Marathi Bible Reading | Thursday 25th August 2022 | 21st Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २१ वा सप्ताह  

गुरुवार २५ ऑगस्ट २०२२

“जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. 


संत लुईस नववे

• राजा, वर्तनसाक्षी (१२१४- १२७०)

 चिंतन : “पाप करण्याऐवजी कोणतेही दुःख सहन करण्यास तयार असा.
"-संत लुईस नववे

आपण  ह्या जगतील प्रवासी असून आपले जागतिक जीवन क्षणभंगूर आहे. म्हणूनच  आपणांस लाभलेल्या सर्व वरदानांचा व कृपादानांचा उपयोग स्वतः बरोबरच  इतरांच्या भल्यासाठी व्हायला हवा. आपल्या प्रत्येक वर्तणुकीचा हिशोब घेतला  जाणार आहे व आपण परमेश्वराचे देणेकरीच राहणार आहोत. त्यासाठी आपल्या जीवनात देवाला अग्रस्थान देणे खूप गरजेचे आहे. स्वतः बरोबरच इतरांच्या आत्म्याची काळची घेता यावी ह्यासाठी जागृत राहून सिद्ध होण्या साठी आपण प्रयत्नशील राहू या.
✝️   
पहिले वाचन : करिथ  १:१-९ 
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन  
“तुम्ही ख्रिस्ताठायी प्रत्येक बाबतीत संपन्न झाला.'

करिथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या आणि पवित्रजन होण्यास बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा आणि आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पौल आणि आपला बंधू सोस्थेनेस ह्यांच्याकडूनः
देव आपला पिता आणि प्रभू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा आणि शांती असो.
ख्रिस्त येशूमध्ये तुम्हांवर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुम्हांविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो. तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हांमध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात आणि सर्व ज्ञानात संपन्न झाला, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही दोषरहित ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.
.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  १४५: २-७
प्रतिसाद :  हे देवा, मी सदासर्वकाळ तुझ्या नामाला धन्यवाद देईन.

१) मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन, 
आणि सदासर्वकाळ तुझ्या नामाचे स्तवन करीन.
 परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. 
त्याची थोरवी अगम्य आहे.

२) एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची
 प्रशंसा करत राहील, 
सर्व पिढ्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील, 
तुझ्या वैभवाला गौरवयुक्त प्रताप 
आणि तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन. 

३ )तुझ्या भयप्रद कृत्यांचा पराक्रम लोक जाहीर करतील 
मी तुझी थोरवी वर्णीन 
तुझ्या परमदयेची आठवण काढतील 
आणि तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
 हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास 
माझे अंत:करण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय २४:४२-५१
वाचक :   मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जागृत राहा आणि सिद्ध असा. "

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेला मनुष्याचा पुत्र येईल.”
"ज्या विश्वासू आणि बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खायला देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा कोण धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य ! मी तुम्हास नक्की सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु आपला धनी यायला विलंब लागेल असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल आणि झिंगलेल्यांबरोबर खाईलपिईल, तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी आणि त्याला माहीत नसलेल्या घटकेला त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकील आणि ढोंग्यांना द्यावयाचा हिस्सा त्याच्या पदरी बांधील, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. "
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : येशू जागृत राहायला आव्हान करीत आहे. जागृत राहणे म्हणजे तयारीत असणे होय. येशू जागृत राहायला का सावध करीत आहे? येशू कधी येईल हे कोणालाच ठाऊक नाही. पण येशूचे येणे हे सुनिश्चित आहे. चोराची चाहूल लागलेला घरधनी घर फोडू देणार नाही. धन्याचा विश्वास जिंकणारा दास नाराज होणार नाही. परंतु अविश्वासू दासाला अवेळी आलेल्या मालकामुळे खराखुरा वाटा मिळणार नाही. असा येशू आजच्या शुभवर्तमानाद्वारे बोध देत आहे. दैवी योजनेनुसार येशू कधी ही येईल. आपण सावध आणि जागृत असायला पाहिजे. मी येशूच्या आगमनासाठी तयार आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या वैभवशाली आगमनासाठी आम्ही सदैव जागृत राहून तयार असावे म्हणून आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या