सामान्यकाळातील २३ वा सप्ताह
गुरुवार ८ सप्टेंबर २०२२
“पाहा कुमारी गर्भवती होईल तिला मुलगा होईल. त्याला 'इम्मानुएल' म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल.”
Nativity of the Blessed Virgin Mary
Happy Birthday
To Dear Mother Mary
पवित्र मारिया मातेच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आरोग्य दायिनी कृपावंत प्रेमळ माते
वेलेंकांनी व मोत माउली
आम्हा पाप्यावर दया कर .
“इम्मानुएल - आम्हांबरोबर देव” ही संकल्पना सुरूवातीपासूनच अस्तित्वात होती परंतु देवाच्या पुत्राचा जन्म धन्य कुमारी मरियेद्वारे झाला. ध. कु. मरिया म्हणजेदेवपत्यिाची अप्रतिम निर्मिती आहे, कारण तिच्या गर्भसंभवापासून ती निष्कलंक होती. तिला देवपुत्राची माता होण्यासाठीच निर्माण केले होते. देवाच्या हाकेला श्रद्धापूर्ण अंत:करणाने दिलेला होकार आणि देवपुत्राची माता बनून अखिल मानवांच्या तारणदात्याची स्वीकारलेली आव्हानात्मक जबाबदारी धन्य कुमारी मरियेने देवकृपेने पार पाडली. म्हणूनच तिचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे.
गेल्या नऊ दिवसापासून धन्य कुमारी मरियेच्या जीवनावर आपण चिंतन केलेले आहे. आज मरियामाते सारखे श्रद्धापूर्ण, प्रेमळ व परोपकारी जीवन आपल्याला जगता यावे म्हणून प्रार्थना व प्रयत्न करू या .
✝️
पहिले वाचन : मीखा ५:१-४
वाचन :मीखाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"असा समय येत आहे की, प्रसूतिवेदना पावणारी प्रसूत होईल. "
प्रभू असे म्हणतो : हे बेथलेहेम एफ्राथा, जरी यहुदाच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एकजण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलचा सत्ताधीश होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूतिवेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूंचा अवशेष परत इस्राएलच्या वंशजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभू देवाच्या नावाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल, आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील. कारण आता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
पर्यायी पहिले वाचन
पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ८:२८-३०
“ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांना अगोदर नेमून ठेवले. "
आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले, ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधलाज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने अगोदर नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १३:६-७
प्रतिसाद : मी प्रभुठायी हर्ष करतो.
१) मी तुझ्या दयेवर विसंबून आहे.
माझे हृदय तू सिध्द केलेल्या तारणाने उल्हासेल.
२) परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत,
म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे पवित्र कुमारी मरिये, तू धन्य असून गौरवास पात्र आहेस,
कारण न्यायसूर्य ख्रिस्त, आमचा परमेश्वर, तुझ्या पोटी जन्मला.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १:१-१६,१८-२३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मरियेच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. "
आब्राहामचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त ह्याच्यापर्यंतची वंशावळ : आब्राहाम हा इसहाकचा बाप, इसहाक याकोबचा, याकोब यहूदा व त्याचे भाऊ यांचा बाप, यहूदा, पेरेस आणि जेरह यांचा बाप (त्यांची आई तामार), पेरेस हेसरोमाचा, हेसरोम रामाचा, राम अम्मीनादाबाचा, अम्मीनादाब नहशोनाचा, नहशोन सलमोनचा, सलमोन बवाजाचा बाप (बवाजाची आई राहाब), बवाज ओबेदचा बाप (ओबेदची आई रूथ), ओबेद इशायचा आणि इशाय राजा दावीद याचा बाप होता.
दावीद शलमोनचा बाप होता (शलमोनाची आई पूर्वी उरियाची पत्नी होती) शलमोन रहबामाचा, रहबाम अबीयाचा, अबीया आसाचा, आसा यहोशाफाटाचा, यहोशाफाट योरामाचा, योराम उज्जीयाचा, उज्जीया योथामाचा, योथाम आहाजाचा, आहाज हिजकीयाचा, हिजकीया मनश्शेचा, मनश्शे आमोनाचा, आमोन योशीयाचा, योशीया हा यखन्या आणि त्याचे भाऊ यांचा बाप, या काळात यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले.
बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर : यखन्या शलतीएलाचा बाप, शलतीएल जेरुब्बाबेलाचा, जेरूब्बाबेल अबीहूदाचा, अबीहूद एल्याकीमाचा, एल्याकीम अज्जूराचा, अज्जूर सादोकाचा, सादोका याखीमाचा, याखीम एलीहूदाचा, एलीहूद एलाजाराचा, एलाजार मत्तानाचा, मत्तान याकोबाचा, याकोब योसेफचा बाप. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.
(येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली : त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वाड्. निश्चय झाला होता. पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच, पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वाड्. निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, “दावीदच्या पुत्रा, योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिऊ नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे.") या घटना घडण्याचे कारण म्हणजे आपल्या संदेष्ट्यामार्फत वदवले होते. “पाहा कुमारी गर्भवती होईल तिला मुलगा होईल. त्याला 'इम्मानुएल' म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल.”
क : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : ख्रिस्तसभेत तीन व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जातो. प्रभू येशू ख्रिस्त, बाप्तिस्मा करणारा योहान आणि पवित्र मरिया. येशू हा साक्षात देवपुत्र व आपला तारणारा असल्यामुळे व त्याचा जन्म अद्भूतरित्या झाल्यामुळे आपण त्याचा जन्मदिवस साजरा करतो. परंतु संत योहान व पवित्र परिया हे दोघे आपल्यासारखे सामान्यजन होते. पण त्यांची देवावरील श्रद्धा, विश्वास व देवाच्या वचनाप्रमाणे वागण्याची तळमळ या कारणामुळे ख्रिस्तसभा त्यांचा सन्मान करते व त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन करत आहे. आज पवित्र मरियेचा वाढदिवस साजरा करीत असताना तिच्यासारखे पवित्र, नम्र व लीन जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया. आजच्या शुभवर्तमानात आपण येशूची वंशावळ ऐकली व एका स्त्रीच्या होकारामुळे अखिल वंशावळ शुद्ध व पवित्र कशी झाली याचा अनुभव घेतला. कौटुंबिक जीवन जगताना कुटुंबातील एका व्यक्तीच्या प्रार्थनामय व भक्तिमय जीवनामुळे संपूर्ण कुटुंबाचे तारण होत असते. त्यामुळेच आज ख्रिस्तसभा आपणांस कुटुंबाची आध्यात्मिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी पाचारण करत आहे.
प्रार्थना : हे धन्य पवित्र माते, तुझ्यासारखे पवित्र व सेवाभावी जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या