Marathi Bible Reading | Monday 4th April 2022 | 5th Week of Lent |

सोमवार ४ एप्रिल २०२२ 

(उपवासकाळ ५वा  सप्ताह )

 "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा."




संत इजिदोर
- महागुरू, धर्मपंडित (५५६-६३६)

✝️ 

  दुर्बलांचे व अन्याग्रस्तांचे परमेश्वर रक्षण कसे करतो त्याची घटना सांगण्यास आली आहे. सुसन्ना नावाच्या सुंदर स्त्रीवर मोहित झालेल्या वासनाधुंद वृद्धांनी व्याभिचाराचा आरोप ठेवला होता. सुसत्राची परमेश्वरावरील श्रद्धा आणि निष्ठापणाला लागली. शेवटी परमेश्वराने दानीएल संदेष्ट्याच्या चातुर्याने निर्दोष सुसत्राची सुटका केली. परमेश्वर जणू स्वतःच दुर्बलांचा व अन्यायग्रस्तांचा| कैवार घेत असतो.
शुभवर्तमानात व्यभिचारी स्त्रिला यहुदी नियमाप्रमाणे चव्हाट्यावर  आणून दगडाने मारुन ठार करण्याची देहांत शिक्षा करण्याच्या तयारीत असताना येशू तिथे हजर होतो. अनेक वयस्कर आणि अनुभवी व्यक्ती त्या ठिकाणी हजर असतात. सर्वांनी हातात दगड उचलले असताना येशू म्हणतो, 'तुम्हामध्ये जो  निष्पाप असेलत्याने प्रथम तिला दगड मारावा.' प्रभू येशूचे हे शब्द ऐकताच  हजर असलेल्या प्रत्येकाच्या हातातीलदगड खाली पडले. प्रत्येक व्यक्ती पापत  पडते. परमेश्वर प्रेमळ आहे, त्याच्या सानिध्यात जाणाऱ्यांना व पश्चातापी अंतःकरणाने क्षमेची याचना करणाऱ्यांना तो जवळ करतो. पश्चातापाच्या प्रत्येक अश्रूचा प्रभूला कळवळा आहे. म्हणूनच तो म्हणतो, 'जा, यापुढे पाप करु नको.'
✝️   

पहिले वाचन दानियेल  १३:१-९,१५-१७, १९-३०,३३-६२
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “मी काहीच गैर केले नाही; तरी मला मेले पाहिजे. "

जोकीम नावाचा एक मनुष्य बाबिलोनमध्ये राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सुसन्ना होते. ती हिलकियाची मुलगी होती. ती अत्यंत सुंदर व प्रभूभक्त होती. तिचे आईवडील सज्जन होते. त्यांनी मोशेच्या आज्ञांप्रमाणे तिला शिक्षण दिले होते. जोकीम फार श्रीमंत होता. त्याच्या घराला लागूनच त्याचा भव्य असा बगीचा होता. यहुदी लोक त्याच्याकडे भेटीला येत असत. तो त्याच्यातला अधिक प्रतिष्ठित असा होता. त्या वर्षी लोकांमधून दोन वडीलजन न्यायाधीश म्हणून नेमले होते. त्यांच्याविषयी प्रभूने असे म्हटले होती, “बाबिलोनमध्ये या नेत्यांपासून अधर्म सुरू झाला. ते न्यायाधीश होते परंतु जनतेचे राज्य सांभाळण्याचे ढोंग करीत होते." ही माणसे पुष्कळ वेळा जोकीमच्या घरी असत व ज्यांच्या फिर्यादी होत्या. ते तेथे त्याच्याकडे येत..
जेव्हा लोक दुपारी निघून जात तेव्हा सुसन्ना आपल्या पतीच्या बागेत फिरायला जात असे. ते दोघे वडीलजन तिला रोज बागेत इकडे तिकडे फिरताना पाहात असत. त्यांना तिच्या सहवासाची इच्छा होऊ झाली. त्याचे मन इतके विकृत झाले की, त्यांनी स्वर्गाकडील आपली दृष्टी फिरवून नैतिकतेचे सर्व नियम झुगारून दिले. ते योग्य संधीची वाटच पाहत होते; तोच असे झाले की, सुसन्ना दोन नोकराणींबरोबर आपल्या सवयीप्रमाणे बागेत गेली त्या दिवशी फार गरम होत होते. म्हणून तिला आंघोळ घ्यावीशी वाटली. त्या दोन वडीलजनांशिवाय तिकडे कोणीही नव्हते. ते लपून तिच्याकडे पाहात होते. तिने आपल्या नोकराणींना सांगितले, "माझ्यासाठी तेल आणि सुगंधी द्रव्ये आणा आणि बागेचे फाटक बंद करा म्हणजे मला आंघोळ करता येईल."
नोकराणी बाहेर जाताच ते दोघे वडीलजन उठून सुसन्नाच्या जवळ धावत गेले आणि तिला म्हणाले, "पहा, फाटकाचा दरवाजा बंद आहे; कोणीही आपल्याला पाहत नाही; आम्ही तुझ्यावर आसक्त झालो आहोत; आमच्याबरोबर प्रणय कर. नाहीतर तुझ्या विरुद्ध आम्ही अशी साक्ष देऊ की, कोणी युवक तुझ्याबरोबर होता आणि म्हणून तू आपल्या नोकराणींना बाहेर पाठवलेस."
सुसनाने उसासा टाकून म्हटले, "मला कोणताच मार्ग दिसत नाही. जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले तर मी प्राणदंडास योग्य ठरेन; तर मी नकार दिला तर तुमच्या तावडीतून सुटणार नाही. तरी देखील परमेश्वरासमोर पाप करण्यापेक्षा तुमच्या तावडीत निर्दोषी सापडणे मी पसंत करीन."
त्यानंतर सुमन्ना मोठ्या आवाजात ओरडू लागली, परंतु ते दोघे वडीलजन तिच्या विरुद्ध ओरडू लागले. त्यांच्यापैकी एकाने धावत जावून बागेचे फाटक उघडले. त्यावेळी घरातल्या नोकरवर्गाने बागेत ओरडण्याचा आवाज ऐकला, आणि सुसनाला काय झाले हे पाहण्यासाठी ते धावत आले व बाजूच्या दरवाजाने बागेत गेले. जेव्हा वडीलजनांनी आपली हकिकत सांगितली, तेव्हा नोकरांना मोठा धक्का बसला; कारण सुसत्रावर अशा प्रकारचा आरोप कधीच कुणी केला नव्हता.
दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व लोक तिचा पती जोकीम याचेकडे एकत्र जमले तेव्हा ज्या दोन दुष्ट वडोलजनांनी सुसनाला प्राणदंड देण्याचे कुभांड रचले होते, ते तेथे आले आणि त्यांनी लोकांसमोर सांगितले, "हिलकियाची मुलगी, जोकीमची पत्नी सुसन्नाला बोलावून आणा." लोकांनी तिला बोलावून आणले. ती आपले आई-वडील, आपली मुले तसेच आपले सर्व आप्तजन यांच्या समवेत तेथे आली. तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार व जेवढयांनी तिला पाहिले होते ते सर्वच्या सर्व रडत होते. त्या दोन वडीलजनांनी सभेमध्ये उभे राहून तिच्या डोक्यावर आपले हात ठेवले. ती रडत स्वर्गाकडे पाहत राहिली. तिने परमेश्वरावर विश्वास ठेवला होता. वडीलजनांनी सांगितले, “जेव्हा आम्ही एकटेच बागेत फिरत होतो, तेव्हा ही दोन नोकराणींबरोबर बागेत आली; हिने बागेचे फाटक बंद केले आणि नोकराणींना बाहेर पाठवले. तेव्हा लपून राहिलेला एक तरुण जवळ येऊन तिच्याबरोबर झोपला. आम्ही बागेच्या एका कोपऱ्यातून हे पाप पाहून धावत त्याच्याजवळ गेलो आणि आम्ही दोघांना प्रणय करताना पाहिले. आम्ही त्या तरुणाला पकडू शकलो नाही, कारण तो आमच्याहून बलवान होता; बागेचे फाटक उघडून तो पळून गेला. आम्ही हिला पकडले व विचारले की, तो युवक कोण आहे? परंतु तिने त्याचे नाव सांगायचे नाकारले. आम्ही या गोष्टींना साक्षी आहोत." सभेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण ते लोकांचे नेते आणि न्यायाधीश होते.
(लोकांनी सुसन्नाला प्राणदंडाची शिक्षा फर्मावली. यावर सुसन्नाने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, “हे शाश्वत परमेश्वरा, तू सर्व रहस्ये आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टी जाणून असतोस; तू जाणतोस की, यांनी माझ्याविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे. यांनी ज्या वाईट गोष्टींचा माझ्यावर आरोप केला आहे. त्यातली एकदेखील खरी नाही! तरीही मला मरणे भाग आहे."
परमेश्वराने तिचा आक्रोश ऐकला. जेव्हा लोक तिला प्राणदंडासाठी नेत होते, तेव्हा परमेश्वराने दानिएल नावाच्या तरुणात एक दिव्य प्रेरणा उत्पन्न केली. तो ओरडून सांगू लागला, मी हिच्या रक्ताबद्दल दोषी नाही."
यावर सर्व लोक त्याच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, "तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे ?" त्याने त्यांच्याकडे उभे राहून म्हटले "हे इस्राएली लोकांनो, तुमची बुद्धी कोठे आहे ? तुम्ही चौकशी न करता आणि संपूर्ण माहिती न मिळवता इस्राएलच्या मुलीचा वध का करत आहात? तुम्ही सर्व न्यायालयात परत जा. कारण ह्यांनी हिच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे."
यावर लोक लगेच माघारी फिरले आणि वडीलजनांनी दानिएलला सांगितले, "या, आमच्यामध्ये बसा आणि आपली माहिती द्या, कारण परमेश्वराने आपल्याला अधिकार प्रदान केला. आहे." दानिएलने त्यांना उत्तर दिले, "या दोघांना एकदुसऱ्यापासून अलग करा आणि मग मी यांची चौकशी करीन." दोघांना वेगळे केले गेले, तेव्हा दानिएलने एकाला बोलावून म्हटले, "अधर्म करून तुझे केस पिकले, आता तुला जुन्या पापांचा दंड मिळणार आहे. तू निर्दोषी लोकांना दंडपात्र ठरवून व दोषी लोकांना निर्दोष सोडून खोटा न्याय देत होतास; प्रभूने तर म्हटले आहे, तुम्ही निर्दोष आणि धार्मिकांना प्राणदंड देऊ नका. जर तू तिला पाहिले, तर मला सांग की, कोणत्या झाडाखाली दोघांना तू एकत्र प्रणय करताना पाहिलेस?" त्याने उत्तर दिले, "बाभुळाच्या झाडाखाली." दानिएल म्हणाला, "ठीक आहे! एवढे मोठे खोटे सांगून तू आपले प्राण गमावून बसला आहेस, कारण परमेश्वराच्या दुताला परमेश्वराकडून असा आदेश मिळाला आहे की, त्याने त्वरित तुझे दोन तुकडे करावेत. "
नंतर दानिएलने त्याला घेऊन जाण्याची आज्ञा केली व दुसऱ्याला बोलवायला सांगितले आणि त्याला म्हटले, "तू यहुदाचा नव्हे तर कनानची संतती आहेस. सौंदर्याने तुला पतभ्रष्ट केले आणि वासनेने तुझे हृदय दूषित झाले आहे. तुम्ही लोक इस्राएलच्या मुलींबरोबर अशा प्रकारचे व्यवहार करीत होते आणि त्या भीतीने तुमची इच्छा मान्य करीत होत्या; परंतु ही यहुदाची मुलगी आहे, तिने अधर्माच्या समोर आपली मान वाकवली नाही. तर मला सांग तू कुठल्या वृक्षाखाली दोघांना एकत्र प्रणय करताना पाहिलेस?" त्याने उत्तर दिले, "ओकच्या झाडाखाली" यावर दानिएल म्हणाला, "ठीक आहे! तू पण एवढे मोठे खोटे बोलून आपला जीव गमावला आहेस, परमेश्वराचा दूत हातात तरवार घेऊन तुझी वाट पहात आहे; तो तुझे दोन तुकडे करील आणि तुम्हा दोघांचा सर्वनाश करील."
तेव्हा सर्व लोक मोठ्या आवाजात जयजयकार करून परमेश्वराला धन्यवाद देऊ लागले की, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचे तो संरक्षण करतो, दानिएलने त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांतूनच त्या दोन वडीलजनांची साक्ष खोटी ठरवून दाखवली. लोक त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे त्या दोन दुष्टांना दंड केला, तो दंड ते आपल्या शेजाऱ्याला देऊ इच्छित होते. लोकांनी दोघांना मृत्युदंड दिला. अशाप्रकारे त्या दिवशी निर्दोषी सुसन्नाचा बचाव झाला.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  २३:१-६
प्रतिसाद : प्रभो, तू माझा सांगाती आहेस.

१ ) प्रभू माझा मेंढपाळ आहे; 
मला कशाची कमतरता नाही. 
तो मला हिरव्या कुरणात विसावू देतो. 
तो मला प्रशांत जलाशयाकडे नेतो. 
तो मला नवजीवन देतो.

२)आपल्या गौरवासाठी तो मला सन्मार्ग दाखवतो. 
मृत्यूछायेच्या दरीतून जरी मी जात असलो 
तरी कुठल्याही संकटाला मी भिणार नाही, 
कारण तू माझा सांगाती आहेस. 
तुझा सोटा व तुझी काठी मला धीर देतात.

३) माझ्या शत्रूंच्या देखत तु माझ्यासाठी मेजवानी करतोस.
 तू माझ्या डोक्याला तेल लावून 
आशीर्वादित केले आहेस. माझा पेला ओसंडत आहे.

४ खरेच, आयुष्यभर मला सुखाचे व 
प्रेमाचे दिवस लाभतील आणि 
प्रभूच्या निवासस्थानी मी निरंतर राहीन..


जयघोष  
प्रभो, तुझे शब्द आत्मा व जीवन आहेत.
तुझ्यापाशी शाश्वत जीवनाचे शब्द आहेत.



शुभवर्तमा योहान ८:१-११
वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन   

“तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड मारावा.

येशू जैतुनाच्या डोंगरावर गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुशी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले "गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता ?" त्याला दोष लावावयाला आपणांस काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारीत असता ते उठून त्यांना म्हणाला, "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा." मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून ते थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला; “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही का ?" ती म्हणाली “प्रभो, कोणी नाही." तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा, ह्यापुढे पाप करूं नको."

प्रभूचे हे शुभवर्तमान  

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: परमेश्वर दुर्बलांचे रक्षण करतो. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांची तो बाजू घेतो. अशी जुन्या कराराची महत्वपूर्ण शिकवण आहे. सुसान्ना नावाची एक देवभिरू व निष्ठावान स्त्री होती. तिचा परमेश्वरावर विश्वास होता. कठीण परिस्थितीत देखील परमेश्वर आपले रक्षण करील इतका दृढ विश्वास तिला प्रेरणा देत होता. दोन वासनाधुंद पुरुषांनी तिच्याविरुद्ध कुभांड रचले आणि तिला कुलटा ठरविण्याचे कारस्थान रचले. तिच्या समोर दोन पर्याय दिसत होते. पहिला, त्या पुरुषांच्या म्हणण्याप्रमाणे केले तर ती समाजाच्या परंपरेनुसार प्राणदंडास पात्र ठरेल व दुसरा पर्याय जर त्यांना नकार दिला तर त्यांच्या तावडीतून सुटणारच नाही. अशावेळी सुसन्नाने ईश्वराकडे करुणा भाकली व प्रार्थना केली. देवाने तिला आपल्या विश्वासाचे बक्षिस दिले. खोटेपणा करणारे लोक अंधाराची आस धरतात. |सुसान्नाप्रमाणे मी देवावर निष्ठा ठेऊन सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे का ?

प्रार्थना : प्रभो, माझ्या पापांची मला जाणीव होऊन मी माझे चांगले व पवित्र जीवन जगण्यास मला मदत कर, इतरांचा न्याय न करता मी माझे पाप रडावे म्हणून मला पवित्र आत्म्याचे दान दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या