Marathi Bible Reading | Friday 2nd September 2022 | 22nd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २२ वा सप्ताह  

शुक्रवार २ सप्टेंबर २०२२

 "तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल त्या दिवसांत ते उपवास करतील.”  





ख्रिस्त स्वतःला नव्या द्राक्षरसाची उपमा देऊन प्रतिप्रश्न करीत आहे की, नवी शिववण देवराज्याची आहे व नवा द्राक्षरस नवीन बुधल्यातच घालायला हवा.

नीतिमत्तेची आणि स्वर्गराज्याची शिकवणूक देत असताना प्रभू येशू सर्व वचनांचा व शिकवणुकीचा नवा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ कर्मकांड करून नियम काटेकोरपणे पाळणे म्हणजे धर्माचरण नव्हे, तर आपले जीवन परमेश्वराच्या वचनांवर अवलंबून असायला हवे. जे जे स्वर्गराज्यासाठी अनुरुप आहे ते प्रभू येशू त्याच्या नवजीवनाच्या वचनांमध्ये आपल्याला देत आहे. आपण प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवून नवी शिकवण आत्मसात करू या.

✝️   
पहिले वाचन : करिथ  ४:१-५
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"प्रभू अंतःकरणातील संकल्प उघड करील."

आम्ही ख्रिस्ताचे सेवक आणि देवाचे रहस्यांचे कारभारी आहो असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला काहीच वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करत नाही. कारण जरी माझे मन माझ्याविरूद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे ह्यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका, तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  ३७:३-६,२७-२८,३९-४०
प्रतिसाद :   धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते.

१) परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि सदाचाराने वाग,
 देशात वस्ती करून राहा, सत्याचा अवलंब कर, 
म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल. 
तो तुझे मनोरथ पूर्ण करील.

२) आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपवून दे, 
त्याच्यावर श्रद्धा ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.
 तो तुझी धार्मिकता प्रकाशासारखी, 
तुझे न्याय्यत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.

३) वाइटापासून दूर राहा, बरे ते कर, 
म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील. 
कायम परमेश्वराला न्याय प्रिय आहे, 
तो आपल्या भक्तांना सोडत नाही.

४) धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते, 
संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. 
परमेश्वर त्यांचे सहाय्य करतो. 
त्यास मुक्त करतो आणि तारतो,
 कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत, 
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ५:३३-३९
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
  "वर काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील."

परुशी आणि शास्त्री यांनी येशूला म्हटले, "योहानचे शिष्य वारंवार उपवास आणि प्रार्थना करतात, तसे परुश्यांचेही शिष्य करतात, आपले शिष्य तर खातात पितात." येशूने त्यांना म्हटले, "वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय ? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल त्या दिवसांत ते उपवास करतील.” आणखी त्याने त्यांना दाखलाही सांगितला : कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावत नाही, तसे केले तर त्याने नवे फाडले आणि नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल आणि नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षरस बुधले फाडून गळून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालावा. जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.
: प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : प्रत्येक मनुष्याची विचार करण्याची पद्धत व ते कृतीत आणण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणूनच म्हणतात ना- व्यक्ती तितक्या प्रकृती ! पण जेव्हा ते विचार आपल्या मनाला पटत नाहीत तेव्हा विचारांचा संघर्ष पेटून उठतो. आज अगदी असाच संघर्ष झाला येशू आणि शास्त्रीपरूशी यांच्यामध्ये. येशू ख्रिस्त हा नव्या विचारांचा व नव्या योजनांचा जनक होता. तर शास्त्री परूशी यांच्यावर जुनाट बुरसटलेल्या विचारांचा पगडा होता. त्यामुळे येशू म्हणाला, की नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घाला. याचाच अर्थ येशू नाविन्याचा पुरस्कर्ता आहे. नवीन विचारांचे बीज नवीन माणसांत पेरले नाही तर बुधले फुटतात. नवीन व जुन्या विचारात जमीन अस्मानाचा फरक आहे. ते सहजासहजी जुळत नाहीत. आपल्या कुटुंबात सुद्धा असेच घडते, नव्या विचारांची सून व जुन्या विचारसरणीची सासू यांचे जुळत नाही, म्हणूनच तर भांडणे, वादविवाद विकोपाला जातात. यातून एकच मार्ग आहे, जुन्या व नवीन विचारांतून सुवर्णमध्य साधून सासू सूनेने एकमेकांशी जुळवून घेतले पाहिजे.

प्रार्थना : हे प्रभूयेशू, तुला अनुसरण्यास व शरण येण्यास आम्हाला प्रेरणा दे, तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला सामर्थ्य दे, आमेन.

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना 

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजा-यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सात्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर

(इथे आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया
हिचा आदर्श डोळयासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे .
तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन .
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या