बुधवार ६ एप्रिल २०२२
(उपवासकाळ ५वा सप्ताह )
तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील."
संत सेलेस्तीन पहिले
- परमगुरू, वर्तनसाक्षी (४३२)
✝️
आजच्या पहिल्या वाचनात देवावरील विश्वास आणि निष्ठा असलेल्या शद्रख, मैशख आणि अबेदनगो ह्यांचा वृतांत आहे. नबुखदनेसार राजाच्या देवापुढे न नमता त्यांनी सर्वसामर्थ परमेश्वराचीच उपासना केली. त्यांना अग्नीच्या तप्त भट्टीत टाकण्यात आले, मात्र देवाच्या सत्याशी एकनिष्ठ असलेल्या त्या तिघांना देवाने सुरक्षित वाचवले. त्यावेळी सत्याचा आणि खऱ्या देवाचा नबुखदनेसर राजाने स्वीकार केला.
'प्रभू येशूने खऱ्या मुक्तीचा, सत्याचा व देवाच्या अस्तित्वाचा मार्ग सांगितला. आपण अनेक प्रकारच्या बंधनात असतो. गर्व, अहंकार, वासना व दुष्टता यांमुळे आपणाला सत्याचा उलगडा होत नाही. सत्याठायी शुध्दता, पवित्रता आणि दैवी सामर्थ्य वास करते. म्हणूनच आपली श्रध्दा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शाश्वत सत्यावर आधारलेली असावी.
आपल्या प्रत्येकाला मार्ग, सत्य व जीवन असलेल्या ख्रिस्ताची खरी ओळख व्हावी. त्याच्या सत्य प्रकाशात आपले जीवन बंधमुक्त व्हावे व ते सत्य इतरांपर्यंत पोहचविता यावे म्हणून प्रभूकडे सामर्थ्य मागू या.
पहिले वाचन दानिएल ३:१४-२०, २४-२५.२८
वाचक दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“देवाने आपला दिव्य दूत पाठवून आपल्या सेवकांना सोडवले. "
नबुखद्नेस्सर म्हणाला, “अरे शद्रखा, मेशखा अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करत नाही व मी स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातातून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे ?” शद्र्ख, मेशख् व अबेनगो यांनी राजाला उत्तर दिले “महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हांला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोपवील. ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा आम्ही आपल्या -दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही." हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, भट्टी नेहमी पेक्षा सातपट तप्त करा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ट पुरुषांना आज्ञा केली की शद्रख, मेशख व अबेनगो यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. नंतर नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला तो आपल्या मंत्र्यांस म्हणाला “आपण अग्नीत तिघा जणांना बांधून टाकले ना?" त्यांनी राजाला उत्तर केले, “होय सरकार, खरे आहे" तो म्हणाला, “पाहा, चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, त्यांस काहीएक इजा पोहोचली नाही; चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे.
तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यानी आपले देह अर्पिले; त्यांना त्याच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याला धन्यवाद !”
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र दानिएल ६:५२-५६
प्रतिसाद : प्रभो, तुझा सदासर्वदा गौरव असो.
१) हे प्रभो, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा,
तू धन्य आहेस तुझा सदासर्वदा गौरव असो.
तुझे महिमामय पवित्र नाम धन्य असो.
तुझा सदासर्वदा गौरव असो.
२ ) तू आपल्या वैभवशाली मंदिरात धन्य आहेस.
तुझा सदासर्वदा गौरव असो.
३ ) तू आपल्या राजसिंहासनावर धन्य आहेस..
तुझा सदासर्वदा गौरव असो.
४ ) खोलवर दृष्टी टाकणाऱ्या प्रभो, तू धन्य आहेस.
तुझा सदासर्वदा गौरव असो.
५) स्वर्गीय निवासस्थानी तू धन्य आहेस.
तुझा सदासर्वदा गौरव असो.
जयघोष
प्रभू म्हणतो, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही."
शुभवर्तमान योहान ८:३१-४२
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
'जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल "
ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील." ते त्याला म्हणाले, "आम्ही आब्राहामचे वंशज आहो व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता ?"
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला नक्की सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदासर्वदा राहत नाही; पुत्र सदासर्वदा राहतो. ह्यास्तव जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही आब्राहामचे वंशज आहा हे मला ठाऊक आहे; तरी तुम्हांमध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जिवे मारायला पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो. तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता."त्यांनी त्याला उत्तर दिले, “आमचा पिता आब्राहाम आहे." येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही आब्राहामची मुले आहा तर तुम्ही आब्राहामची कृत्ये करा; परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हांला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जिवे मारायला पाहता; आब्राहामने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता" ते त्याला म्हणाले, "आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही; आम्हांला एकच पिता म्हणजे देव आहे." येशूने त्यांना म्हटले, "देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे; मी आपण होऊन आलो नाही तर त्यानेच मला पाठवले आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:
एकाच परमेश्वरावरील अढळ निष्ठा ही हिब्रू समाजाची व त्या समाजातील संताची जगाला देणगी आहे. निष्ठा म्हणजेच एकच देवावर भरवसा ठेवून त्या देवाशी एकनिष्ठ राहणे. जो मनुष्य एकाच देवावर श्रद्धा ठेवून आपले दैनंदिन जीवन जगतो तो जीवनात कधीच तत्त्वशून्य तडजोडी करीत नाही. 'प्राण जाये पर वचन न जाये' या उक्तीनुसार प्रसंगी तत्वासाठी प्राणार्पण करण्यास तयार असतो. संत थॉमस मोर हा एका राजाचा पंतप्रधान होता. राजाला धर्माच्या आज्ञांविरुद्ध वर्तन करायचे होते. त्यासाठी त्याला थॉमस मोरचे सहकार्य हवे होते. परंतु थॉमस मोर आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहिला. शेवटी त्याला मरणाला सामोरे जावे लागेल. शद्रखा, मेशखा, अबेदनगो हे तीन देवभक्त आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहीले. परिणामी देवाने त्यांस वाचविले. आपण आपल्या देवाशी एकनिष्ठ आहोत का ?
प्रार्थना : प्रभू येशू, तूच एकमेव सत्य आहेस, तुझ्या शब्दाप्रमाणे आचरण करण्यास व तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या