सामान्यकाळातील २२ वा सप्ताह
बुधवार ३१ ऑगस्ट २०२२
तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली.
संत रेमंड नोनाटस
- वर्तनसाक्षी (१२०४-१२४०)
रेमंड ह्या बालकाचा जन्म होण्यापूर्वीच त्याची आई मरण पावली, त्यामुळे ऑपरेशन करून मोठ्या जिकीरीने डॉक्टरांनी बाळाला कृत्रिमरित्या जन्म दिला. अगदी अद्भुतरित्या हे बालक मृत मातेच्या उदरात जिवंत राहिले. त्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेवरून त्याला नोनाटस हे आडनाव देण्यात आले. नोनाटस म्हणजे न जन्मलेला.
रेमंडचं कुटुंब खूप गरीब होतेच. परंतु ते मूळचे कॅटालोनियन ह्या ऐश्वर्यसंपन घराण्यातले होते. धार्मिकपणाचे बाळकडू त्याला पाजण्यात आलेले होते. त्यामुळे वयात येताच रेमंडने संत पीटर नोलास्को (सण ९ मे) ह्यांच्या बार्सेलोना येथील मर्सेडरियन संस्थेत प्रवेश घेतला. त्याची जिद्द आणि उत्साह पाहून त्याला लवकरच मास्टर जनरल हा किताब देण्यात आला.
मर्सेडरियन संस्था गुलामगिरीत सापडलेल्या ख्रिस्ती गुलामांना मुक्त करण्यासाठी धडपडत होती. ह्या कार्यासाठी रेमंडला आल्जिएर्स येथे पाठविण्यात आले. परंतु तेथील प्रेषितकार्य करीत असताना रेमंडच्या हातातील सर्व निधी संपला त्यामुळे आपल्या कमाईतून आलेल्या पैशाद्वारे गुलामांना मुक्त करण्याचे प्रेषितकार्य थांबवण्याची चिन्हे दिसू लागली. अशा वेळी त्याने खंडणी घेऊन आपणा स्वतःला सरकारच्या हाती सोपविले. ही खंडणी त्याच्या संस्थेतील इतर सहकाऱ्यांनी घेऊन बऱ्याच गुलामांना स्वतंत्र केले.
तुरुंगात असताना इतर अनेक कैद्यांना त्याने ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली व मोठ्या कठीण यातना सहन करूनदेखील त्याने ख्रिस्ताचे स्तुतीगान गायला सुरुवात केली. त्यामुळे हळूहळू कैदी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्याच्या विचारात दिसू लागले. हे पाहून संतप्त झालेल्या मुस्लीम अधिकाऱ्यांनी त्याचे दोन्ही ओठ अणकुचीदार तारेने शिवून टाकले.
शेवटी त्याच्याच संस्थेने त्याला तुरुंगातून मुक्त केले आणि तो १२३९ साली स्पेन देशात परतला. पोप ग्रेगरी नववे ह्यांनी त्याचे प्रेषितकार्य पाहून त्याला कार्डिनलपदाची दीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परंतु रोमला जात असतानाच ३० ऑगस्ट १२४० रोजी वयाच्या ३६ व्या वर्षी त्याला मरण आले. पोप आलेक्झांडर सातवे ह्यांनी १६५७ साली त्यांना संतपदाने सन्मानित केले.
प्रसूतीवेदना देत असलेल्या स्त्रिया, सुईणी आणि चुकीचा आरोप केलेले निरपराधी गुन्हेगार ह्यांच्या मदतीसाठी संत रेमंडचा धावा केला जातो आणि देऊळमाता आजारी लोकांसाठी संत रेमंडच्या सन्मानार्थ मेणबत्त्या व पाणी आशीर्वादित करते.
✝️
पहिले वाचन : १करिथ ३:१-९
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"आम्ही देवाचे सहकारी आहो, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा."
बंधुजनहो, जसे आध्यात्मिक वृत्तीच्या माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्या वेळेस तुम्हांला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहा. ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा आणि कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहा की नाही ? आणि मानवी रीतीने चालता की नाही ? कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलचा आहे," दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोचा आहे,” तेव्हा तुम्ही मानवच आहा की नाही ?
अपुल्लोस कोण ? आणि पौल कोण ? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसने पाणी घातले, पण देव वाढवतं गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहे. तरी प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहो, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ३३:१२-१५, २०-२१
प्रतिसाद : ज्या लोकांना देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य !
१) ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे,
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता
प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य !
परमेश्वर आकाशातून पाहतो,
सर्व मानवजातीला तो निरखतो.
२ )तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर
राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो,
त्या सर्वांची हृदये घडवणारा आणि
त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे.
३) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे.
आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे.
त्याच्या ठायी आमच्या हृदयांना आनंद आहे.
त्याच्या पवित्र नामावर आमची श्रद्धा आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुहे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ४:३८-४४
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे."
येशू सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली.
सूर्यास्ताच्या वेळी, ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. “तू देवाचा पुत्र आहेस," असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते.
दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते, परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.
मग तो यहुदियांच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : शिमोनाची सासू होती म्हणजेच तो विवाहित होता. त्याच्या आजारी सासूला येशू बरे करतो. मग ती सासू त्यांची सेवा करू लागते. देव प्रत्येकाच्या जीवनात कार्य करीत असतो. ह्याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी आणि देवाची सेवा म्हणून इतरांची सेवा करावी. आणि जर आपण दुसऱ्यांची सेवा करतो तर देव देखील महान कार्य करीत राहतो. जणू हेच हा प्रसंग दाखवून देत आहे. आजारी, पीडलेल्या लोकांना येशूकडे आणतात. येशू त्यांच्या डोक्यावर हात ठेवत बरे करतो. मी येशूची सेवा कोणत्याप्रकारे करू शकेन ? येशूने मला कोणकोणत्या पीडेतून मुक्त केलेले आहे ?
प्रार्थना : हे परमेश्वरा, आमचे रक्षण कर, तुझा मुख प्रकाश आमच्यावर पाडव प्रसन्नतेने व शांतीने जीवन जगण्यास कृपा दे, आमेन.
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजा-यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सात्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया
हिचा आदर्श डोळयासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे .
तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन .
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या