सामान्यकाळातील २३ वा सप्ताह
बुधवार ७ सप्टेंबर २०२२
“अहो, जे तुम्ही आता भुकेले आहा ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल !
आरोग्य दायिनी मातें
आम्हा पाप्यावर दया कर .
दीन म्हणजे केवळ गरीब, लाचार किंवा भूकेला असे नव्हे तर दीनता म्हणजेच नम्रता, सौम्यता, दयाळूपणा, सहनशिलता आणि प्रेमळपणा. नम्रतेने देवाच्या आज्ञेचे पालन करुन त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणाऱ्यास स्वर्गाच्या राज्यात सर्वकाळचे जीवन मिळणार आहे, ह्याची शाश्वती प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आज देत आहे. त्यासाठीच तर प्रभू येशू ख्रिस्ताने देव प्रीति व परस्परप्रीतिची आज्ञा आपल्याला दिली आहे.
✝️
पहिले वाचन : १करिथ ७:२५-३१
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“तू पत्नीला बांधलेला आहेस काय ? असलास तर मुक्त होण्यास पाहू नकोस."
अविवाहित तरुण-तरुणींसंबंधी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या माझ्यावर विश्वासू होण्याची दया प्रभूद्वारे झाली आहे, तो मी आपले मत सांगतो. प्रस्तुतच्या अडचणीमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे हे माणसाला योग्य आहे. तू पत्नीला बांधलेला आहेस काय? असलास तर मुक्त होण्यास पाहू नकोस. पत्नीपासून मुक्त आहेस काय? असलास तर पत्नी करण्यास पाहू नको. तथापि तू लग्न केलेस म्हणून पाप केलेस असे होत नाही; तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले असे होत नाही. तरी पण अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हालअपेष्टा तुम्हाला भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे. बंधुजनहो, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे, जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करत नसल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही. नसल्यासारखे आणि जे ह्या जगाचा उपभोग घेतात, त्यांनी त्याचा उपभोग पूर्णपणे करत नसल्यासारखे असावे, कारण ह्या जगाचे बाह्यस्वरूप लयास जात आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ४५:११-१२,१४-१५,१६-१७
प्रतिसाद : राजकन्ये, इकडे लक्ष दे, कान देऊन ऐक.
१) राजकन्ये, इकडे लक्ष दे, कान देऊन ऐक..
तू आपले लोक आणि आपल्या बापाचे घर ही विसर,
म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल,
तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग.
२) राजकन्या आपल्या अंत:पुरात अगदी
ऐश्वर्यमंडित आहे, तिची वस्त्रे सुवर्णालंकृत
व भरजरी आहेत. तिला कशिद्याची
वस्त्रे नेसवून तिच्या कुमारी सख्या
तिला राजाकडे घेऊन जातील.
३) आनंदाने आणि उत्सवाने त्यांना मिरवतील,
त्या राजमंदिरात प्रवेश करतील,
तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील,
तू सर्व पृथ्वीवर त्यांना अधिपती करशील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास
माझे अंत:करण वळव. आणि
तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ६:२०-२६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
अहो गरीब जनहो, तुम्ही धन्य ! धनवानांची केवढी दुर्दशा होणार !
येशूने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो गरीब जनहो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे!”
“अहो, जे तुम्ही आता भुकेले आहा ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल ! “अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल !”
“मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य ! त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात त्याचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत असत."
“परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात."
“अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहा त्या तुमची केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्हाला भूक लागेल.”
“अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.”
"जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत.”
क : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : मत्तयच्या शुभवर्तमानात अध्याय ५ वचन १ ते १२ यामध्ये धन्यवादित उद्गार आपणांस आढळतात. आजचे शुभवर्तमान हे संत लूकचे आहे. यात चार उद्गार धन्यवादाचे व चार उद्गार धिक्कार करणारे आहेत. लूकचे शुभवर्तमान हे गरिबांचे शुभवर्तमान म्हणून ओळखले जाते. ज्या लोकांविषयी लूक लिहीत आहेत ते खूप गरीब व लाचार आहेत. त्यांना धीर व प्रोत्साहन देण्यासाठी संत लूक प्रयत्न करत आहेत. ईयोब १४व्या अध्यायात सांगतो की, स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायुषी व क्लेशभरीत असतो. मनुष्याचे जीवन हे दुःखाचे व कष्टाचे आहे. परंतु जेव्हा आपण प्रभूला आपल्या जीवनात आमंत्रित करतो आणि आपल्या दुःखात व त्रासात सहभागी करतो तेव्हा तो आपल्याला ते दुःख पेलण्यासाठी हिंमत व ताकद देत असतो. परमेश्वर संपूर्णपणे आपले दुःख नष्ट करत नाही. पण त्याला आध्यात्मिक अर्थ देत असतो. त्यामुळेच आपले जीवन आनंदित व प्रफुल्लित होत असते. या आध्यात्मिक वरदानासाठी आपण आज विशेष प्रार्थना करूया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, स्वर्गराज्याचे वारसदार बनण्यास पात्र ठरावेत म्हणून आम्हाला खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजा-यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सात्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया
हिचा आदर्श डोळयासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे .
तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन .
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या