Marathi Bible Reading | Saturday 27th August 2022 | 21st Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २१ वा सप्ताह  

शनिवार २७ ऑगस्ट २०२२

“शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास,मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” 



संत मोनिका  

-विधवा (३३१-३८७)

 जन्माने ख्रिस्ती असलेल्या मोनिका हिचे लग्न वयाच्या २० व्या वर्षी उत्तर आफ्रिकेतील तागास्ते शहरातील पॅट्रिशिअस नामक श्रीमंत (परंतु मूर्तीपूजक) अधिकाऱ्याशी झाले. हा अधिकारी मोनिकापेक्षा वयाने खूप मोठा होता, त्यांना तीन मुले झाली.
तिचे पती परधर्मीय असल्यामुळे आणि अत्यंत तापट स्वभावाचे असल्याने मोनिकाला खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्याने मुलांना ख्रिस्ती शिक्षण देणे खूप जिकिरीचे केले. परंतु मोनिकाच्या प्रार्थनेचे सामर्थ्य इतके विलक्षण होते की तब्बल अठरा वर्षांच्या वैवाहिक जीवनातील कसोटीच्या काळानंतर अखेर पॅट्रिशिअस हा अधिकारी विश्वाचा सम्राट प्रभू येशू ख्रिस्त ह्याला शरण आला. त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. परंतु लवकरच मृत्यूने त्याला मोनिकाच्या जीवनातून हिरावून नेले. एका डोळ्यात पतीनिधनाचे दुःख, तर दुसऱ्या डोळ्यात त्याने ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारल्याचे समाधान अशा मिश्र भावनांनी मोनिकाचे जीवन व्यापले गेले.
आता मोनिकाने आपले सर्व लक्ष आपल्या मुलांवर केंद्रित करण्यास सुरुवात केली. तिचा मोठा मुलगा अगस्तीन हा कार्थेज येथे अभ्यास करीत असताना 'मानिकेइझम' नावाच्या पाखंडी विचारसरणीचा बळी बनलेला होता. या विचारसरणीनुसार जगात 'चांगली व वाईट' अशा दोन शक्ती आहेत असे मानले जाते. अगस्तीनने ह्या विचारसरणीनुसार जीवन जगायला सुरुवात केली होती. तब्बल १५ वर्षे तो एका स्त्रीच्या मोहपाशात अडकून पडलेला होता.
आपल्या मुलाचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून मोनिका अश्रू ढाळून प्रार्थना करीत असे. तिला भेटलेल्या एका विशपांना तिने विनंती केली की, 'तुम्ही तरी अगस्तीनला समजावून सांगा.' हे बिशप स्वतः मानिकेइझम ह्या पाखंडवादाच्या विचारसरणीतून बाहेर पडलेले होते. त्यांनी अगस्तीनची अवस्था पाहिल्यावर या तरुणाचा कायापालट होण्यास खूप वेळ लागेल हे जाणले आणि तात्पुरते का होईना मोनिकाचे सांत्वन करीत म्हटले, "ज्या तुझ्या मुलासाठी तू अश्रू ढाळीत आहेस तो तुझा मुलगा कधीच वाया जाणार नाही." त्या विशपांचे नाव होते संत अंब्रोज (सण: ७ डिसेंबर).
पुढे अगस्तीनला रोम शहरात भाषाशास्त्र शिकविण्याची संधी चालून आली. मोनिकाने त्याच्याबरोबर रोम शहरात जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. परंतु त्याने एकटेच जाण्याचा मनोदय तिच्याकडे व्यक्त केला आणि एका जहाजाने तो रोम शहरात पोहोचला. तेथून तो मिलान शहरात गेला व त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करू लागला. मोनिकाने तिथेही त्याचा पाठलाग केला आणि मिलानचे विशप अंब्रोज ह्यांच्याशी तिने जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. विशप अंब्रोज ह्यांच्या वक्तृत्वाने व पावित्र्याने अगस्तीन इतका भारावून गेला की त्याने तात्काळ ख्रिस्ताला आपले जीवन अर्पण केले व इ.स. ३८७ सालच्या इस्टरच्या दिवशी त्याने बाप्तिस्मा घेतला..
मोनिकाची आयुष्यभराची आशा सफळ झाली. ती म्हणाली, “माझ्या मुला, माझ्या जीवनात तुला कॅथलिक झालेला पाहणे इतकेच एक ध्येय होते. देवाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा अधिकच दिले आहे. येशूचे अनुकरण अधिक जवळून करता यावे म्हणून या जगातील सर्व ऐहिक सुखांचा त्याग करण्याचे दान देवाने तुला बहाल केलेले आहे इतके मला पुरे आहे! माझे शरीर कुठेही पुरले तरी चालेल मात्र “तू देवाच्या वेदीपाशी जाशील तेव्हा माझी आठवण ठेव !"
कार्थेज येथे परतण्याच्या हेतूने मायलेक दोघे रोमहून निघाले. वाटेत ऑस्ट्रिया बंदरावर थांबलेले असतानाच मोनिकाने आपल्या मुलाच्या, अगस्तीनच्या बाहुपाशात सुखाने प्राण सोडला. त्यावेळी तिचे वय ५६ वर्षे इतके होते.
चांगल्याने वाईटावर मात कशी करायची ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत मोनिका हिचे जीवन ! तिच्याच स्मरणार्थ पॅरीस येथे 'ख्रिश्चन मदर्स असोशिएशन'ची स्थापना करण्यात आलेली आहे. हाताबाहेर गेलेल्या पती व मुलांसाठी या स्त्रिया विशेष प्रार्थना करीत असतात.
चिंतन : तिचे माझ्यावर किती प्रेम होते ते शब्दबद्ध करणे कठीण आहे. तिच्या केवळ शब्दांनीच नव्हे तर करुणायुक्त नजरेने ती आमची हृदये प्रभूकडे लावण्यास आम्हाला प्रेरणा देई... हे माझ्या देवा, 'मी जर तुझे बाळ असेन तर ते केवळ तू मला दिलेल्या प्रेमळ आईमुळेच होय.' - संत अगस्तीन
चांगल्याने वाईटावर विजय कसा मिळविता येतो ह्याचे उत्तम ! उदाहरण म्हणजे संत मोनिका हिचे जीवन. आपल्या हाताबाहेर गेलेली मुले किंवा व्यासनाधिन अथवा गैरमार्गाला लागलेल्या व्यक्तीसाठी संत मोनिकाचा आदर्श समोर ठेवून आपण प्रार्थना करू या.  
✝️   
पहिले वाचन : करिथ  १:२६-३१ 
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“देवाने मानवी दृष्टिकोनातून जे दुर्बळ ते निवडले. "
बंधुजनहो, तुम्हांला झालेले पाचारण घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन, असे पुष्कळजण नाहीत; तरी ज्ञान्यांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत् अशांना देवाने निवडले. जे आहेत ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूकडे आहा, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे, “जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा" हा शास्त्रलेख आहे. 
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  :१२-१३,१८-१९, २०-२१
प्रतिसाद : ज्या लोकांना परमेश्वराने प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!

१) ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, 
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता.
 प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य ! 
परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो.

२) पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात आणि 
त्याच्या दयेची अपेक्षा करतात, 
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि 
दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून
 त्यांच्यावर त्याची नजर असते.

३) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे, 
आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे, 
त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे. 
त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे 
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय २५:१४-३०
वाचक :   मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो."

येशूने आपल्या शिष्यांना पुढील दाखला सांगितलाः “परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, एकाला त्याने पाच हजार रूपये, एकाला दोन हजार रूपये आणि एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला आणि आणखी पाच हजार मिळवले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्याने आणखी दोन हजार मिळवले. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली आणि तिच्यामध्ये आपल्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्यावर पाच हजार रुपये सोपवून दिले होते. पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.” त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, “महाराज, आपण माझ्यावर दोन हजार रुपये सोपवून दिले होते. पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत.” त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास,
मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” नंतर ज्याला एक हजार मिळाले होते  तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही  कठोर माणूस आहा, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करताआणि जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता, म्हणून मी भ्यालो आणि तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.” तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट आणि आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय ? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार रुपये त्याच्यापासून काढून घ्या आणि ज्याच्याजवळ आहेत त्याला दया. त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्यांच्याजवळ जे असेल तेदेखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. ह्या निरुपयोगी दासाला अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : 
देवाने मानवाला आशीर्वादित केलेले आहे. प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार योग्य बनविलेले आहे. निरनिराळ्या कला-कौशल्यांनी संपन्न केलेले आहे. आणि त्यासाठी विश्वासाची शिदोरी दिलेली आहे. देवाने दिलेल्या योग्यतेचा मी उपयोग करतो का ? माझे कला-कौशल्य मी वापरतो का ? माझे कलागुण गाडून तर टाकत नाही ना ? हे स्पष्ट करण्यासाठी येशू दाखला देत आहे. परदेशी जाणारा मनुष्य तीन दासांना बोलावतो. त्यांच्या योग्यतेनुसार त्यांच्यावर मालमत्ता सोपवतो आणि परत आल्यानंतर त्यांचा हिशेब घेतो. विश्वासास पात्र ठरलेल्या दोघांना पुष्कळांवर नेमतो. आळशी, निरूपयोगी दासाला अंधारात टाकतो. ह्या तीन दासांपैकी मी कोणता दास आहे ? देवाने दिलेल्या देणग्यांचा देव हिशोब घेणार आहे. प्रत्येकाचा न्याय-निवाडा होणार आहे. माझ्या योग्यतेनुसार देवाचे कार्य मी करतो का ? माझ्या कला-गुणांद्वारे देवाचा गौरव होतो का ?
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुला अनुसरण्यास धैर्य व प्रेरणा दे,  आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या