रविवार ३ एप्रिल २०२२
(उपवासकाळ ५वा रविवार)
"जा ह्यापुढे पाप करु नको."
✝️
‘तुम्हामध्ये निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड मारावा.’
✝️
परमेश्वर हाच मुक्तिदाता आहे त्याच सामर्थ्यशाली परमेश्वराने इस्त्राएलला सर्व संकटातून बाहेर काढले ह्याची जाणीव आजच्या वाचनात करुन देत आली आहे.
व्यभिचारी स्त्री ची घटना : प्रभू येशू दयेचा, करुणेचा आणि क्षमेचा महासागर आहे, हे आजच्या शुभवर्तमानात स्पष्ट झाले आहे. शास्त्री परुशांनी येशूसमोर व्यभिचारी स्त्रीला उभे करून मोठे आव्हान दिले. कारण नियमशास्त्राप्रमाणे व्यभिचारी माणसाला दगडमार करून ठार करण्याची शिक्षा देण्यात येत असे. मात्र प्रभू येशूने म्हटले, ‘तुम्हामध्ये निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड मारावा.’ प्रभू येशूने । शास्त्री परुशांना व जमावाला जाणीव करुन दिली की सर्वजण पापी आहेत. कुणाचाही न्याय करण्यास आपण अपात्र आहोत. इतरांना दोष देण्याऐवजी आपण आपल्या अंतर्मनात डोकावून पहावे.
पुन्हा पुन्हा प्रभू आपल्याला पश्चाताप करण्याची संधी देत असतो. आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करुन ह्या पश्चाताप काळात चांगले कुमसार करु या. प्रभूला अपेक्षित चांगले जीवन जगण्यास कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन यशया ४३:१६-२१
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पाहा, मी नवीन गोष्ट करणार आहे; मी माझ्या निवडलेल्या लोकांना पिण्यासाठी पाणी देणार आहे."
जो समुद्रात मार्ग करतो, प्रचंड प्रावाहात वाट करतो, ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर यांना बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत, त्यांच्याने उठवले नाही, ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत, असा जो परमेश्वर तो म्हणतो, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आताच ती उद्भवत आहे व तुम्ही ती पाहणार आहात. मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. नवपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवर करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देईन, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १२६:१-६
प्रतिसाद : परमेश्वराने आम्हासाठी महाकृत्ये केली !
१ सियोनातून धरून नेलेल्या लोकांना परमेश्वराने
परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हांला वाटले.
तेव्हा आमचा चेहरा हास्याने व आमची जिव्हा गायनाने भरली.
२)त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की,
परमेश्वराने याच्यासाठी महत्कृत्ये केली !
परमेश्वराने आम्हासाठी महत्कृत्ये केली आहेत!
त्यामुळे आम्हाला अत्यानंद झाला आहे.
३) हे परमेश्वरा, कोरड्या भूमीतल्या ओढ्याप्रमाणे,
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी प्रेरणा करतात
ते हर्षाने कापणी करतात..
४) जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो
तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.
दुसरे वाचन फिलिपे ३:८-१४
वाचक: पौलचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्तासाठी मी सर्व गोष्टींना मुकलो आहे."
ख्रिस्त माझा येशू प्रभू याच्याविषयी ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा असा लेखतो; मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे. तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची ओळख, मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन, करून घ्यावी; म्हणजे कसेही करून मी मृत लोकांमधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यात मी पूर्ण झालो आहे असे नाही; तर ज्याच्याठायी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे; म्हणून मी त्याच्या मागे लागत आहे. बंधूनो, मी अद्यापि ते आपल्या ताब्यात आणले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी अंतिम ध्येयाच्या दिशेने मी धावतो, हेच एक माझे काम आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
तुम्ही माझ्याविरुद्ध आचरलेले आपले सर्व दुराचार टाकून द्या आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा.
शुभवर्तमान योहान ८:१-११
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ८:१-११
"तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.
येशू जैतुनांच्या डोंगरावर गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लाके त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी शास्त्री व परुशी ह्यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, "गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता ?" त्याला दोष लावावयाला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारीत असता ते उठून त्यांना म्हणाला, “तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा." मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून ते थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला; “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत ? तुला कोणी दंड ठरवला नाही का ?” ती म्हणाली “प्रभूजी कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा, ह्यापुढे पाप करू नको.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: जीवनाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोण असू शकतात. आजची वाचने आपल्यापुढे तीन प्रकारचे दृष्टिकोण सादर करतात
१) सकारात्मक व आशावादी दृष्टिकोण : असा दृष्टिकोण बाळगणारा मनुष्य सतत आनंदी व उत्साही असतो. इस्राएली लोक बाबिलोनच्या हद्दपारीत असताना प्रचंड हालअपेष्टांना सामोरे जात होते. अशा पार्श्वभूमीवर यशया संदेष्टा त्यांना गतकाळच्या गोष्टी मनात न आणण्यास व भविष्याकडे आशेने पाहण्यास प्रवृत्त करीत आहे. ज्याने समुद्रात कोरडी भूमी निर्माण करून इस्राएली लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर आणले तो त्यांना आत्ता लोकांसाठी अरण्यात सडक निर्माण करील व ओसाड भूमीत पाण्याचे झरे वाहते करील असा आशावाद यशया संदेष्टा लोकांच्या मनात उत्पन्न करतो.
२. सुदृढ व उदात्त दृष्टिकोण : असा दृष्टिकोण असणारी व्यक्ती जे सुदृढ व उदात्त आहे त्याची निवड करते आणि जे जीवनाला हानीकारक व विघातक आहे त्याचा त्याग करते. फिलिप्पैकरांस लिहिलेल्या पत्रात |संत पौल श्रद्धावंतांना येशूचा स्वीकार करणे म्हणजे जागतिक / ऐहिक सुखाचा त्याग करणे अशी शिकवण देतो. जी व्यक्ती शरीर व जग ह्यांच्या सुखात अडकते तिला स्वर्गीय व आध्यात्मिक सुख अनुभवता येत नाही. संतअगस्तीन म्हणतात, “निकृष्ट दर्जाच्या सुखावर उत्कृष्ट दर्जाच्या सुखाने मात करा.” तर |लोकमान्य टिळक म्हणतात “आपल्यातील मोठेपणाने दुसऱ्यातील छोटेपणाला कवेत घ्यायचे असते.”
३. पवित्र व सात्विक दृष्टिकोण : असा दृष्टिकोण असणारी व्यक्ती आपल्या मूळ पवित्र व निरागस जीवनाकडे परतत असते. आजच्या शुभवर्तमानात तीन प्रकारचे लोक आपल्याला दिसून येतात. येशू हा अस्सल पावित्र्याचा मूर्तिमंत पुतळा होय, शास्त्री-परुशी हे उसन्या व नकली पावित्र्याचे प्रतिक होते तर व्यभिचारी स्त्री ही पापातरुतलेल्या मानवजातीचे प्रतिक आहे. उसने व पावित्र्य इतरांना न्याय करते तर अस्सल पावित्र्य इतरांचे तारण व परिवर्तन करते. पवित्र व सात्विक दृष्टिकोणात सर्वांचे कल्याण दडलेले असते.
आत्मपरीक्षण : जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोण कसा आहे? “यापुढे पाप करू नकोस.” या येशूच्या शब्दातील पावित्र्याची हाक आपल्याला कोणते आवाहन करते ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, मज पाप्यावर दया कर, मला तुझ्या कृपेत वाढण्यास प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या