; कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे आणि पाहा, ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही; म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.”
परंतु सर्वांनी एकच ओरड करून म्हटले, “ह्याची वाट लावा आणि आम्हांसाठी बरब्बाला सोडा." बरब्बा हा माणूस शहरात झालेले दंगे व खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेला होता. येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलातने पुन्हा त्यांच्याबरोबर भाषण केले; तरी ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा !” असे ते ओरडत राहिले. तो त्यांना तिसऱ्यांदा म्हणाला, “का बरे?” त्याने काय वाईट केले आहे? त्याच्यामध्ये मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही; ह्यास्तव मी ह्याला फटके मारून सोडून देतो." पण ह्याला क्रुसावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले. तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलातने निकाल दिला. नंतर दंगा व खून ह्यासंबंधात तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्या बरब्बाला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले.

पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक सिरेनीकर शिमोन शेतावरून येत होता, त्याला त्यांनी धरून त्याच्यावर क्रूस लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहायला लावले. तेव्हा त्याच्यामागे लोकांचा आणि ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करीत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो येरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वत:साठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. पाहा, असे दिवस येतील की, ज्यात वांझ, न प्रसवलेली उदरे आणि न पाजलेले स्तन ही धन्य आहेत, असे म्हणतील. त्या समयी ते पर्वतांना म्हणू लागतील, आम्हांवर पडा व टेकड्यांना म्हणतील, आम्हांला झाका. ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्याचे काय होईल. ?”

त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघाजणांना ते अपराधी असल्यामुळे क्रुसी देण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला आणि त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे क्रुसावर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही." नंतर त्याची वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. लोक पाहत उभे होते; अधिकारीही नाक मुरडीत म्हणाले, “त्याने दुसऱ्याला वाचवले; जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःला वाचवावे!” शिपायांनीही जवळ येऊन, आंब त्याच्या पुढे धरून त्याची अशी थट्टा केली की, “तू यहुद्यांचा राजा आहेस तर स्वत:ला वाचव!" 
हा "यहुद्यांचा राजा आहे," असा एक लेखही त्याच्या वरती होता.
क्रुसावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वत:ला आणि आम्हाला वाचव!” परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय ? आपली शिक्षा तर यथान्याय्य आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहो; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही." मग तो म्हणाला, “हे येशू, तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर." तो त्याला म्हणाला, "मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकांत असशील."
आता सुमारे दोन प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसऱ्या प्रहारापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!" असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नितिमान होता!" हे दृश्य पाहण्याकरिता जमलेला सर्व समुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. तेव्हा त्याच्या ओळखीचे सर्वजण आणि ज्या स्त्रिया त्याच्यामागे गालिलाहून आल्या होत्या त्या हे पाहत दूर उभ्या राहिल्या होत्या. यहुद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन आणि धार्मिक होता; त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती आणि तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. ते त्यांनी खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले; ह्या कबरेत अद्याप कोणाला ठेवले नव्हते. तो तयारी करण्याचा दिवस होता आणि शब्बाथ सुरू होणार होता. गालिलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्या मागून येऊन ती कबर पाहिली आणि त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले; मग त्यांनी परत जाऊन सुंगधी द्रव्ये व सुवासिक तेल तयार केले. शब्बाथ दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:  ख्रिस्तसभा आजपासून पवित्र आठवड्यात प्रवेश करीत आहे. आजचा दिवस 'झावळ्यांचा रविवार' किंवा 'दुःखसहन रविवार' म्हणून प्रसिद्ध आहे. आपले दुःखसहन, मरण व पुनरुत्थान ह्यांना सामोरे जाण्यासाठी येशू मोठ्या विजयोत्सवाने येरूशलेममध्ये प्रवेश करतो. दुःखाला सामोरे जायचे ते विजयी मुद्रेने आणि त्यावर मात करण्याच्या आत्मविश्वासाने असे येशू दर्शवितो. आजच्या दिवशी मत्तय (पहिले वर्ष), मार्क (दुसरे वर्ष) किंवा लूक (तिसरे वर्ष) ह्यांच्या शुभवर्तमानातून येशूचे दुःखसहन वाचले जाते. ह्यावर्षी आपण लूकच्या शुभवर्तमानातील दुःखसहनावर चिंतन करणार आहोत. त्यासाठी ने पुढील तीन मुद्दे प्रेरणादायी ठरतील. 
. तीन 1, स्तरांवरील दुःख : शुभवर्तमानकारांनी जे येशूच्या दुःखाचे वर्णन केलेले आहे ते तीन पातळीवरचे दुःख आहे. शारीरिक पातळीवर येशूला फटके मारणे, डोक्यावर काट्यांचा मुकूट चढविणे, खांद्यावर क्रूस देणे, क्रूसावर खिळणे. | अशा गोष्टींचा समावेश होतो. तर मानसिक /भावनिक पातळीवर गेथसेमनी बागेत उदास व अतिरिक्त होणे, अधिकाऱ्यांसमोर चुकीचे आरोप केल्यामुळे मानहानी होणे, शिपायांनी व कामदारांनी थट्टा - मस्करी केल्याने अपमान होणे, लोकांनी बरब्बाची निवड केल्याने आपल्यावर अन्याय झाल्यासारखे वाटणे अशा दुःखांचा समावेश होतो. तर आध्यात्मिक पातळीवर खुद देवानेही आपला त्याग केला की काय असे येशूला वाटले. 
२. दुःखसहनातून करुणेचे दर्शन मात्र असे दुःख सहन करताना येशूच्या करुणायुक्त हृदयाचा प्याला कधीही रिकामा होताना दिसत नाही. तो येरुशलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. कान कापलेल्या दासाला बरे करतो, उजवीकडील चोराला स्वर्गराज्याचे वचन देतो, आपल्या मारेकऱ्यांना क्षमा करतो आणि कुठलाही गाजावाजा न करता शांतपणे आपला आत्मा देवबापाच्या हाती सोपवितो. 
३. दुःखसहनातून शिष्यत्वाची कसोटी असे सर्व असताना शिष्य मात्र येशूच्या दुःखाचा भार वाढवीत असल्याचे दिसून येते. ज्युदास त्याचे चुंबन घेतो, पेत्र त्याला नाकारतो, इतर सर्वजण त्याला एकटे सोडून पळून जातात, शिमोन सिरेनीकर मात्र त्याला सहाय्य करतो. स्त्रिया त्याला शेवटपर्यंत सोबत देतात. उजवीकडील चोर त्याला देव मानतो. शताधिपती त्याच्या नीतिमत्वाची साक्ष देतो.

आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात मी कोणकोणत्या पातळीवर दुःख भोगत आहे? ते सहन करताना माझ्यामधील प्रेम व करुणा कमी होत आहे की वाढत आहे? येशूचा एक सच्चा अनुयायी म्हणून मला दुःखाला कसे सामोरे जाता येईल ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तूच आमचा राजा, मुक्तीदाता व प्रभू आहेस, आमची श्रद्धा बळकट कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या