Marathi Bible Reading | 24th Sunday In Ordinary Time | 11th September 2022 |

सामान्यकाळातील २ वा  रविवार 

११ सप्टेंबर  २०२२

"पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात आनंद होईल."



 'बाबा, मी स्वर्गाविरूद्ध आणि तुमच्याविरूद्ध पाप केले आहे. 


 पश्चाताप आणि देवाची क्षमा या संदर्भाने प्रभू  येशूने तीन दाखले देऊन स्पष्टीकरण केले आहे. हरवलेले मेंढरू आणि हरवलेले  नाणे ह्या दाखल्यामध्ये तो माणूस हरवलेल्या मेंढराचा आणि ती स्त्री  नाण्याचा  शोध घेत आहेत. परमेश्वर पश्चातापी आणि पापी माणसाच्या शोधात असतो. पाश्चातापी माणसाचे परिवर्तन झाल्यावर देवाला अत्यानंद होत असतो. उधळ्या  मुलाचा दाखला म्हणजे पश्चाताप आणि परिवर्तनाचा उच्चांक गाठणारा अनुभव  आहे. 


✝️   
पहिले वाचन : निर्गम  ३२:७-११.१३-१४
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 "आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला.'

परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू इजिप्त देशातून आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गानी त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो मार्ग इतक्यातच सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली आणि त्याला बली अर्पण केले आणि हे इस्राएल, ज्यांनी तुला इजिप्त देशातून आणले आहे तेच हे तुझे देव, असे ते म्हणू लागले आहेत." मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “मी ह्या लोकांना पाहिले आहे, हे ताठ मानेचे लोक आहेत. तर आता मला आड येऊ नकोस, मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो.' "
तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची विनवणी करून म्हणाला, “हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने आणि बाहुबलाने इजिप्त देशातून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा ? तुझे दास आब्राहाम, इसहाक आणि इस्राएल ह्यांची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितले होते की, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्या देशाची निरंतरची वतनदार होईल." तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून परावृत्त झाला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ५२:३-४,१२-१३,१७.१९
प्रतिसाद :   मी उठून आपल्या बापाकडे जाईन.

१) हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून 
माझ्यावर दया कर.तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून 
माझे अपराध पुसून टाक. 
मला अधिकाधिक धुऊन माझा दोष काढून टाक, 
माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.

२) हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर.
 माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.
 तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस 
आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.

३) हे प्रभो, माझे ओठ उघड म्हणजे माझे मुख
तुझी कीर्ती वर्णील. माझा यज्ञ म्हणजे भग्न आत्मा 
हे देवा, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.


दुसरे वाचन  १ तिमथी १:१२-१७
वाचक: पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 
"ख्रिस्त येशू पापी लोकांना तारायला जगात आला.'
ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो, कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा, आणि जुलूमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया केली. ख्रिस्त येशूमधील विश्वास आणि प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची माझ्यावर अगाध कृपा झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारायला जगात आला, हे वचन विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारायला योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे, तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्यावर दया करण्यात आली. जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच देव, त्याला सन्मान आणि गौरव युगानुयुगे असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
 प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात,
 मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. 
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १५:१-३२
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात आनंद होईल."

* (सर्व जकातदार आणि पापी लोक त्याचे ऐकण्यासाठी येशूजवळ येत होते. तेव्हा परुशी आणि शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.”
येशूने त्यांना एक दाखला सांगितला : “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यत तो त्याचा शोध करत नाही ?” ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. " तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुप्याची दहा नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून आणि सारे घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना आणि शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”)
आणखी तो म्हणाला, “कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते, त्यापैकी, धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला गयावया करून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती तरी मोलकऱ्यांना अन्नाची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन आणि त्याला म्हणेन, 'बाबा, मी स्वर्गाविरूद्ध आणि तुमच्याविरूद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा.' मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, 'बाबा, मी स्वर्गाविरूद्ध आणि तुमच्याविरूद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.' पण बापाने आपल्या दासांना सांगितले, 'लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडा घाला आणि पुष्ट कोकरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे.' मग ते आनंदोत्सव करू लागले.त्याचा ज्येष्ठ मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन आणि नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकराला बोलावून विचारले, हे काय चालले आहे ? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट कोकरू कापले आहे. तेव्हा तो रागावला आणि आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला आणि त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट कोकरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे.

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आजची शास्त्रवाचने परमेश्वर - मानव परस्पर संबंधावर प्रकाश टाकतात. 
अ. मानवाची प्रवृत्ती विकारांकडेच ओढली जाते : आजच्या पहिल्या वाचनात इस्राएली लोकांच्या मूर्तिपूजक वृत्तीकडे पाहून परमेश्वराचा राग अनावर होतो. दुसऱ्या वाचनात संत पॉल आपली दुर्बळता आणि पापवृत्ती मान्य करतो. शुभवर्तमानात मेंढरू, नाणे व मुलगा हे हरवताना दिसतात. 
ब. मनुष्य मात्र परमेश्वराच्या दृष्टीने खूप अनमोल आहे : इस्राएलच्या पूर्वजांशी केलेला करार आठवून परमेश्वर आपला राग आवरतो. मेंढपाळ हरवलेल्या मेंढराच्या शोधात फिरतो. स्त्री हरवलेले नाणे शोधण्यासाठी सारे घर शोधते, परमेश्वरपिता आपल्या हरवलेल्या लेकरांच्या परतण्यासाठी आसुसलेला असतो. 
क. परमेश्वर मानवाला क्षमा करण्यास आणि त्याला स्वीकारण्यास सदैव तयार असतो : संत पॉल म्हणतो, परमेश्वराची कृपा पाप्यांसाठी सदैव उपलब्ध असते. शुभवर्तमानातील तिन्ही दाखल्यात हरवलेले मेंढरू, नाणे, मुलगा सापडल्यावर मालकाला आनंद होतो. आपल्या  निर्मितीपैकी किंवा लेकरांपैकी कोण हरवावे असे परमेश्वराची इच्छा नाही. परमेश्वर मानव परस्परसंबंध अबाधित राहावेत आणि मानवाला परमेश्वराच्या अमर्याद प्रेमाची जाणीव व्हावी म्हणून परमेश्वर मानवाला कृपा देत राहतो.
आत्मपरीक्षण : माझ्या हातून पाप घडल्यानंतर मी स्वतःच्या दुर्बलतेकडे आणि परमेश्वराच्या क्षमाशीलतेकडे कशाप्रकारे पाहतो ? परमेश्वराचे हे क्षमाशील प्रेम मला इतरांना कसे देता येईल ?

प्रार्थना : हे प्रेमळ व दयाळू परमेश्वरा, तुझ्या सन्मार्गावरुन मार्गक्रमण करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या