Marathi Bible Reading | Monday 5th September 2022 | 23rd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २३ वा सप्ताह  

सोमवार ५ सप्टेंबर २०२२

 “मी भूकेला  होतो तेव्हा तुम्ही मला खाण्यास दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी  दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले,  आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत व अपंग होतो तेव्हा तुम्ही  माझ्याकडे आला..  



संत मदर तेरेजाची स्मृती दिन 

✝️   


" ख्रिस्त सभा आज करुणामयी संत मदर तेरेजा ह्यांचा सन्मान करीत  आहे. त्या अनुषंगाने आपण आजच्या शुभवर्तमानावर चिंतन करू या. आजच्या मत्तयच्या शुभवर्तमानाप्रमाणेच मदर तेरेजाने आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित असे जीवन जगून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला, म्हणूनच  मदर तेरेजा परमेश्वराची आशीर्वादित, धन्यवादित आणि संत झाली.


पहिले वाचन : होशेय २ : १४-१५. १९-२०
वाचन :होशेयच्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असे करीन." 

यास्तव मी तिला मोह घालून वनांत आणीन, तिच्या मनाला धीर येईल असें बोलेन.  तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचें द्वार व्हावें म्हणून मी तिला अखोर' खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणें, माझें बोलणें त्या ठिकाणी ऐकेल.  मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असें करीन, धर्मानं व न्यायाने, व ममतेनें व दयेनें मी तुला आपली वाग्दत्त असें करीन. तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  ४५:११-१२,१४-१७
प्रतिसाद :  हे प्रभू लोक युगानुयुग तुझें उपकारस्मरण करितील.

१)  म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल; 
तो तुझा पति आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग.
 सोराची कन्या तुला नजराणा आणील;
धनवान लोक तुझे आर्जव करितील..

२) तिला कशिद्याचीं वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवीत नेतील,
 तिच्यामागून चालणाऱ्या कुमारींना 
तिच्या सख्या तुझ्याकडे आणितील.
 आनंदाने व उत्साहानें त्यांस मिरवितील, 
त्या राजमंदिरांत प्रवेश करितील.

३)तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझीं मुलें येतील;
तूं सर्व पृथ्वीवर त्यांस अधिपति करिशील. 
 तुझ्या नांवाचें स्मरण पिढ्यानपिढ्या
राहील असें मी करीन, म्हणजे लोक 
युगानुयुग तुझें उपकारस्मरण करितील.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
 तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की
 त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून, 
तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय २५:३१-४६
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 "ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्याअर्थी ते मला केले आहे.' 
जेव्हां मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवानें 'सर्व देवदूतांसह येईल, तेव्हां तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल;  त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील, आणि जसें मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसें तो त्यांस एकमेकांपासून वेगळें करील,  आणि मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील.  तेव्हां राजा आपल्या उजवीकडच्यांस म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या ; जें राज्य जगाच्या स्थापने पासून तुम्हांकरितां सिद्ध केलें आहे तें वतन घ्या;  कारण मी भुकेला होतों 'तेव्हां तुम्ही मला खावयास दिलें, तान्हेला होतो तेव्हां मला प्यावयास पाणी दिलें, परका होतों तेव्हां मला घरांत घेतलें,  उघडा होतों तेव्हां
मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला.  त्यावेळेस नीतिमान् त्याला उत्तर देतील की, प्रभुजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले ? केव्हा तान्हेले पाहून प्यावयास दिले ?  तुम्हाला परके पाहून केव्हा घरांत घेतलें ? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले ?  आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हां आम्ही तुमच्याकडे आलो ?  तेव्हा राजा त्यांस उत्तर देईल, मी तुम्हांस खचित सांगतों की, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे.  मग डावीकडच्यांसहि तो म्हणेल, अहो शाप ग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे त्यांत जा.  कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिलें नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही,  परका होतो तेव्हा मला घरांत घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिलें नाहीं, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही.  त्यावेळेस हेहि त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेलें, तान्हेलें, परके, उघडें, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही ?  तेव्हां तो त्यांस उत्तर देईल, मी तुम्हांस खचित सांगतों की, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाहि केलें नाहीं, त्याअर्थी ते मला केले नाही.  'ते तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील; आणि नीतिमान् 'सार्वकालिक जीवन उपभोगा वयास' जातील.
: प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  " मदर तेरेजांनी गरजवंत, गरीब, आजारी, बहिष्कृत,  नाकारलेले अशा सर्व माणसांमध्ये ख्रिस्त पाहिला आणि त्यांची सेवा केली. प्रभू  येशूचे वचन मदर तेरेजांनी प्रत्यक्षपणे आपल्या जीवनात आमलात आणले.  रंजल्या-गांजलेल्यांची ती आई बनली म्हणूनच संपूर्ण जगाने तिला मातेचा  सन्मान दिला. परमेश्वराने तर खरोखरच तिला आशीर्वादित केले कारण जगाच्या कानाकोपऱ्यात मदर तेरेजांनी ख्रिस्ताचे करुणामय प्रेम साकारले.
खरे ख्रिस्तानुकरण आणि ख्रिस्तानुवर्तन आपण मदर तेरेजांकडूनच  शिकायचे आहे. आज जगात अनेक माणसे प्रेमाची, मायेची व आपल्या गोड शब्दाची भूकेली आहेत. संत मदर तेरेजांचा आदर्श समोर ठेवून आपण आपल्या  परिने खरे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील बनू या. संत मदर तेरेजांच्या मध्यस्थीने सर्व गरजवंतांसाठी प्रार्थना करून कृतीशील बनू या. 
प्रार्थना : हे प्रभू येश ख्रिस्ता, सर्व गरजवंत, दीन, दुबळे, आजारी व मरणोन्मुख  झालेल्यांमध्ये तुला शोधण्यास व त्यांना खऱ्या प्रेमाचा दिलासा देण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन.

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना 

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजा-यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सात्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया
हिचा आदर्श डोळयासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे .
तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन .
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या