सामान्यकाळातील २३ वा सप्ताह
शुक्रवार ९ सप्टेंबर २०२२
शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही, पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल.
संत पीटर क्लेवर
वर्तनसाक्षी (१५८१-१६५४)
चिंतन : हे प्रभू येशू तूच माझा पिता, तूच माझी माता, तूच माझे सर्वस्व ! भौ तुजवर मनापासून प्रेम करतो. संत पीटर क्लेवर
.
✝️
पहिले वाचन : १करिथ ९:१६-१९,२२-२७
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
अधिक लोक मिळवण्यासाठी मी स्वतःला सर्वांचा दास केले आहे.
मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही. कारण मला ती सांगणे माझे कर्तव्य आहे. मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार! मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल आणि आपण होऊन केले नाही तर ती माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. तर मग माझे वेतन काय ? अशा हेतूने की मी सुवार्ता फुकट सांगावी, मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे गमावू नये.
मी सर्वापासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे म्हणून मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो, तसेच मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.
शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय ? असे धावा की तुम्हांला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येकजण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही, तर मी आपले शरीर घुसळतो आणि त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः परीक्षेत उतरणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ८४:३-६,८,१२
प्रतिसाद : हे सेनाधीश प्रभो, तुझे निवासस्थान किती रम्य आहे !
१) मला प्रभूच्या अंगणाची उत्कंठा लागली
असून तो झुरत आहे. माझा जीव आणि
देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहे.
२) हे सेनाधीश प्रभू, माझ्या राजा,
माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ
चिमणीला घरटे करण्यासाठी आणि
निळवीला आपल्या पिलांकरिता कोटे
बांधण्यासाठी स्थळ मिळाले आहे.
३) तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता!
ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील.
ज्या मनुष्यांना तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते,
ज्यांच्या मनाला सियोनच्या राजमार्गाचा
ध्यास लागला आहे ते केवढे धन्य !
त्यांची शक्ती अधिकाधिक वाढत जाते,
सियोनमध्ये प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभेल.
४) कारण प्रभूदेव हा तटबंदी आणि ढाल आहे,
परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो.
जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम
ते दिल्यावाचून तो राहणार नाही.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ६:३९-४२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय ?"
येशूने आपल्या शिष्यांना दाखला दिला की, “आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय ? दोघेही खाचेत पडतील की नाही ? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही, पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यांतले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यांतले कुसळ का पाहतोस ? अथवा तू आपल्या डोळ्यांतले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे ? अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यांतले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.”
क : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आपण या पाखंडी जगात जगत असताना, अनेक लोक असे आढळतात की, त्यांना इतरांना फुकटचे सल्ले देण्यास खूप आवडते. परंतु त्या व्यक्तींना आपण एखादा सल्ला दिल्यास त्यांच्या जिव्हारी लागतो, त्यांचा अहंकार दुखावतो. आज प्रभू येशू आपल्या शिष्यांना एक मुद्दा पटवून देत आहे की, येशू हा खरा गुरू आहे व आपण सर्वजण त्याचे शिष्य आहोत. जो शिष्य गुरूचे स्वच्छ मनाने व विनम्रपणे ऐकतो आणि त्यावर मनन, चिंतन करून जीवनात त्याची अंमलबजावणी करतो तो शिष्य पुढे गुरू होऊ शकतो. आपल्या कुटुंबातही आपण थोरामोठ्यांचे व वाड-वडिलांचे ऐकून त्याप्रमाणे आचरण केले तर ते कुटुंब बहरते, कारण वाड-वडिलांचे बोल हे पाठ्यपुस्तकातील नसून ते अनुभवाचे आहेत. आपणा सर्वांना नम्रतेचा गुण लाभावा व त्याने आपण सर्वजण परिपूर्ण व्हावे यासाठी देवाकडे याचना करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, परमश्रेष्ठ गुरु, तुझ्या सुवार्तेचे साधन बनण्यास व खरा शिष्य होण्यास मला प्रेरणा व शक्ती दे, आमेन...
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या