Marathi Bible Reading | Monday 12th September 2022 | 24th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २४ वा सप्ताह  

सोमवार १२ सप्टेंबर २०२२

"प्रभो, श्रम घेऊ नका,......  तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. 






मरियेचे अति पवित्र नाम
The Feast of the Most Holy Name of the Blessed Virgin Mary is an optional memorial celebrated in the liturgical calendar of the Catholic Church on 12 September. It has been a universal Roman Rite feast since 1684, when Pope Innocent XI included it in the General Roman Calendar to commemorate the victory at the Battle of Vienna in 1683.[1] It was removed from the Church calendar in the liturgical reform following Vatican II but restored by Pope John Paul II in 2002, along with the Feast of the Holy Name of Jesus.

श्रद्धावान माणसाला देवाच्या केवळ  एका शब्दाची गरज असते. देवाच्या शब्दावर पूर्णपणे विश्वास ठेवून श्रद्धावान्  माणूस आपले सर्वस्व समर्पित करतो. शताधिपतीची नितांत श्रद्धा पाहून येशूने म्हटले, “एवढा विश्वास मला इस्त्राएलातहि आढळला नाही." शताधितीची श्रद्धा आणि येशूचा एक शब्द ह्यामुळे तो चाकर बरा झाला.
 
✝️   

पहिले वाचन : करिथ  ११:१७-२६,३३
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"जर तुम्हांत फुटी आहेत तर तुम्ही ख्रिस्ताचे जेवण घेत नाहीत. "

मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. कारण तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुम्हांमध्ये फुटिरता दिसते, असे मी ऐकतो आणि ते काही अंशी खरे मानतो. तुम्हामध्ये जे पंसतीला उतरलेले आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करतेवेळी प्रत्येकजण आपले घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो, एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. खाणे पिणे करण्यासाठी तुम्हांला आपआपली घरे नाहीत का? की तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता ? मी तुम्हांला काय सांगू ? ह्याविषयी मी तुमची वाहवा करू का? मी तुमची वाहवा करत नाही.कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, "हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले व म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून माझ्या बंधूनो, तुम्ही भोजनाला एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पाहा.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ४०:७-१०,१७

प्रतिसाद : प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करा.

१) यज्ञ आणि अर्पणे ही तुला हवीशी नसतात, 
पण ऐकायला तू माझे कान उघडे ठेवले आहेस. 
होमबली आणि पापबली तुला नकोत. 
ह्यावरून मी म्हणालो की, हा बघ मी आलोच !

२) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की,
 तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे. हे देवा, 
तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला
आनंद वाटतो, तुझे वचन माझ्या अंतर्यामी आहे.

३) हे प्रभो, महासभेत मी तुझ्या नीतिमत्वाचा 
पुरस्कार केला, मी आपले तोंड बंद ठेवले नाही,
 हे तुला माहीत आहे.

४) तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद 
आणि उल्हास पावोत.
तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे
परमेश्वराचा महिमा वाढो, असे सतत म्हणोत.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
 प्रभू आपल्या प्रत्येक वचनाला जागतो,
 त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. 
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ७:१-१०
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"एवढा विश्वास मला इस्राएलमध्येही आढळला नाही."

येशूने कफर्णहूममध्ये प्रवेश केला तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणाला टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडीलमंडळीस त्याच्याकडे पाठवले आणि विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली आणि सांगितले, आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला, मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्राला पाठवून त्याला म्हटले, "प्रभो, श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही, ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही. तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला 'जा' म्हटले तो जातो, दुसऱ्याला 'ये' म्हटले म्हणजे तो येतो आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.” ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्यामागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलमध्ये आढळला नाही. नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.
: प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  

'शब्द' जीवन घडवतात 'शब्द' जीवन बिघडवतात. इंग्रजीत एक म्हण आहे, “Word is mightier then sword.” शब्द दुधारी तलवारीपेक्षा मजबूत असतात. आज प्रभूयेशूच्या शब्दामुळे शताधिपतीच्या दासाला नवजीवन मिळाले. आपल्या कुटुंबात, समाजात, परिसरात कलह, वाद निर्माण होतात ते केवळ शब्दांमुळेच ! सकारात्मक शब्दामुळे आपली, आपल्या कुटुंबाची व समाजाची प्रगती होते. पण नकारात्मक शब्दांमुळे आपली अधोगती व विनाश होतो. आज आपण मनन-चिंतन करूया आपल्याशब्दांमुळे दुसऱ्यांची मने न दुखावता त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान व आनंद निर्माण व्हावा, त्यांचे आयुष्य बिघडवू नये व उत्तम समाजबांधणीचे कार्य आपल्या हातून घडावे.

प्रार्थना : हे प्रभूयेशू, आम्ही आपात्र असताना देखिल तू आम्हावर दयेचा वर्षाव  करतोस. तूजवर श्रद्धापूर्ण अंतःकरणाने प्रेम करण्यास व तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास आम्हाला बळ दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या