Marathi Bible Reading | Saturday 10th September 2022 | 23rd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २३ वा सप्ताह  

शनिवार १० सप्टेंबर २०२२

"चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो,"






तोलेंटिनोचे संत निकोलस 
वर्तनसाक्षी (१२४५-१३०५)


धर्मगुरुपदाची दीक्षा मिळाल्यानंतर फा. निकोलस ह्यांनी दररोज देवराज्याची सुवार्ता घोषविण्याचा निश्चय केला. त्यांचे वक्तृत्व आणि वाणीतील माधुर्य भल्याभल्यांना ख्रिस्ताच्या चरणी लोळण घ्यायला लावी. देवाने त्यांना अद्भूत चमत्कारांचीसुद्धा देणगी दिलेली होती. त्यांच्या केवळ आशीर्वादामुळे व स्पर्शाने आजारी बरे होत असत.
ह्या सवपिक्षा महत्त्वाचे म्हणजे फा. निकोलस ह्यांना गोरगरिबांविषयी आस्था होती. शुद्धिस्थानांतील आत्म्यांच्या तारणासाठी ते दररोज मध्यस्थीची प्रार्थना करीत. एखाद्याच्या आत्म्याला पवित्र मिस्सा अर्पण केल्यामुळे तो आत्मा कालांतराने शुद्धिस्थानातून मुक्त होऊन स्वर्गात कसा जाई त्याचे दृष्टान्त वा साक्षात्कार फा. निकोलस ह्यांना प्रत्यक्ष मिस्सावली अर्पण करताना झालेला आहे.
फा. निकोलस १० सप्टेंबर १३०५ रोजी मरण पावले. शुद्धिस्थानातील आत्म्यांच्या तारणासाठी संत निकोलस ह्यांचा धावा केला जातो. त्यांचे अविनाशी शरीर तोलेंटिनो येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे.
 
✝️   

पहिले वाचन : करिथ  १०:१४-२२
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर, असे आहो."

माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा.तुम्हांला सुज्ञ समजून मी तुम्हाबरोबर बोलतो, मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा, ज्या आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही ? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही ? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर, असे आहो, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहो. जे जात्याच इस्राएल त्यांच्याकडे पाहा, यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय ? तर माझे म्हणणे काय आहे ? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काही तरी आहे, अथवा मूर्ती काही तरी आहे, असे माझे म्हणणे आहे का ? नाही. तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भुतांना करतात आणि तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला आणि भुतांचाही प्याला पिववत नाही. प्रभूच्या मेजावरचे आणि भुतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही. आपण प्रभूला ईर्षेला पेटवतो का? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहो का ?
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :११६:१२-१३,१७-१८
प्रतिसाद :  प्रभो, मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन.

१) परमेश्वराच्या अनंत उपकारांबद्दल 
मी त्याचा कसा उतराई होऊ ? 
मी तारणाचा प्याला हाती घेऊन 
प्रभूच्या नावाचा धावा करीन.

२) मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, 
प्रभूच्या नावाचा धावा करीन.
 प्रभूला केलेले नवस मी त्याच्या 
सर्व लोकांसमक्ष फेडीन.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
 तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड 
आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ६:४३-४९
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 "तुम्ही मला प्रभो, प्रभो म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही ?"

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. फळावरून झाडाची परीक्षा होते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
“तुम्ही मला प्रभू, प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही ? जो कोणी माझ्याकडे येतो आणि माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. तो कोणी एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे, त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते घर हालले नाही. कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे, त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते घर लागलीच पडले आणि त्या घराचा सर्वनाश झाला.
: प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  जैसा बाप तेसा बेटा ! ही म्हण आपण ऐकली असेलच. जर एखाद्या वडिलांना वाईट सवय किंवा वाईट व्यसन असेल तर कालांतराने तोच वाईट गुण त्याच्या मुलांमध्ये उतरतो किंवा मुलं त्याचे अनुकरण करतात. असे शंभर टक्के सर्वांच्याच बाबतीत होते असे नाही. पण काही प्रमाणात असे होत असते. जसे झाड, तसे फळ ! आज प्रभू येशू आपले कुटुंब आपल्याला खडकावर बांधण्यासाठी सांगत आहे. 'खडक हा येशूची शिकवण, मूल्ये, दाखले व देवाचा शब्द याचे प्रतिक आहे. त्यामुळे अशा खडकावर जेव्हा घर बांधण्यात येते, तेव्हा त्या कुटुंबातील वृक्षाला नेहमी आध्यात्मिक फळे, फुले लगडतात. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारू या की, मी एक चांगले झाड आहे का ? जर मी चांगले झाड असेन तर माझ्यामध्ये शांतीचे, समेटाचे, क्षमेचे व चांगुलपणाचे फळे दिसतात का ? या सर्व गुणांसाठी आपण विशेष प्रार्थना करू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी अमर वचने आत्मसात करून त्यानुसार आचरण करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या