सामान्यकाळातील २१ वा सप्ताह
मंगळवार २३ ऑगस्ट २०२२
पेरू देशाची राजधानी लिमा येथे एका गरीब घराण्यात इजाबेला डी फ्लोरेझ हिचा जन्म झाला. वयाच्या ११ व्या वर्षी जेव्हा तिला आर्चबिशप (संत) तुरिबियुस (सण २३ मार्च) ह्यांनी दृढीकरण संस्कार दिला तेव्हा तिने रोझ मारी असे नाव धारण केले. सिएनाच्या संत कॅथरीनप्रमाणे (सण २९ एप्रिल) ती प्रार्थनामय आणि साधे वैराग्यवृत्तीचे जीवन जगू लागली. उपासतापास आणि आत्मक्लेश ह्याद्वारे ती आपल्या कुटुंबातच व्रतस्थाचे जीवन जगत असे. घरची गरिबी असल्यामुळे भरतकाम आणि इतर हलकी फुलकी कामे करून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चार पैसे कमावीत असे.
आपल्या घरापाठीमागे असलेल्या बागेत तिने व तिच्या भावाने भाजलेल्या
विटांची एक छोटीशी झोपडी उभारली होती. तिथे ती प्रार्थना करी, रात्री काचेचेतुकडे व फुटलेल्या भांड्यांचे तुकडे यावर फक्त थोडे तास विश्रांती घेई. दिवसभर गोरगरिबांना मदत करणे आणि अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती यामध्ये ती गढलेली असे. त्या विचित्र वातावरणात तिला दररोज कम्युनियन देण्याची व्यवस्था तिच्या आध्यात्मिक सल्लागार धर्मगुरूंनी केली होती.
तब्बल २० वर्षांनी तिच्या कुटुंबातील वातावरण तिच्या दृष्टीने पोषक बनले. आता ती तिच्या मनाप्रमाणे उघडपणे व्रतस्थाचे जीवन जगू शकत होती. कुटुंबातील थट्टामस्करी व विरोध आता मावळला होता. तिने लगेच डॉमनिकन संघात प्रवेश घेतला.
इथे तिने आपल्या आत्मक्लेशाचे प्रमाण वाढविले. क्वचितच कधीतरी जेवण घेणे, कमरेभोवती काटेरी साखळदंड करकचून आवळून बांधणे आणि डोक्याला काटेरी मुकूट घालणे अशा विविध मार्गांनी तिने आपल्या लहानसहान पापांबद्दल पश्चात्ताप करायला व प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात केली. शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी तिने बऱ्याच यातना सहन केल्या.
तिच्या मते 'प्रत्येक दुःखसहनामध्ये स्वर्गीय आनंद दडलेला असतो.मात्र त्या दुःखाकडे मानवी नजरेतून न पाहता देवाच्या दृष्टीने पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते.'
२४ ऑगस्ट १६१७ रोजी झालेल्या तिच्या मृत्यूनंतर असंख्य चमत्कार घडून येऊ लागले. त्यावेळी तिचे वय अवघे ३१ वर्षे इतके होते. पोप क्लेमेंट दहावे ह्यानी १६७१ साली तिला संतमालिकेत समाविष्ट केले. अमेरिकेतून झालेली ती पहिलीच संत होय. तिला लॅटीन अमेरिका व फिलिपाईन्स या देशांची आश्रयदाती संत मानले जाते.
✝️
पहिले वाचन : २थेस्सलनि २:१-३, १४-१७
वाचन :पौलचे थेस्सलनिकाकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“जे संप्रदाय तुम्हांस शिकवले ते बळकट धरून राहा.' "
बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन आणि त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हांला अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका आणि घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने, किंवा जणू काय आम्हांकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका.
परमेश्वराने तुम्हांला आमच्या सुवार्तेच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूंनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हांला शिकवले ते बळकट धरून राहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन आणि चांगली आशा कृपेद्वारे दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि उक्तीत तुम्हांला स्थिर करो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ९६: १०-१३
प्रतिसाद : प्रभू परमेश्वर जगाचा न्याय करण्यासाठी
आला आहे.
१) राष्ट्रांमधील लोकांनो जाहीर करा की,
“परमेश्वर राज्य करतो."
जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळणार नाही.
तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
२) आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो,
समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत,
शेते व मळे आणि त्यातील सर्वकाही उत्सव करोत,
३) मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर
आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे,
पृथ्वीचा न्याय करण्यासाठी तो आला आहे.
तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुझे नियम मला समजावून दे, म्हणजे
मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय २३:२३-३६
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही ह्या गोष्टी करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. "
येशू म्हणाला, “अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार ! कारण पुदिना, बडीशेप आणि जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया आणि विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत, ह्या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता आणि उंट गिळून टाकता ! अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम आणि असंयम ह्यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परुशा, पहिल्याने वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : ढोंगी लोकांची दुर्दशा ही ठरलेली आहे. खोटारडेपणाची शिक्षा ही दुर्दशा होणार आहे. वस्तूंचा दशांश दिला जातो. परंतु न्याय, दया व विश्वास दुर्लक्षिला जातो. बाह्य मूल्ये तपासली जातात आणि आंतरिक मूल्ये दुर्लक्षिली जातात.बाहेरील स्वच्छता आवश्यक असली तरी आंतरिक शुद्धता अत्यावश्यक व महत्वाची आहे. ह्यातच त्यावेळचे धर्मपुढारी कमी पडत होते. म्हणून येशू त्यांच्या दुर्दशेबद्दल बोलत आहे. मी ढोंगी किंवा खोटारडेपणाचे जीवन जगतो का ? दुर्दशा होईल असे जीवन तर मी जगत नाही ना ?
प्रार्थना : हे दयावंत परमेश्वरा, आमच्या अंत:करणात दयाभाव वाढीस लाव, गरजवंतावर दया व प्रेम करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या