सामान्यकाळातील २२ वा सप्ताह
सोमवार २९ ऑगस्ट २०२२
ख्रिस्तसभा आज संत योहान बाप्तिस्ताचा झालेला शिरच्छेद ह्याची स्मृति साजरी करीत आहे. योहानाने तारणाऱ्याचा मार्ग तयार करण्यासाठी लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्ता दिला. ‘येशूची वृद्धी व्हावी आणि माझा -हास व्हावा हे अगत्याचे आहे.' असे त्याने नम्रतापूवर्क सांगितले. योहान जितका नम्र होता तितकाच तो कणखर, सत्यनिष्ठ व गंभीर स्वभावाचा होता. देवासाठी तो कोणतीच तडजोड करणारा नव्हता. हेरोदाने आपल्या भावाच्या बायकोबरोबर ठेवलेल्या अनधिकृत्त व अनैतिक संबंधांविषयी योहानाने राजाचा परखड शब्दात निषेध केला. मात्र योहानाला आपला प्राण गमवावा लागला. अधिकार, सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर सत्य दडपण्याचा प्रयत्न करणारी माणसे आज सुद्धा सभोवताली आहेत. आपला स्वार्थ साधण्यासाठी अशी माणसे कोणत्याही थराला जाऊन पोहोचतात, मात्र सत्य हे सत्यच आहे, शेवटी सत्याचाच विजय होतो.
चिंतन : 'प्रदीर्घ काळाच्या तुरुंगवासानंतर रक्त साक्षीत्व | स्वीकारणारा योहान बाप्तिस्ता ह्याचे सामर्थ्य व सद्गुणी जीवन अलौकिक असेच होते', , कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता- .संत बीड :
✝️
पहिले वाचन : यिर्मया १:१७-१९
वाचन :यिर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस."
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे : “आपली कंबर कस, ऊठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, घाबरलास तर मी तुला त्यांच्यापुढे घाबरवीन.
पाहा, आज या सगळ्या देशांविरुध्द, यहुदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक आणि देशातील लोक यांच्याविरुध्द तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो. ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ७१ :१-६, १५.१७
प्रतिसाद : माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील.
१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे,
मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस.
तू आपल्या न्यायनीतीने माझा उध्दार कर,
माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर.
२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून
माझ्यासाठी निवासाचा खडक हो,
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस
कारण तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस.
हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.
३) कारण हे प्रभो परमेश्वरा,तूच माझे आशास्थान आहेस
माझ्या तरुणपणापासून माझे श्रध्दास्थान आहेस.
जन्मापासून तूच माझा आधार आहेस,
मातेच्या उदरातून निघाल्यापासून
तूच माझा कल्याणकर्ता आहेस.
४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि
तू सिध्द केलेल्या तारणदायी कृत्यांचे दिवसभर वर्णन करील.
हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस
आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ६ : १७-२९
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ६ : १७-२९
"माझी इच्छा अशी आहे की, स्नानसंस्कार करणाऱ्या योहानचे शीर तबकात घालून आताच्या आता मला द्यावे. "
आपला भाऊ फिलीप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते आणि योहान त्याला म्हणत असे, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे सशास्त्र नाही." ह्याकरिता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना कारण योहान नीतिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी आणि त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई. नंतर एक संधीचा दिवस आला. तेव्हा हेरोदने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार आणि गालीलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोदला आणि त्याच्याबरोबर भोजनाला बसलेल्यांना खूष केले.
तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन." तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.” तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, “मी काय मागू?”ती म्हणाली, “स्नानसंस्कार करणाऱ्या योहानचे शीर.' तेव्हा लागलेच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, "माझी इच्छा अशी आहे की, स्नानसंस्कार करणाऱ्या योहानचे शीर तबकात घालून आताच्या आता मला द्यावे. " तेव्हा राजा फारच खिन्न झाला. तथापि वाहिलेल्या शपथेमुळे आणि भोजनास बसलेल्या पाहुण्यांसमोर त्याला तिला नाही म्हणावेसे वाटेना. राजाने लागलेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायाला पाठवून योहानाचे शीर आणण्याची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. हे ऐकल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : योहान बाप्तिस्ता हा जुन्या कराराचा शेवटचा आणि नव्या करारातील पहिला संदेष्टा आहे. परमेश्वराचा मार्ग सरळ करणारा अग्रदूत आहे. तो आणि येशू दोघे मावस भाऊ आहेत. यार्देन नदीत लोकांचा पाण्याने बाप्तिस्मा करीत असे. तो पवित्र पुरूष मानला गेला आहे. मग त्याचा शिरच्छेद का व कुणी केला? हेरोदाने भावाची बायको हेरोदियाशी लग्न केले होते. ते सशास्त्र नसल्याने योहानाला मान्य नव्हते. योहानाचा वध करावा हे हेरोदियाच्या मनात होते. पण त्याच्या पवित्रतेमुळे तसे करणे शक्य नव्हते. हेरोदाने वाढदिवसानिमित्त मेजवानी दिली होती. त्यावेळी हेरोदियाच्या मुलीने नाचून त्यांना खूश केले. 'ती जे काही मागेल ते तिला दिले जाईल.' असे हेरोदाने शपथेवर सगळ्यांसमोर दिला वचन दिले. आईच्या सांगण्यावरून तिने योहानाचे शीर मागितले. अशाप्रकारे योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद झाला. अन्यायाविरुद्ध आवाजाची किंमत मोजावी लागते. तरीदेखीलअन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. धर्माच्या विरोधात असलेल्यांचा विरोध झाला पाहिजे. आणि अति-उत्साहात वचन देण्याचा मोह आवरला पाहिजे. मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवितो का ?
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, सदाचरण, सत्य आचरण करुन तुझी सुवार्ता जगाला षविण्यासाठी आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या