पुनरुत्थान ६ वा सप्ताह
बुधवार २५ मे २०२२
सत्याचा आत्मा येईल तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.
संत बीड
वर्तनसाक्षी, धर्मपंडित (६७३-७३५)
चिंतन: "जो आपल्या शेजाऱ्यावर शुद्ध अंतःकरणाने प्रेम करतो तोच उत्पन्न कर्त्या देवावर प्रेम करू शकतो." संत बीड
प्रभू येशू आपल्या शिष्यांना धीर देत असतानाच सत्याचा आत्मा त्यांना मार्गदर्शन करील असे स्पष्ट करीत आहे. शिष्यांना प्रभूची सुवार्ता पसरविण्यास आणि साक्ष देण्यास धैर्य व शक्ती मिळावी म्हणूनच प्रभू येशूने सत्याचा आत्मा बहाल केला आहे. सार्वकालिकता, सर्वज्ञता, सामर्थ्य, सर्वव्यापकता, पवित्रता व सत्यता हे सर्व पवित्र आत्म्याचे दैवी पवित्र गुण आहेत. हाच सत्याचा पवित्र आत्मा आपल्या सर्वांना सुध्दा देण्यात आला आहे. आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालावे म्हणून प्रभू आज आपल्याला आवाहन करीत आहे. पवित्र आत्मा आपल्याला सत्याची जाणीव करून देतो, प्रभूच्या वचनाचे स्पष्ट ज्ञान करून देतो व आपल्या अंत:करणातील अंधकार दूर करून जीवनाचा प्रकाश उजळतो.
.✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १७:१५,२२-१८:१
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता त्या देवाला मी
तुम्हांला जाहीर करतो." पौलला पोहोचविणाऱ्यांनी त्याला अथेन्सपर्यंत नेले आणि सीला आणि तीमथी ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले.
पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला : "अहो अथेन्सकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, अज्ञात देवाला, ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग आणि त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत; त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो आणि आहो. तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे,
"आपण वास्तविक त्याचा वंश आहो."
तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने आणि कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे, त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवले आहे."
तेव्हा मृताच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू." इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला, त्यात दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री आणि त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. त्यानंतर तो अथेन्स सोडून करिंथ येथे गेला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४८:१-२,११-१४
प्रतिसाद : तुझ्या ऐवयनि आकाश आणि पृथ्वी भरली आहे.
१) परमे बराचे स्तवन करा!
आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा,
उद्धवलोकी त्याचे स्तवन करा.
अहो त्याच्या सर्व दूतांनो, त्याचे स्तवन करा.
त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा.
२) पृथ्वीवरील राजे आणि सर्व प्रजा, अधिपती
आणि पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार आणि कुमारी,
वृद्ध आणि तरूण त्याचे स्तवन करा,
३) ही सगळी परमेश्वराच्या नामाचे स्तवन करोत
कारण केवळ त्याचेच नाम उच्च आहे.
त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या आणि आकाशाच्या वर आहे.
४) त्याने आपल्या लोकांचा उत्कर्ष केला आहे.
हे त्याच्या सर्व भक्तांना त्याच्याजवळ असलेल्या लोकांना
म्हणजे इसाएलच्या संततीला स्तुतिपात्र झाले आहे.
परमेसराचे स्तवन करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
सर्व वस्तूंचा मस्तक असलेला ख्रिस्त मेलेल्यातून उठला त्याने सर्व मानवजातीवर दया केली आहे.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान १६:१२-१५
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सत्याचा आत्मा तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मला अद्यापि तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; तो आपल्या स्वतः चे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल, तेच सांगेल आणिहोणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवीन,
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : भू येशूला त्याच्या शिष्यांना जे काही शिकवायचे होते ते थोड्या काळामध्ये त्यांनापूर्णपणे समजणे अशक्य होते. त्याला माहित होते की, जे काही त्याने त्यांना सांगितले होते ते अवगत करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. आणि आजच्या शुभवर्तमानात तो म्हणतो, "मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत. परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.” येशू काय म्हणतोय हे समजून घेण्यासाठी आपल्यालाही थोडा वेळ काढण्याची गरज आहे. कारण हा फक्त ईशज्ञानाचाच भाग नाही तर ख्रिस्ताच्या प्रेमाचा व दुःखसहनाचा अर्थ, आणि तसेच परमेश्वराची आमच्या, इतरांच्या व देऊळमातेच्या जीवनातील उपस्थिती समजून घेण्याचासुद्धा भाग आहे. परंतु काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण येशूने वचन दिल्याप्रमाणे जसजसे आपण सत्याचा आत्म्याला आपले अंतःकरण उघडे करतो, तसतसा पवित्र आत्मा हळूहळू देवाचा संदेश आम्हाला प्रकट करीत असतो आणि त्याचाच आम्हाला आमच्या जीवनात योग्यवेळी योग्य तो निर्णय घेण्यास फायदा होतो. येशूविषयी आजपर्यंत ऐकलेल्या सर्व गोष्टी अवगत करण्याची क्षमता माझ्याकडे आहे का ? ख्रिस्ताच्या प्रेमाचा व दुःखसहनाचा अर्थ मला पूर्णपणे समजला आहे का? त्यासाठी पवित्र आत्म्याची मला गरज आहे असे मला वाटते का ?
प्रार्थना : हे पवित्र आत्मा ये, आमचे जीवन प्रकाशीत कर व आम्हाला तुझ्या सत्याची साक्ष देण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या