Marathi Bible Reading | Saturday 3rd September 2022 | 22nd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २२ वा सप्ताह  

३ सप्टेंबर २०२२

 "तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथचा प्रभू आहे."”  





संत ग्रेगरी महान

-परमगुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (५४०-६०४)

१२ मे ६०४ साली त्यांना मृत्यू आला. गायक, विद्यार्थी, विद्वान आणि शिक्षक ह्यांचे ते आश्रयदाते मानले जातात.

चिंतन : आत्म्याच्या तारणासाठी जिद्दीने केलेल्या परिश्रमाइतके स्वीकारणीय अर्पण इतर कोणत्याही मार्गांनी आपल्याला करता येणे शक्य नाही. -संत ग्रेगरी महान
✝️   

परमेश्वराचे प्रेम, दया आणि कृपा सर्व नियमांच्या आणि माणसाच्या आकलनशक्तीच्या पलिकडे कार्यरत असते. परमेश्वराला आपण नियमात बांधू शकत नाही. परमेश्वराचे मानवावरील प्रेम अमर्याद आहे. आपण त्या प्रेमाचे साक्षीदार बनून सर्वांप्रती प्रेमाने व दयेने वागावे म्हणून परमेश्वर आपल्याला साद घालीत आहे आपण तयार राहू या . 


पहिले वाचन : करिथ  ४:६-१५
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
 "आम्ही भुकेले, तान्हेले आणि उघडेवाघडे आहोत."

बंधुजनहो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला आणि अपुल्लोसला लागू केल्या आहेत, शास्त्र लेखापलीकडे कोणी जाऊ नये, हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा म्हणजे तुम्हांपैकी कोणीही एकासाठी दुसऱ्याला तुच्छ लेखणार नाही. तुला निराळेपण कोणी दिले ? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे ? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतो ? तू तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहा ! इतक्यातच धनवान झाला आहा! आम्हांला सोडून तुम्ही तर राजे बनला आहा ! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो. मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरच आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना आणि माणसांना जणू तमाशा असे झालो ! आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहो. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले आणि उघडेवाघडे आहोत, आम्ही ठोसे खात आहोत, आम्हाला घरदार नाही, आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो. आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो, आमची छळवणूक होत असता आम्ही ती सहन करतो, आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो, आम्ही जगाचा गाळ, सर्वांचा केरकचरा असे आजपर्यंत झालो आहो.तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  १४५:१७-२१
प्रतिसाद :   जे परमेश्वराचा धावा करतात, त्यांना तो समीप आहे.
१) परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायपरायण आहे, 
तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे.
जे कोणी त्याचा धावा करतात जे खऱ्या श्रद्धेने 
त्याचा धावा करतात, त्या सर्वाना परमेश्वर समीप आहे.

२) तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो, 
आणि त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो. 
परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो, 
पण सर्व दुर्जनांचा नाश करतो.

३) माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील, 
सर्व प्राणिमात्र त्याच्या पवित्र नामाला
 युगानुयुगे धन्यवाद देवोत.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
 हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड,
म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी
 माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ६:१-५
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
" शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता ?"

एका शब्बाथ दिवशी येशू शेतांमधून जाताना त्यांचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले. तेव्हा परुश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले ? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय ? आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथचा प्रभू आहे."
: प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  मनुष्य हा समाजप्रिय असतो. नियम, कायदे हे समाजाच्या व मानवाच्या कल्याणासाठी व समाज माणसात शिस्त निर्माण करण्यासाठी असतात पण तेच नियम मनुष्याच्या जीवनात | अडथळे बनत असतील, तर ते मोडण्यात काही पाप नाही. आजच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणत आहेत की, "मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे." एका बाजूला शिष्यांना शारीरिक भूक लागली होती व दुसऱ्या बाजूला शब्बाथाचा नियम ठाण मांडून उभा होता. पण प्रभू येशू मनुष्याला व मानवी गरजांना प्राधान्य देतो. कारण नियमांपेक्षा मानवी जीवन व त्याच्या मूलभूत गरजा महत्वाच्या आहेत. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, | दैनंदिन कामापेक्षा आपले कुटुंब, पतीपत्नी, अपत्ये खूप महत्वाची आहेत. पैसा ही मानवाची गरज असली तरी सर्वस्व नाही. आज आपण येशूकडून नियमांपेक्षा मनुष्य महत्वाचा हा मंत्र शिकूया !

प्रार्थना : हे प्रभू येशू, तू जसा दयाळू आहेस तसेच दयाळूपणाने आचरण करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना 

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजा-यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सात्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया
हिचा आदर्श डोळयासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे .
तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन .
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या