मंगळवार ५ एप्रिल २०२२
(उपवासकाळ ५वा सप्ताह )
“पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. "
✝️
चिंतन : अनेक व्रतस्थ लोकांना गरिबीचे व्रत आवडते; परंतु त्या व्रताशी संबंधित असलेले दुःख आणि अपमानास्पद वागणूक ते टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पद व नावलौकिक हवा असतो; परंतु वस्तुस्थितीपासून ते दूर राहतात.- संत विन्सेंट फेरेर
परमेश्वराविरुध्द आणि मोशेविरुध्द कूरकूर करणाऱ्या इस्त्राएली लोकांना देवाने आग्ये साप पाठवून शिक्षा केली. परंतु करुणाकर व दयावंत परमेश्वराने मोशेच्या मध्यस्थीमुळे त्यांच्यावर दया केली. प्रतिकात्मक असा पितळेचा साप खांबावर टांगला व त्याकडे पाहणाऱ्या सर्वजणांना जीवनदान मिळाले. प्रभू येशू त्याच्या दैवी व तारणदायी योजनेविषयी बोलत असताना अनेकांनी अविश्वास दर्शविला असे आपण पाहतो.
पित्याने शिकविल्याप्रमाणेच प्रभू येशूने स्वर्गराज्याची शिकवण दिली. आजसुध्दा प्रभू येशू पित्याच्या उजवीकडे बसून आम्हासाठी मध्यस्थी करीत आहे. जसा अरण्यात मोशेने सर्प उंचावला होता ! तसेच प्रभू येशूला वधस्तंभावर उंचावण्यात आले व तो सर्वांचा मुक्तीदाता बनला आहे. आपण आज चिंतन करू या की प्रभू येशूवर, त्याच्या वचनावर व त्याच्या सुवार्तेवर आपण किती विश्वास ठेवतो. त्याच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करतो का ?
पहिले वाचन गणना २१:४-९
वाचक गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन
“सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो जगेल."
होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध बोलू लागले “तुम्ही आम्हांला इजिप्त देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो." तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले; त्याच्या दंशाने इस्राएलतील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर." तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला; तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे.”
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०२:२-३,१६-२१
प्रतिसाद : प्रभो, माझी प्रार्थना ऐक
संकटकाळी तुझा चेहरा माझ्या नजरेआड होऊ देऊ नकोस.
१) प्रभो, माझी प्रार्थना ऐक माझी हाक तुला ऐकू येवो.
माझ्याकडे लक्ष दे; मी तुझा धावा करीन
त्या दिवशी मला लवकर उत्तर दे.
२) राष्ट्रांना प्रभू नावाचा धाक वाटेल.
भूतलावरील राजांना तुझ्या ऐश्वर्याची धास्ती बसेल;
प्रभू सियोन पुन्हा उभारील,
तेव्हा तो आपल्या ऐश्वर्यासह प्रकट होईल.
निराश्रितांच्या प्रार्थनेकडे तो लक्ष देतो;
त्याची याचना तो धुडकावून लावीत नाही.
३ )पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल,
म्हणजे पुढे जन्माला येणारे प्रभूचे स्तवन करतील;
कारण उंचावरील आपल्या पवित्रस्थळावरून
प्रभूने डोकावले.त्याने स्वर्गातून पृथ्वीकडे नजर टाकली;
बंदीजनांचे कण्हणे ऐकून त्याला मरणाच्या दाढेत
पडलेल्यांची सुटका करायची होती.
जयघोष
प्रभू म्हणतो, "मीच जगाचा प्रकाश आहे.
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील"
शुभवर्तमान योहान ८:२१-३०
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की, तो मी आहे. "
येशू परुशी लोकांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल; मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही." ह्यावर यहुदी म्हणाले, “मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही." असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही ना? तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहे, मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही. ह्यामुळे मी तुम्हांस सांगितले की, तुम्ही आपल्या पापात मराल; कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. ह्यावरून ते त्याला म्हणाले. तुम्ही कोण आहा?" येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला मी जे सांगत आहे ते हेच नाही का ? मला तुम्हांविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे; परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो." तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्याला समजले नाही. ह्यास्तव येशूने त्यांना म्हटले “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडले ते मी सर्वदा करतो." तो ह्या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: परमेश्वराच्या मार्गाने चालण्यासाठी मोशे इस्राएल लोकांना सतत मार्गदर्शन करीत होता. परंतु लोक देवाविरुद्ध व मोशेविरुद्ध तक्रार करीत राहिले. “ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे.” अशी आपल्या भाषेत म्हण आहे. कुरकूर करणे, तक्रार करणे, दुसऱ्यापेक्षा माझ्याकडे कमी आहे म्हणून वादविवाद करणे. हा आपला मानवी स्वभाव आहे. ख्रिस्ती माणसाच्या जीवनात जेव्हा परीक्षेला सामोरे जायची वेळ येईल तेव्हा आपली दृष्टी देवावर ठेवणे व त्यांच्यावरच भरवसा ठेवणे आवश्यक आहे. आपल्या जीवनातील संकटे व समस्या यामुळे आपण निराश झालो आहोत का? शुभवर्तमानात प्रभू येशू व यहुदीयांचे पुढारी यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाल्याचे दृष्टीस पडते. स्वर्गीय पित्याविषयी सांगितलेले वचन स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. प्रभु येशूद्वारे जे सत्य प्रकट होत होते त्यापासून ते शेवटपर्यंत दूर राहिले. हे प्रभो, तुझ्याठायी प्रकट झालेले स्वर्गीय पित्याचे रहस्य समजण्याची कृपा आम्हाला दे.
प्रार्थना : प्रभू येशू, आमच्या जीवन मार्गदर्शका, पूर्ण श्रद्धेने तुला शरण येण्यास वे तुला जाणण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या