Marathi Bible Reading | 23rd Sunday In Ordinary Time | 4th September 2022 |

सामान्यकाळातील २ वा  रविवार 

४ सप्टेंबर  २०२२



तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही."


जागतिक नाते संबंधाच्या पलिकडे गेल्याशिवाय देवाबरोबर नाते जुळविता येत नाही. दुसऱ्या पातळीवर प्रभू येशू वधस्तंभ स्वीकारण्यास सांगत  आहे. वधस्तंभ म्हणजे आत्मत्याग आणि समर्पण. जीवनात येणाऱ्या सर्व  वधस्तंभांना स्वीकारणे गरजेचे आहे. वधस्तंभापासून ख्रिस्ती जीवन आपण  विभक्त करू शकत नाही. शेवटी प्रभू येशू म्हणत आहे, “जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही." सर्वस्व म्हणजे स्वतःचा अहंकार, मान-सन्मान, जगाविषयीची व जीवनाविषयीची आसक्ती. ह्याचाच अर्थ आपण सर्वस्वी ख्रिस्ताचे झाल्याशिवाय प्रभू ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनू  शकत नाही.

ख्रिस्ताचे शिष्यत्व म्हणजे खूप मोठे आव्हान आहे. ख्रिस्तानुवर्तन करून सर्वस्वी त्याला शरण गेल्यावर ख्रिस्तच आपल्या जीवनाचा ताबा घेतो. 


✝️   
पहिले वाचन :ज्ञानग्रंथ ९:१३-१८
वाचक : ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"प्रभूची इच्छा काय आहे, हे कोणाला समजेल ?"

“परमेश्वराचा हेतू काय आहे हे कोण जाणू शकतो? किंवा प्रभूची इच्छा काय आहे हे कोणाला समजेल ? मर्त्य मानवाचे विचार निरुपयोगी आहेत आणि आमच्या योजनांचे यश अनिश्चित आहे. कारण नाश पावणारे शरीर आपले ओझे आत्म्यावर टाकते आणि हा ऐहिक पिंजरा विचारवंत मनावर दडपण आणतो. या जगात काय आहे याची कल्पना करणेही आम्हाला जड जाते आणि आम्हांला काय करता येते हे जाणून घेण्यास आम्हांला श्रम करावे लागतात, परंतु स्वर्गात काय आहे याची चाहूल कोणाला लागली आहे ? तू आपले ज्ञान पुरविल्याखेरीज आणि वरून तुझा पवित्र आत्मा पाठवल्याखेरीज तुझा हेतू कोण जाणू शकतो ? आणि अशा प्रकारे जगात असलेल्यांच्या वाटा सरळ करण्यात आल्या आणि त्यांना तुला काय आवडते हे शिकवण्यात आले.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ९०: ३-६, १२-१४,१७
प्रतिसाद :  हे प्रभू, तू पिढ्यान्पिढ्या आमचे निवासस्थान आहेस.

१) तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवतोस, 
आणि म्हणतोस, अहो, मानवांनो, परत जा.
 कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षे कालच्या 
गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहेत ते
 निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत,

२) तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस, 
सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत, 
सकाळी ते तरारून वाढते, 
संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.

३ )आम्हांला आमचे दिवस असे गणण्यात शिकव की, 
आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. हे परमेश्वरा, 
आपला राग आवर.तुझा राग सर्वकाळ आहे का ?
 तू आपल्या सेवकांवर करूणा कर.

४) तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर
म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन 
आमचा सर्व दिवस आनंदात घालवू. 
आमचा देव परमेश्वर ह्याचा प्रसाद 
आमच्यावर होवो आणि आमच्या
 हातचे काम सिद्धीस जावो.


दुसरे वाचन  पौलचे फिलेमोन ९-१०,१२-१७
वाचक: पौलचे फिलेमोनला पत्र यातून घेतलेले वाचन 
 “त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर प्रिय बंधू, असे व्हावे. "

मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो. त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे. सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते, तरी तुझ्या समंतीशिवाय तसे करणे मला बरे वाटले नाही. तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.
कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने युगानुयुगे तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर, दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या आणि प्रभूच्या ठायी ह्याहून किती तरी अधिक तो प्रिय असावा. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस,
तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
 मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला तुम्ही
 समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १४:२५-३३
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. "

येशूबरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता. तेव्हा तो त्याच्याकडे वळून म्हणाला, “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही त्याग करीत नाही. त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतः चा क्रूस घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहात नाही ? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की, जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय ? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  मानवी जीवन अपूर्ण आहे. मात्र परमेश्वराची कृपा सदैव आपल्यासाठी उपलब्ध असल्यामुळे ख्रिस्ती व्यक्तीने निराश होण्याचे कारण नाही. अशा पार्श्वभूमीवर कसे वागावे याविषयी आजची वाचने मार्गदर्शन करतात. 
अ. प्रभूचा शिष्य म्हणून प्रथम आपण आपली अपूर्णता मान्य करायला हवी. पहिले वाचन मानवी बुद्धीची मर्यादा स्पष्ट करते. ह्या बुद्धीच्या पातळीवर मनुष्य ईश्वरी सत्ये संपूर्णतः ग्रहण करू शकत नाही. परंतु परमेश्वर मात्र आपली रहस्ये मानवाला प्रकट करून पूर्णतेच्या दिशेने नेतो. 
ब. इतरांच्या अपूर्णतेपेक्षा ते परमेश्वराचे पुत्र वा कन्या आहेत याकडे लक्ष देऊन त्यांचा विचार करावाः दुसऱ्या वाचनात संत पॉल फिलेमोनला विनंती करतो की, त्याने अनेसिमला दास म्हणून नव्हे तर ख्रिस्ताठायी आपला बंधू म्हणून स्वीकारावे, फिलेमोनाने अनेसिमला कसल्याशा गुन्ह्यावरून तुरुंगात डांबले होते. पॉलने त्याला बाप्तिस्मा देऊन एका पत्रानिशी त्याच्याकडे पाठवले होते. 
क. आपली अपूर्णता ठाऊक असूनही माणसाने आपले सर्वस्व पणाला लावावे : शुभवर्तमानामध्ये येशू शिष्यत्वासाठी मोजावी लागणारी किंमत याविषयी शिकवण देताना बुरुज बांधणारा व युद्धावर निघणारा अशा दोन व्यक्तींच्या प्रतिमा आपल्यासमोर उभ्या करतो. पुरेशी तयारी नसताना कोणीही असे उपक्रम हाती घेण्यास धजावणार नाही. सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय कोणतीही व्यक्ती ख्रिस्ताचा सच्चा अनुयायी होऊ शकणार नाही.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनातील अपूर्णतेकडे मी कशा दृष्टीने पाहतो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, संपूर्ण जिवाने, अंतःकरणाने व मनाने तुला अनुसरण्यास  प्रेरणा, सामर्थ्य व कृपा दे, आमेन.


पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना 

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजा-यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सात्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया
हिचा आदर्श डोळयासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे .
तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन .
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या