Marathi Bible Reading | Monday 30th May 2022 | 7th Week of the Easter |

पुनरुत्थान ७ वा  सप्ताह 

सोमवार ३० मे  २०२२

"जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा,मी जगाला जिंकले आहे."

संत जोन ऑफ आर्क
- कुमारिका, रक्तासाक्षी (१४१२-१४३१)

चिंतन : सर्वकाही स्वेच्छेने स्वीकारावे लागले तरी बिनधास त्याला मिठी मारा. शेवटी तुम्ही देवराज्याच्या पारादिस बागेत पोहोचाल. आकंची संत जोन   

 प्रभू येशूने खरोखरच जग जिंकले आहे कारण प्रभू येशू प्रत्येक  माणसांच्या हृदयावर राज्य करीत आहे. माणसाच्या हृदयावर राज्य करणारा एकमेव राजा प्रभू येशू जणू ख्रिस्त आज आपल्या सर्वांना आश्वासन देऊन  सांगतो आहे की, 'कितीही क्लेश, संकटे, दु:खे आणि यातना आपल्या  जीवनात आल्या तरी माझ्यावर विश्वास ठेव, अशा सर्व प्रसंगी मी तुम्हाबरोबर  आहे.'प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे आणि स्वर्गीय सुखाचे वारसदार  बनलेल्या आपण सर्वांनी विश्वासाने व धैर्याने प्रभूची साक्ष जगाला देण्यासाठी प्रभूकडे प्रेरणा, धैर्य व कृपा मागू या.
.✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १९:१-८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?"
अपुल्लो करिंथ येथे असता पौल वरच्या प्रांतांमधून जाऊन इफिस येथे पोहचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, "तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?" त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही." तो त्यांना म्हणाला, "मग तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला ?" ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा" पौलने म्हटले, "योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे, तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा." हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पौलने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे बारा पुरुष होते. नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत आणि प्रमाण पटवीत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ६८:२-७
प्रतिसाद : अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा.

१) देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो.
त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत.
जसा धूर फाकतो तशी त्यांची फाकाफाक कर; 
जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते 
तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत.

२. )परंतु धार्मिक हर्षोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, 
हर्षामुळे आनंद करोत. देवाचे गीत गा, 
त्याच्या नामाचे स्तवन करा. त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.

३) पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी 
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. 
एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो, 
बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हांबरोबर आहे.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १६:२९-३३
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
   “धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. "
येशूचे शिष्य त्याला म्हणाले, "पाहा, आता आपण उघड बोलता, अन्योक्तीने काही सांगत नाही. आता आम्हांला कळले आहे की, आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही; ह्यावरून आपण देवापासून आला आहा असा आम्ही विश्वास धरतो." येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय? पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल आणि मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :आपल्याला या जगात त्रास का सहन करावा लागत आहे? आपण काय चूक केली आहे ? मला खात्री आहे की, बहुतेक वेळा हे प्रश्न आपल्याला सतावत असतील. परंतु आजच्या शुभवर्तमानात, येशू आपल्याला उत्तर देतो की, “जगात तुम्हास क्लेश सोसावे होतील.” कारण त्यानेसुद्धा दुःख सहन केले आहे. आज, आपले जीवन कठीण झालेले आहे, कुटुंबे उध्वस्त होत आहेत, वैवाहिक जीवन आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त आव्हानात्मक बनत चालले आहे. बऱ्याच जोडप्यांचा घटस्फोट होताना पाहून आणि आजही मुले आपल्या पालकांना वाळीत टाकताना पाहून मन खूपच हेलावत आहे. आणि मग अर्थातच, आपल्या मनात प्रश्न उदभवतो की, ह्या सर्वांमध्ये येशूख्रिस्त कुठे आहे ? परंतु आज येशू आजच्या शुभर्तमानात आपल्याला प्रोत्साहन देऊन सांगत आहे की, “धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आपल्या जीवनातल्या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला खिस्तामध्ये आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. त्याच्या निरंतर विश्वास ठेवणे आवश्यक आहे आणि मग त्याच्याठायी आम्हाला परिस्थितीचा सामना करण्यासाठी नक्कीच शांती मिळेल. ख्रिस्तासारखे दुःख व क्लेश सहन करण्यास भी कितपत तयार आहे? आजच्या केविलवाणी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मी काय प्रयत्न करत आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच एकमेव जगाचा राजा आहेस, तुझी साक्ष इतरांना
देण्यास आम्हाला धैर्याचा आत्मा बहाल कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या