पुनरुत्थान ६ वा सप्ताह
शनिवार २८ मे २०२२
प्रभू परमेश्वर आज शाश्वती देऊन सांगत आहे की, 'मागा म्हणजे मिळेल.' आपले जीवन विपूलतेने भरलेले असावे म्हणून आज अंतर्मुख बनून प्रभूच्या वचनावर चिंतन करु या. त्याच्या शाश्वत आनंदाकडे वाटचाल करण्यास प्रेरणा मागू या.
परमेश्वराची कृपा व आत्म्याठायी आनंद पावलेल्या अपुल्लोने इफिसमध्ये व अखया प्रांतात प्रभू येशूची साक्ष दिली. पवित्र आत्मा अपुल्लोला निर्भिडपणे बोलण्यास प्रेरणा देत होता. साहजिकच देवाचे प्रेम व दया अनुभवल्यानेच प्रभूची साक्ष देणे सोपे होत असते.
.✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १८:२३-२८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"येशू हाच ख्रिस्त आहे असे अपुल्लोने शास्त्रावरून दाखवले."
अंत्युखिया येथे काही दिवस राहून पौल निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत आणि फुगिया ह्यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.
तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता आणि शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहुदी इफिस येथे आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे. तरी त्याला केवळ योहानचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले आणि त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. नंतर त्याने अखया •प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो येथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वासमक्ष यहुद्यांचे खंडण करीत असे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४७:२-३,८-९,१०
प्रतिसाद : परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे.
१ )अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा,
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा.
कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे,
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.
२) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे,
तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे,
देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे..
३) राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत,
आब्राहामच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे.
पृथ्वीवरील सर्व राजे देवाचे आहेत, तो परमथोर आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे,
मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि
माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १६:२३-२८
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पिता तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि विश्वास धरला आहे.' "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही, पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यामुळे तुमचा आनंद परिपूर्ण होईल. ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजच्या शुभवर्तमानात, येशू त्याच्या शिष्यांना आश्वासन देत आहे की, जेव्हा तो त्यांना सोडून त्याच्या पित्याकडे जाईल तेव्हा शिष्य पित्याकडे त्याच्या नावाचा धावा करून काहीही मागू शकतात आणि पिता त्यांची विनंती मान्य करून त्यांना जे काही हवे आहे ते त्यांना देईल. खिस्ताला सर्वकाही शक्य आहे. जोपर्यंत आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टींसाठी आपण येशूच्या मदतीची याचना करतो, तोपर्यंत ते आपल्याला तो नक्कीच मिळवून देत असतो. जेव्हा आपण येशूद्वारे पित्याकडे विश्वासाने प्रार्थना करतो, तेव्हा सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात. तर आपण आपल्या परमेश्वराकडे विश्वास ठेवू या, कारण आपल्यासाठी काय चांगले आहे हे त्याला ठाऊक आहे आणि त्यातच आपला आनंद परिपूर्ण होणार आहे. मी अजूनपर्यंत ख्रिस्ताच्या नावाने पित्याकडे काय मांगितले आहे आणि मला ते सर्वकाही मिळेल याची खात्री आहे का? मी मागितलेले जर मला मिळाले नाही तर माझी प्रतिक्रिया काय असते? मी प्रार्थना करणे सोडून देते / देतो का ?
प्रार्थना : हे परिपूर्ण आनंदाच्या उगमा, प्रभू परमेश्वरा, पवित्र आत्म्याठायी आम्हास तुझ्या आनंदात सहभागी कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या