पुनरुत्थान ७वा रविवार
२९ मे २०२२
प्रभूचे स्वर्गारोहण
तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला.
“त्यांच्या डोळ्यांदेखत येशू वर घेतला गेला."
पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्याने आपणा सर्वांना नवजीवनाची आशा प्राप्त झाली आहे. आपल्या सर्वांना स्वर्गीय सामर्थ्य प्राप्त होणार आहे. सार्वकालिकजीवनासाठी आपण सदैव तत्पर असावे म्हणून प्रभू येशू पवित्र आत्मा आपणासाठी पाठवित आहे. पवित्र आत्म्याठायी आपण पवित्र जीवन जगण्यासाठी प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १:१-११
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“त्यांच्या डोळ्यांदेखत येशू वर घेतला गेला."
हे थियफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला, त्या दिवसांपर्यंत त्याने जे जे करायला आणि शिकवायला आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत येशू त्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा. कारण योहानने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.
ह्यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, "प्रभो, ह्याच काळात तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय ?" तो त्यांना म्हणाला, "जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हांकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल." असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहात होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, "अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे राहिला? हा जो येशू तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४७: २-३,६-९
प्रतिसाद : जयघोष होत असता देव वर गेला आहे.
१) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा,
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा!
कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे.
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.
२) जयघोष होत असता देव वर गेला आहे.
कण्यांचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.
देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा;
आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा.
३) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे,
तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
दुसरे वाचन इफिस १:१७-२३
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“परमेश्वराने येशूला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले."
आपला प्रभू येशू ख्रिस्त हाच देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंत:चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे असे म्हणून त्यांला मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. हिच्याचद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा;
युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
आलेलुया !
शुभवर्तमान लूक २४:४६-५३
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २४:४६-५३
"येशू त्यांना आशीर्वाद देत असताना वर स्वर्गात घेतला गेला. "
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि येरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप आणि पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहा. पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हांकडे पाठवतो ; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा."
नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की, तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने येरुशलेमला परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन :प्रभू येशूचे स्वर्गारोहण आपल्याला पुष्कळशा बाबतीत एका विशिष्ट मर्यादिच्या पलीकडे पाहण्याची प्रेरणा देते. त्यापैकी तीन गोष्टींवर आजच्या उपासनेतील वाचने प्रकाश टाकताना आढळतात :
१. प्रभूचे स्वर्गारोहण आपल्याला धार्मिक कर्मकांडापलीकडे पाहायला शिकविते: आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, प्रेषित आपल्या धार्मिक जीवनाकडे एका विशिष्ट दृष्टीने पाहात होते. त्यांना वाटत होते की, येशूने पुनरुत्थित होऊन आपल्या सर्व राजकीय व धार्मिक शत्रूंवर विजय मिळविलेला आहे. आता तो लवकरच इस्राएलमध्ये आपले राज्य स्थापन करणार आहे. तो ते कधी स्थापन करणार, त्यात कोणाला कोणते स्थान असणार अशा मर्यादित दृष्टीने ते त्याच्याकडे पाहात होते. येशू त्यांच्या दृष्टीच्या कक्षा विस्तारतो. त्यांनी येरूशलेम व संपूर्ण जगभर देवराज्याचा प्रसार करावा, स्वतः पलीकडे जाऊन इतरांचा विचार करावा असे येशू सुचवितो.
२. प्रभूचे स्वर्गारोहण देवाविषयीची आपली संकल्पना व्यापक व समृद्ध करते आजच्या दुसऱ्या वाचनाचे एकूण दोन भाग आहेत. पहिल्या भागात संत पौल पवित्र आत्म्याठायी नवजीवन या विषयावर मार्गदर्शन करतो तर दुसऱ्या भागात तो येशूच्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थानाचा अर्थ समजून सांगतो. ह्या दोन्ही भागातील मुख्य पात्र आहे देवपिता. तो येशूला मरणातून उठवितो. त्याला अधिकार देतो, तो पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये पाठवितो. पहिल्या | वाचनातही येशू पित्याने देऊ केलेल्या देणगीव उल्लेख करतो. ही परमेश्वराची (त्रैक्यस्वरूप देवाची) संकल्पना आपण आत्मसात करायला हवी.
३. प्रभूचे स्वर्गारोहण आपल्याला आपल्यासुरक्षा कवचाबाहेर जाण्यास प्रवृत्त करते : आजच्या शुभवर्तमानात प्रेषित तीन वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे दिसून येते. प्रथम ते येरूशलेमेत असतात, येशू त्यांना बेथानीपर्यंत घेऊन जातो आणि तिथे त्याचे स्वर्गारोहण होते. त्यानंतर ते पुन्हा येरुशलेमच्या मंदिरात जातात व तिथे देवाचा महिमा वर्णीत राहतात. बेथानी हे त्यांचे सुरक्षा कवच होते. इथे येशूचे चांगले स्वागत झालेले होते. परंतु येरुशलेमेत व विशेषतः मंदिरात येशूला पुष्कळ विरोध झालेला होता. शिष्य आपले सुरक्षा कवच भेदून धोक्याच्या जागी मोठ्या धैर्याने देवाचा महिमा गातात.
आत्मपरीक्षण: प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाकडून प्रेरणा घेऊन मी माझ्या जीवनात कोणकोणत्या बाबतीत माझ्या विचारांचे क्षितिज रुंदावणार आहे? धर्म, देव, स्वतःचे जीवन याबाबतीत माझ्या संकल्पना मी कशा रीतीने व्यापक करणार आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, स्वर्गराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास आम्हाला कृपा व सामर्थ्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या