Marathi Bible Reading | Thursday 1st September 2022 | 22nd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २२ वा सप्ताह  

गुरुवार १ सप्टेंबर २०२२

 “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” 



रात्रभर कष्ट करून निराश झालेल्या पेत्राबरोबर प्रभूयेशू समुद्रात गेला आणि पेत्राला त्याने समुद्रात जाळे टाकण्यास सांगितले असता जाळ्यात भरपूर मासे लागले. त्यानंतर इतके मासे मचव्यात गोळा झाले की मचवा बुडू लागला. पेत्राला त्याची भीती वाटली मग प्रभूयेशू त्याला म्हणाला, “भिऊ नकोस येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” निराश झालेल्या पेत्राला प्रभूयेशूने प्रोत्साहित करून काम करायला लावले.  पेत्राने प्रभूयेशूच्या पाचारणाचा स्वीकार केला आणि आज्ञाधारकपणे येशूचे प्रेषित कार्य केले.
देवाचे शहाणपण व ज्ञान आपल्या बुद्धी आकलना पलिकडचे आहे, म्हणून देवाला शरण जाऊन त्याची वाणी आपण ऐकायला हवी. प्रभूयेशू आज आपल्या प्रत्येकाला बोलावित आहे. आपल्या मनातील सर्व भीती दू सारून प्रभूयेशू देवाच्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहे. आपल्या जीवनातील नैराश्य व अपयश दूर करण्यास व आपल्या जीवनाला नव्याने उभारी देण्यास प्रभू सर्वदा तयार असतो. आपण नम्रतेने त्याची वाणी ऐकून त्याला शरण जाऊया.

✝️   
पहिले वाचन : करिथ  ३:१८-२६ 
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"सर्वकाही तुमचे आहे, तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे."

कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहो असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे. कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे. "तो ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो," असा शास्त्रलेख आहे आणि "ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो,” असा दुसरा शास्त्रलेख आहे. म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाही तुमचे आहे. पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे, तुम्हीं ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  २४:१-६
प्रतिसाद :  पृथ्वी आणि तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे.

१) पृथ्वी आणि तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे, 
जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.
 कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, 
त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.

२) परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल ?
 त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ?
 ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, 
जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, 
जो आपल्या शेजाऱ्याला फसवण्यासाठी 
कपटाने शपथ वाहत नाही.

 ३) त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल.
 आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. 
त्याला शरण जाणारे हेच लोक होत. 
हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
तुहे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ५:१-११
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 "सर्व सोडून देऊन ते ख्रिस्ताचे अनुयायी झाले. ' 

लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता, त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगीतले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो." मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली, तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणाविले. मग तो आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभो, माझ्यापासून जा, कारण मी पापी `मनुष्य आहे.” कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहूनतो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते; तसेच शिमोनचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनला म्हणाला, “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : शिमोनाची सासू होती म्हणजेच तो विवाहित होता. त्याच्या आजारी सासूला येशू बरे करतो. मग ती सासू त्यांची सेवा करू लागते. देव प्रत्येकाच्या जीवनात कार्य करीत असतो. ह्याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी आणि देवाची सेवा म्हणून इतरांची सेवा करावी. आणि जर आपण दुसऱ्यांची सेवा करतो तर देव देखील महान कार्य करीत राहतो. जणू हेच हा प्रसंग दाखवून देत आहे. आजारी, पीडलेल्या लोकांना येशूकडे आणतात. येशू त्यांच्या डोक्यावर हात ठेवत बरे करतो. मी येशूची सेवा कोणत्याप्रकारे करू शकेन ? येशूने मला कोणकोणत्या पीडेतून मुक्त केलेले आहे ?

प्रार्थना : हे प्रभूयेशू, तुला अनुसरण्यास व शरण येण्यास आम्हाला प्रेरणा दे, तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला सामर्थ्य दे, आमेन.

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना 

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजा-यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सात्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर

(इथे आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया
हिचा आदर्श डोळयासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे .
तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन .
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या