Marathi Bible Reading | Wednesday 24th August 2022 | 21st Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २१ वा सप्ताह  

बुधवार   २४ ऑगस्ट २०२२

“पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही. '  


संत बार्थोलोम्यू, 

प्रेषित, रक्तसाक्षी (पहिले शतक)

बार्थोलोम्यू म्हणजे 'थोलोमीचा पुत्र'. संत योहानच्या शुभवर्तमानातील पहिल्याच अध्यायात ज्या नथनेलला फिलिप्पने येशूकडे आणले त्यालाच बार्थोलोम्यू असे मानले जाते. येशूने त्याच्याकडे पाहताच हा खराखुरा इस्रायली आहे. ह्याच्याठायी कपट नाही' असे म्हटले होते. मात्र ह्या प्रेषिताविषयी पुरेशी माहिती इतिहासात उपलब्ध नाही.
तो गालिलातील काना गावचा असावा. त्याने अरेबियामध्ये येशूची सुवार्ता सांगितली. त्याला आर्मेनिया येथे जिवंत जाळून ठार केले गेले.
ऑरिजेन ह्या धर्मपंडिताचा गुरू पॅन्टेनिअस हा दुसऱ्या शतकात भारतात येऊन गेला. त्यावेळी त्याला कळले की, बार्थोलोम्यू त्याच्याही आधी भारतात आलेला होता. त्याने संत मत्तयचे हिब्रू भाषेतील शुभवर्तमान भारतात आणले होते.
गेली एक हजार वर्षे त्याचे अवशेष रोम शहरातील तिबेर बेटावरील एका चर्चमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. संत बार्थोलोम्यू हा गवंडी, चांभार आणि मटणविक्रेते ह्यांचा आश्रयदाता संत आहे. फिट्स येणाऱ्या माणसाला आराम पडण्यासाठी त्याचा धावा केला जातो.

✝️   
पहिले वाचन : प्रकटीकरण २१:९-१४
वाचन : प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"बारा पायांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती. " 
देवदूत माझ्याबरोबर बोलला, तो म्हणाला, “ये, वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो." तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठया उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठायी देवाचे तेज होते, तिची कांती अतिमोलवान रत्नासारखी होती, ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता, त्याला बारा वेशी होत्या आणि वेशीजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती, ती इस्राएलच्या संतानाच्या बारा वंशांची होती. पूर्वेकडे तीन वेशी, उत्तरेकडे तीन वेशी, दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  १४:१०-१३, १७-१८
प्रतिसाद :  प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य जाहीर करतात.

१) हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणीमात्र तुझी स्तुती गातात, 
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. 
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात 
आणि तुझा पराक्रम कथन करतात.

२) ते तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे 
 वैभवयुक्त ऐश्वर्य  ही मानवजातीला जाहीर करतात.
तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे,
तुझा राज्याधिकार पिढ्यान्पिढ्या टिकणारा आहे.

३) परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे,
 तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. 
जे कोणी त्याचा धावा करतात, 
जे मनापासून त्याचा धावा करतात, 
त्या सर्वांच्या तो समीप आहे.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
 गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, 
आपण इस्राएलचे राजे आहात.
आलेलुया!

शुभवर्तमान योहान १:४५-५१
वाचक :   योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही !"

फिलिपला नथनेल सापडल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टयांनी लिहिले तो म्हणजे योसेफचा मुलगा येशू नाझरेथकर आम्हांला सापडला आहे.” नथनेल त्याला म्हणाला, “नाझरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” फिलिप त्याला म्हणाला, “येऊन पाहा." नथनेलला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही. ' नथनेल त्याला म्हणाला, “आपणाला माझी ओळख कोठली ?" येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले" नथनेल त्याला म्हणाला, “गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलचे राजे आहा.' " येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठया गोष्टी पाहशील.” आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. "
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : आज संत बार्थोलोम्यूचा सण आहे. हा येशूचा एक प्रेषित होता. बार्थोलोम्यू ह्याला दुसरे नाव नथेनल असे होते. हा काना गावचा एक रहिवाशी होता. नाझरेथातून बरं काही निघणार नाही असा त्याचा विचार होता. येशूच्या मतानुसार तो निष्कपट व खरा इसरायली होता. त्याने येशूवर लागलीच विश्वास दाखविला असता. मोठमोठ्या | महनीय गोष्टी पाहण्याचे आणि स्वर्गीय गौरवाचे येशू त्याला भाकीत करतो. थोमा व बार्थोलोम्यू भारतात आले होते. थोमा भारतातील केरळ येथे राहिला. बार्थोलोम्यू भारतातून अर्मेनियात गेला. तेथे त्याने मरेपर्यंत सुवार्तेचा प्रचार केला. जिवंतपणीच जाळून ठार केला गेला. येशूचा अनुभव घेतलेले मरणाला घाबरत नाहीत. सुवार्ता आणि साक्ष द्यायला ते मागे हटत नाहीत. मी येशूची सुवार्ता व त्याची साक्ष देण्यासाठी कोणकोणता त्याग करायला तयार आहे ?

प्रार्थना :   हे प्रभू येशू, तुझ्या स्वर्गराज्याचे वारसदार बनण्यास आम्हाला पात्र बनव. तुझा शब्द आत्मसात करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन..


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या