पुनरुत्थान ६ वा सप्ताह
गुरुवार २६ मे २०२२
“तुम्हाला दु:ख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल."
संत फिलिप नेरी
वर्तनसाक्षी (१५१३-१५९५)
प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट होते तसेच दुःखानंतर आनंदाचा क्षण येत असतो. आपल्या वाट्याला आलेल्या दु:खाकडे सकारात्मक दृष्टिकोणातून पाहण्याची गरज आहे. दु:खामुळे परिवर्तनाची दिशा सापडते व दुःखामुळेच पुनरुत्थानाचा आनंद प्राप्त होत असतो. आपल्या सर्व प्रकारच्या दु:खात, संकटात, वेदनेत प्रभू येशू आपल्याला सकारात्मकतेने पाहण्यासाठी व आनंदाचा अनुभव घेण्यास बोलावित आहे.
ख्रिस्त प्रभूच्या कृपेने प्रभावित झालेल्या पौलाने करिंथ येथे प्रभूची सुवार्ता घोषविली. प्रसंगी पौलाने विरोध सहन केला; परंतु सभास्थानाचा अधिकारी व त्याचे घराणे ह्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला. प्रभू येशूसाठी विरोध, दुःख, संकट व छळ सहन करणाऱ्यांना प्रभूठायी शांती, कृपा आणि आनंद मिळतो.
.✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १८:१-८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पौल त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून व्यवसाय चालवला. तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करीत असे."
पौल अथेन्स सोडून करिंथ येथे गेला. तेव्हा पंत येथील अक्किला नावाचा कोणीएक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौदियसने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता. त्यांच्याकडे पौल गेला. त्यांचा आणि ह्यांचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला. त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहुद्यांची आणि हेल्लेण्यांची खात्री करून देत असे.
सीला आणि तीमथी हे मासेदोनियाहून आले तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहुद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता. परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, "तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर! मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार." मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यांसह प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९८:१-४
प्रतिसाद : परमेश्वराने आपले तारण राष्ट्रांना प्रकट केले आहे.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याच्या उजव्या हाताने त्याच्या पवित्र बाहूने
तारण साधले आहे.
२) परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण विदित केले आहे.
राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया
आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.
३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी
आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण पाहिले आहे.
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा.
उच्च स्वरात आनंदाने गा; त्यांची स्तोत्रे गा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
ख्रिस्त मेलेल्यातून खरोखरच उठला आहे.
हे आपणांला माहित आहे.
हे विजयशाली राजा, आम्हांवर दया कर.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १६:१६-२०
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल." ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांस म्हणाले, “हा आम्हांस, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, शिवाय मी पित्याकडे जातो, असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय ?" ते म्हणत होते, “थोड्या वेळाने, असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो हे आम्हांला समजत नाही." आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारीत आहा काय? मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : तुम्हांला तुमच्या प्रिय व्यक्तीला गमावण्याची भीती आहे का? आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीपासून वेगळे होणे ही सर्वात कठीण भावना आहे. ती आपण कोणत्याही क्षणी अनुभवू शकतो, उदाहरणार्थ : जेव्हा एखाद्याच्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला असे दिसते की, आपल्या शरीराचा एखादा भागव मरण पावला आहे व आपण त्याच्याविना अधुरे आहोत आणि हीच खूप वेदनादायक गोष्ट आहे. आजच्या शुभवर्तमानात, येशू त्याच्या शिष्यांना निरोप देत आहे, कारण त्याला माहित होते की, लवकरच त्याला अटक करून त्याचा छळ करून त्याला ठार मारण्यात येईल. तथापि, तो शिष्यांना धीर देऊन म्हणतो, “पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.” येशू मरणानंतर तीन दिवसानंतरच्या त्याच्या पुनरुत्थानविषयी बोलता होता. आपणही ख्रिस्तापासून विभक्त झालेल नाहीत. खरे तर आपण त्याच्याशी नेहमीच जोडलेलो आहोत, आणि जेव्हा आपण येशूच्य शिकवणुकीचे अनुसरण करतो व निःस्वार्थीप्रेमाद्वारे इतरांची सेवा करतो, तेव्हा नक्कीच आपले दुःख आनंदात बदलते. मी येशूपासून विभक्त होण्याचा कदी अनुभव घेतला आहे का? त्याचा माझ्या जीवनावर काय परिणाम झाला आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, पुनरुत्थानाचा आनंद शोधण्यास व अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या