सामान्यकाळातील २२ वा सप्ताह
मंगळवार ३० ऑगस्ट २०२२
संत पौल म्हणत आहे की, ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो. संत पौलाने आपले सर्वस्व ख्रिस्ताचरणी समर्पित करुन तो ख्रिस्तमय व त्यागमय जीवन जगला.
प्रभू येशू ख्रिस्त त्याचे अनुयायी बनण्याची इच्छा असणाऱ्यांना स्पष्टपणे सांगत आहे की, 'माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतः चा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे'. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आत्मत्यागाचे आमंत्रण दिले आहे. ह्या जगातील आपण सर्वजण प्रवासी आहोत. जन्मापासून ते मृत्युपर्यंत आपण जे जीवन जगतो ते सर्वस्वी देवाच्या कृपेनुसारच असते. विशेषतः ख्रिस्ती माणसाचे जीवन ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी असते.
✝️
पहिले वाचन :गलती २:१९-२०
वाचन :गलतीकरांस पत्र पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस."
मी नियम शास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलों, ह्यासाठीं कीं मी देवाकरितां जगावें. मी ख्रिस्ताबरो बर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढें मी जगतों असें नाहीं, तर ख्रिस्त माझ्याठायीं जगतो; आणि आतां देहामध्यें जें माझें जीवित आहे तें देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगानें आहे; त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरितां दिलें.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १६ :१-२, ५,७-८,११
प्रतिसाद : हे देवा, माझें रक्षण कर, , कारण मी तुझा आश्रय धरिला आहे.
१) हे देवा, माझें रक्षण कर, ,
कारण मी तुझा आश्रय धरिला आहे.
मीं परमेश्वराला म्हटलें, तूंच माझा प्रभु आहेस,
तुझ्यापरतें मला सुख नाहीं.
२) परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वांटा आहे;
माझा वांटा संभाळणारा तूंच आहेस.
माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत.
माझे वतन माझ्या मनाजोगे आहे.
३) परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा
मी धन्यवाद करितों; माझें अंतर्यामहि मला रात्री शिक्षण देतें.
मी आपल्यापुढें परमेश्वराला नित्य ठेविलें आहे;
तो माझ्या उजवीकडे आहे,म्हणून मी ढळणार नाहीं.
४)जीवनाचा मार्ग तूं मला दाखविशील;
तुझ्या सान्निध्यांत पूर्णानंद आहे;
तुझ्या उजव्या हातांत सौख्ये सदोदित आहेत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १६ : २४-२७
वाचक : मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
'तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणें फळ देईल. '
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्यामागें येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावें. कारण जो कोणी आपला जीव वाचवूं पाहतो, तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरितां आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्यानें सर्व जग मिळविलें आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार ? मनु ष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशीं आपल्या दूतांसह येईल त्यावेळी 'तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणें फळ देईल. '
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : परमेश्वर जसा, दयाळू, कनवाळू, मंदक्रोध व प्रेमळ आहे तसे आपण सर्वांनी असावे असे आवाहन प्रभू ख्रिस्ताने केलेले आहे. विशेषतः प्रभू येशूच्या शिकवणूकीचा गाभा देवप्रीती व परस्परप्रीति मध्ये सामावलेला आहे. म्हणूनच जीवनात येणाऱ्या सर्व संकटांचा वधस्तंभ घेऊन आणि आत्मत्याग करुन आपण ख्रिस्तानुकरण करायचे आहे.
प्रभू येशू शेवटी सांगत आहे, 'मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दुतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल'.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आत्मत्याग करुन तुला अनुसरण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास मला आत्मिक बळ दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या