पुनरुत्थान ६ वा सप्ताह
शुक्रवार २७ मे २०२२
कॅंटबारीचे संत अगस्तीन
महागुरू वर्तनसाक्षी (...... -६०५)
दुःख आणि सुख हे माणसाच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. मात्र अंधाऱ्या रात्रीनंतर जशी पहाट होते तसेच दुःखानंतर सुखाचा आनंद उदय पावतो. विशेषत: आपल्या दु:खाकडे सकारात्मकतेने पाहून त्यातून बोध घेऊन आपण जीवनात मार्गक्रमण करावे हेच प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित आहे.
स्वर्गीय आनंदाचे सहभागीदार बनण्यासाठी जीवनातील सर्व दु:खाकडे सकारात्मकतेने पाहण्यासाठी आपल्या जीवनात देवाला प्राधान्य देऊ या. देवाच्या आज्ञेप्रमाणे जीवन आचरण करु या. आपल्या शब्दाद्वारे व आचरणाद्वारे इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी तत्पर राहू या. प्रथम आपण स्वत: आनंदी आहोत का यावर चिंतन करु या.
.✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १८:९-१८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत."
प्रभूने रात्री पौलला दृष्टान्तात म्हटले, “ भिऊ नको, बोलत जा, उगा राहू नको. कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझे वाईट करायला कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत." तो त्यांच्या मध्ये देवाचे वचन शिकवीत दीड वर्ष राहिला.
गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहुद्यांनी एकोपा करुन पौलवर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले, "हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजायला चिथवतो." तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहुद्यांना, “अहो यहुद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे (अथवा दुष्कृतीचे) असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले असते. परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या. ह्या गोष्टींची पंचाईत मला नको." असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून हाकून लावले. तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिकार सोस्थेनेस ह्याला धरुन न्यायासनासमोर मार दिला. पण गल्लियोने ह्यांपैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही.
ह्यानंतर पौल तेथे आणखी बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सुरिया देशाला गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला आणि अक्विल्लाही गेली. त्याचा नवस होता म्हणून त्याने किंखिया येथे आपल्या डोक्याचे केस कातरुन घेतले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४७:२-७
प्रतिसाद : परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे.
१) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा,
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा!
कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे,
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.
२) तो लोकांना आमच्या ताब्यात देतो,
राष्ट्रांना आमच्या पायांखाली घालतो.
त्याचा आवडता याकोब याला ज्या वतनाचा अभिमान होता,
ते त्याने आम्हांसाठी निवडले आहे.
३) जयघोष होत असता देव वर गेला आहे,
कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.
देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा;
आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १६:२०-२३
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हांला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजच्या शुभवर्तमानात, येशू त्याच्या शिष्यांना चेतावणी देतो की, त्यांच्या आयुष्यात कठीण दिवस येतील, त्यामुळे ते शोक करतील, रडतील. परंतु त्यांच्या जीवनात अशीही वेळ येईल, जेव्हा त्यांचे दुःख आनंदात बदलेल. त्यांचा संदेश समजून देण्यासाठी येशू त्यांना स्त्री प्रसूतीचे उदाहरण देतो. ज्याप्रमाणे बाळ जन्मल्यानंतर स्त्रीच्या वेदना आनंदात बदलतात, त्याचप्रमाणे शिष्यांनी दुःख व यातना सहन केल्यानंतर त्यांचेही अंतःकरण आनंदित होईल आणि तो आनंद त्यांच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मला खात्री आहे की, तुमच्या जीवनातही तुम्हांला आजार, नात्यांमध्ये कठीण आव्हाने किंवा काही प्रकारच्या नुकसानाला सामोरे जावे लागले असेलच. अशावेळी तुम्ही काय भावना अनुभवल्या आहेत ? राग, भीती, दुःख, निराशा ? तुम्हांला देवाची उपस्थिती जाणवली आहे का? किंवा तुम्ही एकटे पडून घाबरून गेलात? आजच्या शुभवर्तमानाचा संदेश हाच आहे की, या जगात यातनामुक्त जीवन शक्य नाही. तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि यातनामय जीवन जगल्याशिवाय ख्रिस्ताचा खरा आनंद काय आहे हे आपल्याला कळणारच नाही. मी आजार, दुःख आणि कठीण आव्हानाला सामोरे जाण्यास का घाबरते / घाबरतो ? अशावेळी मी काय पाऊल उचलते / उचलतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासात सर्वकाळचा आनंद अनुभवण्यास मला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या