Marathi Bible Reading | Friday 26th August 2022 | 21st Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २१ वा सप्ताह  

शुक्रवार २६ ऑगस्ट २०२२

तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. "


संत जोसेफ कालासान्झ
- वर्तनसाक्षी (१५५७-१६४८)

 चिंतन : जर देवाची सेवा करताना कोणी स्वतःच्या सुखसोयीकडे पाहात असेल तर तो देवाची सेवा करीत स्वत:चीच सेवाचाकरी करण्यात गुंग आहे असे समजावे.• संत जोसेफ कालासान्झ

आजच्या शुभवर्तमानातील दाखल्या मधल्या पाच कुमारीका शहाण्या होत्या. त्यांनी वराला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या ज्योती तेवत ठेवल्या होत्या. पवित्रतेचे तेल घालून त्या जागृत राहिल्या. मात्र पाच मुर्ख कुमारिका झोपी गेल्या. आपण आपल्या जीवनात जे जे अशुद्ध, | अपवित्र आणि देवासमोर जाण्यासाठी निषिद्ध आहे, त्याचा त्याग करण्याची गरज आहे. आपल्याला पवित्रतेचे जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आलेले असताना आपण कोणते जीवन जगतो ह्यावर आज चिंतन करु या. 
✝️   
पहिले वाचन : करिथ  १:१७-२५ 
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"आम्ही क्रुसावर खिळलेल्या ख्रिस्ताचा गौरव करतो. हा यहुद्यांना अडखळण आणि हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या आम्हांला तो देवाचे ज्ञान असा आहे."

ख्रिस्ताने मला स्नानसंस्कार करण्यासाठी नव्हे तर सुवार्ता सांगण्यासाठी पाठवले पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यासाठी पाठवले नाही.
ज्याचा नाश होत आहे त्यांना क्रुसाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणाला तो देवाचे सामर्थ्य असा आहे. कारण "मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन आणि बुद्धीमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” असा शास्त्रलेख आहे.
ज्ञानी कोठे राहिले ? शास्त्री कोठे राहिले ? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही ? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता येत नाही, तेव्हा गौरविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहुदी चिन्हे मागतात आणि हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात, आम्ही तर क्रुसावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हा यहुदयांना अडखळण आणि हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी आणि हेल्लेणी अशा दोघांनाही देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान आहे. असा ख्रिस्ताचा गौरव गाजवतो, कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे..
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  ३३:१- २,४-५,१०-११
प्रतिसाद :   परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे

१ )अहो, नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा;
सरळ माणसांना स्तुतिगान शोभते.
वीवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा.
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.

२) कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे. 
त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती 
आणि न्याय ही प्रिय आहेत परमेश्वराच्या 
वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.

३) राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो, 
लोकांचे संकल्प निष्फळ करतो, 
परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते. 
त्याच्या मनातील संकल्प पिढ्यान्पिढ्या कायम राहतात.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे 
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय २५:१-१३
वाचक :   मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला."

येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितलाः “स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे होईल, त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. त्यात पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपणांबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला आणि सर्वांना डुलक्या आल्या आणि झोप लागली. तेव्हा मध्यरात्री हाक आली की, पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खानी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही दया, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की, कदाचित आम्हांला आणि तुम्हांला पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतः करिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नाला आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला. नंतर त्या दुसऱ्यांही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभो आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हांला नक्की सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. "
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : स्वर्गाचे राज्य हे दहा कुमारी सारखे आहे. त्यांना रात्रीच्या वेळी वराला सामोरे जायचे आहे. वर म्हणजे नवरदेव होय. त्यापैकी पाच मूर्ख आणि पाच शहाण्या आहेत. मूर्ख का ? कारण दिव्यांबरोबर तेल घेतले नाही. शहाण्या का ? कारण दिव्यांबरोबर तेलही घेतले. वर आल्यावर वराबरोबर शहाण्या आत गेल्या. कारण त्यांचे दिवे तेलामुळे विझले नाहीत. मात्र मुखचे दिवे विझल्यामुळे त्या बाहेरच राहिल्या आणि मग दरवाजा बंद केला गेला. या दाखल्याद्वारे येशू जागृतीचे महत्त्व सांगत आहे. आपण प्रत्येक गोष्टीची तयारी करीत असतो. पूर्वतयारी करणारा शहाणा असतो. तयारी न करणारा मूर्ख समजला जातो. असे येशू वरील दृष्टांताद्वारे समजावत आहे. मी कोणत्या गोष्टीची पूर्वतयारी करीत आहे? माझ्या धार्मिक जीवनाच्या भांड्यात सत्कृत्यांचे तेल आहे का ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, पवित्रतेने जीवन जगण्यास व तुला सामोरे जाण्यास धैर्य,  कृपा व सामर्थ्य दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या