गुरुवार ७ एप्रिल २०२२
(उपवासकाळ ५वा सप्ताह )
“जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. "
संत जॉन बॅप्टिस्ट डे लासाले
- वर्तनसाक्षी (१६५१-१७१९)
चिंतन : “विचाराबरोबरं समर्पित वृत्ती, परोपकाराबरोबर विवेकशीलता आणि कनवाळूपणाबरोबर खंबीर मनोवृत्ती ह्यांचा मिलाफ घडून आला तर जीवन फुलून जाते.” - संत जॉन डे ला साले
✝️
सर्व सामर्थ परमेश्वराने आब्राहमाबरोबर करार स्थापन केला. त्याला अभिवचन दिले, 'मी तुला अति फल संपन्न करीन, तुजपासून मी राष्ट्र निर्माण करीन.' आब्राहमने देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला. आब्राहम देवाला शरण गेला व देवाबरोबर एकनिष्ठ राहिला. आब्राहमला दीर्घायु लाभले आणि त्याच्यापासून मोठी राष्ट्र निर्माण झाली.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देताना म्हणत आहे की, 'जर कोणी माझे वचन पाळील त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.' प्रभू येशूचे वचन म्हणजे सत्य आहे. प्रभू येशूच्या वचनात सामर्थ्य आहे. प्रभूच्या वचनात | जीवनाचा प्रकाश आहे. प्रभूच्या वचनात स्वर्गीय आनंद आहे. प्रभूच्या वचनाने | जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. प्रभूचे वचन म्हणजे जीवन देणारा कृपेचा झरा आहे. प्रभूचे वचन आजारात, संकटात व दुःखात धीर देते.
पहिले वाचन उत्पत्ती १७:३-९
वाचक उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तू राष्ट्रसमुहाचा जनक होशील."
अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला, “पाहा, तुझ्याशी माझा करार हा आहे- तू राष्ट्रसमुहाचा जनक होशील. यापुढे तुला अब्राम म्हणणार नाहीत, तुला आब्राहाम असे म्हणतील; कारण मी तुला राष्ट्रसमुहाचा जनक केले आहे. मी तुला अती फलसंपन्न करीन; तुझ्यापसून मी राष्ट्र निर्माण करीन, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यान्पिढ्या करीन. ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन."
देव आब्राहामला आणखी म्हणाला, "आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यान्पिढ्या माझा करार पाळावा."
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०५ : ४-९
प्रतिसाद : प्रभू आपला करार सदा आठवतो
१) प्रभूचा व त्याच्या सामर्थ्याचा शोध करा;
त्याच्या दर्शनासाठी सतत आतुर असा
त्याची अद्भुत कृत्ये,
त्याचे चमत्कार त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
२) त्याचा सेवक आब्राहाम याचे वंशजहो,
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो,
तो प्रभू आमचा देव आहे;
साऱ्या जगावर त्याचीच न्यायसत्ता चालते.
३) तो आपला करार सदा आठवतो,
म्हणजे हजारे पिढयांसाठी दिलेले अभिवचन पाळतो;
तो करार त्याने आब्राहामशी केला,
तो पाळण्याची इसहाकजवळ शपथ घेतली.
जयघोष
आताच समय अनुकूल आहे. आजच तारणाचा दिवस आहे.
शुभवर्तमान योहान ८:५१-५९
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
'तुमचा बाप आब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला. "
येशू यहुद्यांना म्हणाला, “मी तुम्हांला सत्य सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही." यहुदी त्याला म्हणाले, "तुम्हांला भूत लागले आहे हे आता आम्हांला कळले. आब्राहाम मेला संदेष्टेही मेले आणि तुम्ही म्हणता जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. आमचा बाप आबाहाम मेला, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहा काय? संदेष्टेही मेले! तुम्ही स्वतःला काय समजता ?" येशूने उत्तर दिले, “मी माझे स्वतः चे गौरव केले तर ते माझे गौरव काहीच नाही; माझे गौरव करणारा माझा पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता तरी तुम्ही त्याला ओळखले नाही; मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन; पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो. तुमचा बाप आब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला; तो त्याने पाहिला आणि त्याला हर्ष झाला." तेव्हा यहुदी त्याला म्हणाले, "तुम्हाला अजून पन्नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही आब्राहामला पाहिले आहे काय ?" येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, आब्राहामचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे." ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले; परंतु येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: परमेश्वर आब्राहामाबरोबर निरंतरचा करार करतो. जर इस्राएल प्रजा कराराशी विश्वासू राहिली तर देव त्यांच्या बाजुने उभा राहील. त्यांना कनान देश वतनभूमी म्हणून दान मिळेल. आब्राहामाच्या वंशजातून मानवतेचा मुक्तीहार उदयास येईल. हे सर्व एकाच अटीवर अवलंबून राहील. इस्राएल प्रजेने कराराचे पालन करावे. अन्न्य देवतांच्या मागे न जाता, एकाच याहवे परमेश्वराच्या आज्ञा पालनात स्थीर राहावे. ह्याच करारावर शिक्कामोर्तब करताना येशू यहुदी लोकांना सांगत आहे की, 'जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.' कारण प्रभू येशूची वचने आम्हाला चिरंतन सत्याचा मार्ग दाखवत असतात.
प्रार्थना : प्रभू येशू, तुझी वचने म्हणजे आमचे जीवन आहे. तुझी वचने ! स्वीकारण्यास व ती जीवनात आचरणात आणण्यास प्रेरणा व कृपा कृपा दे
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या