Marathi Bible Reading | Tuesday 6th September 2022 | 23rd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २३ वा सप्ताह  

मंगळवार  ६ सप्टेंबर २०२२

येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला.  





 प्रार्थनेद्वारे देवाबरोबर संवाद साधल्याने कार्याची दीशा सुनिश्चित होते व कार्य सुरळीत पार पडते.
प्रभू येशूने बारा प्रेषित निवडले नंतर तो जनसमुदायासमोर देवाचा  शब्द घोषित करण्यासाठी उभा राहिला. देवाचा शब्द व सुवार्ता घोषित  करण्यासाठी सुद्धा प्रार्थनेद्वारे प्रेरणा व शक्ती मिळते. प्रभू येशूच्या मुखातून निघणारी वचने सामर्थ्यशाली आणि कृपापूर्ण होती म्हणूनच अनेक रोगी आणि आजारी माणसे रोगमुक्त झाली. प्रभू येशू स्वत:च सर्वशक्तीमान आहे,  केवळ शारीरिक नव्हे तर मनोरुग्ण व भूतग्रस्तांनासुद्धा प्रभूने बरे केले. साहजिकच आरोग्य प्रदान करणाऱ्या प्रभू येशूचा स्पर्श आपणाला सुद्धा व्हावा त्या हेतूने अनेक माणसांची धडपड चालू  होती. प्रभू येशू प्रत्यक्ष लोकांसमवेत होता आणि ही अद्भूत कृत्ये घडली .
 आजसुद्धा त्याच्या करुणेचा स्पर्श अनेकांचे जीवन परिवर्तन करीत आहे.
✝️   

पहिले वाचन : करिथ  ६:१-११
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
 
"भावाभावांमध्ये भांडणे आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यांपुढे ?”

तुमच्यापैकी कोणाएकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमानांपुढे नेण्याचे धाडस करत आहे का? किंवा पवित्रजन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हांला ठाऊक नाही का? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे, तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आंहा का ? आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहो हे तुम्हांला ठाऊक आहे ना ? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच! तुम्हाला व्यावहारिक प्रकरणात न्यायनिवाडा करावयाचा आहे, तर ख्रिस्तसभेत जे हिशेबात नाहीत त्यांना कसे नेमता ? तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुम्हामध्ये नाही, असे आहे का? परंतु भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यांपुढे करतो हे कसे ?
तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही ? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही ? उलट तुम्ही स्वतः अन्याय आणि नाडणूक करता आणि ती बंधुजनांची करता. अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय ? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड, आणि वित्त हरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही आणि तुम्हांपैकी कित्येक तसे होते. तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात आणि आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले आणि नीतिमान ठरवलेले असे झाला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  १५०:१-६,९
प्रतिसाद :   प्रभू आपल्या लोकांवर संतुष्ट आहे. 

१) प्रभूचे स्तवन करा. नवे गीत गाऊन
 परमेश्वराचे गुणगान करा,
 भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्रे गा.
 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो. 
 सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हास पावोत.

२) ती नृत्य करत त्याच्या नामाचे स्तवन करोत, 
डफ आणि वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत. 
कारण प्रभू आपल्या लोकांवर संतुष्ट आहे. 
तो गरिबांना तारणाने सुशोभित करतो.

३) भक्त गौरवामुळे उल्हासोत, 
ते आपल्या अंथरूणांवरून हर्षघोष करोत, 
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती कंठी असो. 
हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. 
परमेश्वराचे स्तवन करा.


जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !  
 परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास 
आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ६:१२-१९
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "येशूने रात्रभर प्रार्थना केली आणि बारा जणांना निवडून त्यांना प्रेषित असे नाव दिले. "

येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून पुढील बाराजणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. शिमोन, ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रेया, याकोब, योहान, फिलीप, बार्थेलोम्यू, मत्तय, थोमास, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबचा- मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदा इस्कर्योत
येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदीया व येरुशलेम येथून आणि सोर आणि सिदोन ह्याकडल्या समुद्रकिनाऱ्यापासून श्रवण करण्यासाठी व आपले रोग बरे करून घेण्यासाठी जे लोक आले होते. त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता. जे अशुद्ध आत्म्यांनी पीडलेले होते त्यांना त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यापासून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करीत होते.

: प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  प्रार्थना म्हणजे मानवी मनातील अहंकार, राग, द्वेष यांची जाळीजळमटे नष्ट करण्याचा उत्तम मार्ग आहे. प्रार्थना म्हणजे साक्षात देवाशी साधलेला संवाद. वाट चुकलेल्या वाटसरूला योग्य स्थळी पोहचविण्याचे उत्तम साधन म्हणजे प्रार्थना ! आज प्रभू येशू आपणांस प्रार्थनेचे महत्त्व पटवून देत आहे. अशांत मानसिक स्थितीतून बाहेर पडून योग्य निर्णय घेण्यासाठी प्रार्थना खूप मदत करते. म्हणूनच येशू आपल्या बारा शिष्यांना निवडण्याअगोदर प्रार्थना करतो व मगच शिष्यांची निवड करतो. आपणही आपल्या जीवनात महत्वाचे पाऊल उचलताना प्रभूचरणी लीन होऊन प्रार्थना करू या व योग्य निर्णय घेऊया.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याशी संवाद साधून तुझी कृपा अनुभवण्यास आमची अंत:करणे उघड, आमेन.

पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना 

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजा-यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सात्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया
हिचा आदर्श डोळयासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे .
तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन .
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या