सामान्यकाळातील २२ वा रविवार
२८ ऑगस्ट २०२२
"तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे आणि आंधळे ह्यांना आमंत्रण करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल,
बेनसीराच्या बोधवचनातून आज आपल्याला बोध मिळतो की, आपण विनयशील व नम्र असावे कारण, परमेश्वर आपली रहस्ये विनयशील जनांस प्रकट करतो'.
गर्विष्ठपणामुळे माणसाची कशी नाचक्की होते व नम्रता धारण केल्यामुळे माणूस कसा उच्चस्थानी बसतो, ह्याचे उत्कृष्ठ स्पष्टीकरण प्रभू येशूने आजच्या शुभवर्तमानात लग्नाच्या मेजवानीचा दाखला देऊन केले आहे. अहंकारी माणसांना आपल्या श्रीमंतीचा, बुद्धिमत्तेचा, सौदर्यचा व पदाधिकारचा खूप मोठा अभिमान वाटत असतो. अशी माणसे इतरांना तुच्छतेची व कमीपणाची वागणूक देत असतात.
मात्र काही माणसे सर्वगुणसंपत्र असून सुद्धा अतिशय नम्र असतात. अशी विनयशील व नम्र माणसे सर्वांबरोबर समानतेने व प्रेमाने वागतात. ती सर्वांनाच आवडतात कारण त्यांच्याठायी सर्वांप्रती प्रेमाची, सहिष्णूतेची आणि आपुलकीची भावना असते.
✝️
पहिले वाचन :बेनसिरा ३:१७-२०.२८-२९
वाचक : बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन"तू स्वतःला नम्र कर, म्हणजे प्रभूची कृपादृष्टी तुझ्यावर राहील."
माझ्या मुला, विनम्र भावनेने तू आपले कर्तव्य कर, म्हणजे देवाला आवडणाऱ्या लोकांचा तू लाडका होशील.
तू जितका मोठा होशील तितकाच तू स्वतःला नम्र कर, म्हणजे प्रभूची कृपादृष्टी तुझ्यावर राहील.
कारण प्रभूचे सामर्थ्य प्रचंड आहे, नम्र लोक त्याची थोरवी गातात. गर्विष्ठाच्या वेदनांना औषध नाही, कारण दुष्टपणाच्या रोपट्याने त्याच्यात मूळ धरले आहे.
ज्ञानी माणसाचे मन दाखल्यावर चिंतन करते आणि विचारवंत माणूस लक्षपूर्वक ते श्रवण करतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ६८: ४-७, १०-११
प्रतिसाद : हे देवा, तू आपल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी घर देतोस.
१) नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत,
हर्षामुळे आनंद करोत, देवाला गीत गा,
त्याच्या नामाचे स्तवन करा,
त्याच्यापुढे आनंदोत्सव करा, त्याच्यापुढे
हर्षामुळे आनंद करा.
२) पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे.
एकाकी पडलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो,
बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो.
३) हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास,
तुझे वतन कोमेजले होते तेव्हा तू ते यथास्थित केलेस.
त्यात तुझी मंडळी राहिली, हे देवा,
तू आपल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी
घर दिलेस.
दुसरे वाचन इब्री १२:१८-१९,२२-२४
वाचक: इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्ही सियोन पर्वत व जिवंत देवाच्या नगरात आला आहात."
स्पर्शनीय आणि अग्नीने पेटलेला पर्वत घनांधकार, निबिड काळोख, वादळ, कर्ण्याचा नाद आणि शब्दध्वनी ह्यांच्याजवळ तुम्ही आला नाही. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की, त्याच्यायोगे आम्हाबरोबर अधिक बोलणे होऊ नये. पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय येरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज आणि मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू ह्यांच्याजवळ आला आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे.
ही भाकर जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १४:१,७-१४
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो कोणी आपणाला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."
येशू एका शब्बाथ दिवशी परुश्यातील कोणा एका अधिकाऱ्यांच्या घरी भोजनाला गेला, त्यावेळी ते त्याच्या पाळतीवर बसले होते.
आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, “तुला कोणी लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे, तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस,म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा, वर येऊन बैस, म्हणजे तुझ्याबरोबर भोजनाला बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंच केला जाईल.”मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, “जेव्हा दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलवू नका, कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील आणि तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे आणि आंधळे ह्यांना आमंत्रण करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नाही, तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजची सारी वाचने नम्रता ह्या सद्गुणाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकताना दिसतात.
अ. बौद्धिक नम्रता : आजच्या पहिल्या वाचनात आपल्या कुवतीपेक्षा अधिक ज्ञान मिळविण्याची आस धरल्याने आपल्यामध्ये गर्विष्ठपणा येऊ शकतो असा सावधानतेचा इसारा देण्यात आलेला आहे. परमेश्वर नम्र जनांनाच आपली रहस्ये प्रकट करतो. या इशाऱ्याद्वारे बौद्धिक नम्रता धारण करण्यास आमंत्रण देण्यात आलेले आहे.
ब. आध्यात्मिक नम्रता : दुसऱ्या वाचनात जुन्या करारातील लोकांना आलेला परमेश्वराचा अनुभव आणि नव्या करारातील लोकांचा अनुभव यांमध्ये तुलना करण्यात आलेली आहे. जुन्या करारातील अनुभव अदृश्य स्वरूपातील तर नव्या करारातील अनुभव अदृश्य स्वरूपातील असला तरी आध्यात्मिक नम्रतेमुळे हा दुसरा अनुभव अधिकप्रभावी बनतो. क. सामाजिक नम्रता शुभवर्तमानात मानाच्या जागांऐवजी साध्यासुध्या जागेवर बसून सामाजिक नम्रता स्वीकारणारा मनुष्य परमेश्वराकडून कसा उंचावला जातो त्याविषयीची अशी शिकवण येशू देतो.
ड. नम्रता आणि परोपकार : लूकचे शुभवर्तमान हे दीनांचे शुभवर्तमान असल्याने लूकमधील येशू गोरगरिबांचा कैवार घेताना दिसतो. नम्रपणे परोपकार करताना जे आपल्या उपकाराची परतफेड करू शकत नाहीत अशांना मदत करण्याचे आवाहन तो करतो.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात मी बौद्धिक, आध्यात्मिक आणि सामाजिक नम्रता कशाप्रकारे अंगिकारू शकतो? मी परोपकार कोणत्या हेतूने करतो ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, मला नम्र बनव माझ्या सर्व विचारातून शब्दाद्वारेव कृतीद्वारे सर्वांवर प्रेम करण्यास व नम्र बनून अनुसरण्यास कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या